Maharashtra Politics: कुणी नाराज, तर कुणी आज इकडे, उद्या तिकडे; सर्व पक्षप्रमुखांच्या डोक्याला ताप

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात अभूतपूर्व अशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचेही अनेक ठिकाणी जागावाटप झालेले नाही, उमेदवारांची निश्चिती झालेली नाही. नाराजांची मनधरणी करताना सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या नाकीनऊ येत आहेत.
Eknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar
Eknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात अभूतपूर्व असा राजकीय गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कुणाचा पायपोस कुणाला नसून, कोण, कधी कोणाच्या बाजूला जाईल, याचा नेम राहिलेला नाही. हा गोंधळ आवरण्यासाठी सर्वच पक्षांच्या प्रमुखांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना प्रचंड ताणतणावाचा सामना करावा लागत आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे आणि उमेदवार निश्चितीचे घोडे अनेक मतदारसंघात अडकले आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. काही मतदारसंघांत उमेदवार जाहीर झाले आहेत. उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना कसरत करावी लागत आहे. हिशेब चुकते करण्यासाठी, बदला घेण्यासाठी राजकीय नेत्यांना निवडणूक ही जणू पर्वणीच असते. त्यानुसार काही नेत्यांनी जुने हिशेब चुकते करण्यासाठी कंबर कसली आहे. आज इकडे आणि उद्या दुसरीकडेच, असेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे राज्यात अभूतपूर्व अशी राजकीय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar
Shirur Lok Sabha Election: आढळरावांच्या पक्षप्रवेशाचा 'मुहूर्त' ठरला; उमेदवारी निश्चित पण...

शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी निवडणुकीचे निमित्त साधून सूड उगवण्याची भाषा सुरू केली आहे. त्यांचा रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे आहे. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी असा सामना झाला होता. त्यावेळी अजितदादा पवार यांनी आव्हान देऊन शिवतारे यांचा पराभव केला होता. तू निवडून कसा येतो, हे मला बघायचे आहे, असे अजितदादा त्यावेळी म्हणाले होते आणि निकालही तसाच लागला. शिवतारे यांचा पराभव झाला. आता शिवतारे आणि अजितदादा यांचे पक्ष महायुतीत आहेत. तरीही शिवतारे यांनी अजितदादांवर राजकीय सूड उगवण्याचा चंग बांधला आहे. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

नणंद-भावजयीच्या या लढतीत आता विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी उडी घेतली आहे. बारामतीचे लोक अजितदादांना कंटाळले आहेत, ते त्यांना मत देऊ इच्छित नाहीत, त्यामुळे मी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणारच आहे, असा निश्चय शिवतारे वारंवार बोलून दाखवत आहेत. शिंदे सेनेने उमेदवारी नाही दिली तर पक्षाचा त्याग करण्याची आणि अपक्ष म्हणून लढण्याचीही तयारी असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

शिवतारे हे बारामतीतून लढले तर त्याचा फटका सुनेत्रा पवार यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरू आहे. असे झाले तर महायुतीतून बाहेर पडावे लागेल, असा इशारा अजितदादांच्या पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. विविध मतदारसंघांत हा वाद पेटण्याचा धोका आहे. मनसेला महायुतीत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळेही महायुतीत अंतर्गत धुसफूस वाढण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपमध्येही सर्वकाही आलबेल आहे असे नाही. काही मतदारसंघांत उमेदवारीवरून नाराजी आहे. नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने खासदार सुजय विखे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आमदार राम शिंदे (Ram Shinde) नाराज झाले आहेत. आमदार शिंदे यांनी विखे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांची समजूत घातली, मात्र त्याचा काही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. माढा मतदारसंघातील पेचही भाजपला सोडवता आलेला नाही. अंतर्गत वाद बाजूला ठेवून महायुतीसाठी काम करा, असे आदेश उमपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता सर्वांनाच दिले आहेत. शिंदे गटातही अनेक जागांवरून नाराजी आहे. यात मुख्यत्वे कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे पक्षनेत्यांची डोकेदुखी वाढू लागला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाला सोडला होता. तेथून महादेव जानकर लढणार असे ठरले होते, मात्र जानकर यांनी ऐनवेळी पलटी मारत महायुतीचा आश्रय घेतला. त्यामुळे शरद पवार यांची अडचण झाली आहे. जानकर यांना माढ्यातून उमेदवारी देत बारामती मतदारसंघातील धनगर समाजाची मते सुरक्षित करण्याचा शरद पवार (Sharad Pawar) यांचा प्रयत्न होता. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात उमेदवारीवरून ठाकरेंच्या शिवसेनेतही वाद निर्माण झाला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar
Shrikant Shinde News : 'ज्यांनी भगवा रंग सोडला अन्.. ; होळीच्या शुभेच्छा देतानाही श्रीकांत शिंदेंनी सोडली नाही टोमणा मारण्याची संधी!

माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेचे अंबादास दानवे यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यावी, असा पेच उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. काँग्रेसलाही अशाच संकटाचा सामना करावा लागत आहे. चंद्रपूर मतदारसंघातून लेकीला उमेदवारी न मिळाल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिकडे रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे किशोर गजभिये नाराज झाले असून, ते बंडखोरी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा प्रकारांमुळे सर्वच पक्षांच्या प्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Eknath Shinde, Devendra Fadnvis, Ajit Pawar
Solapur Politics : मोठी घडामोड! तिकीट कापल्यानंतर सिद्धेश्वर स्वामी 'सागर' बंगल्यावर; फडणवीसांसोबत महत्त्वाची बैठक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com