Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत पदरी पडलेले अपयश पाहता भाजपकडून विद्यमान आमदारांची तिकीटे मोठ्या प्रमाणात कापली जातील, अशी शक्यता होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी तसे संकेतही देण्यात आले होते. ज्या आमदारांच्या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळणार नाही, त्यांना उमेदवारी द्यायची किंवा नाही, याचा विचार केला जाईल, असा संदेश भाजपने दिला होता. त्यामुळे उमेदवारी देताना भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जाईल, अशी चिन्हे दिसत होती, मात्र तसे झालेले नाही.
भाजपची पहिली यादी जाहीर झाली. पहिल्या यादीत अपवाद वगळता एकाही आमदाराची उमेदवारी कापण्यात आली नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या. महायुतीला 17 जागा मिळाल्या. लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या.
भाजप-शिवसेना युतीला महाराष्ट्रातील 48 पैकी 41 जागा मिळाल्या होत्या. हे 'बंपर' यश होते. त्या विधानसभा निवडणुकीतही (Assembly Election) भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारे हे यश होते. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा आलेख खाली आला, तरीही आमदारांची तिकीटे कापण्यात आली नाहीत.
भाजपने (BJP) आत्मविश्वास गमावला आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. पक्षाने घेतलेला निर्णय भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मान्य करतात. सहसा बंडखोरी करत नाहीत. पक्षशिस्त त्यांच्यासाठी सर्वोपरी असते. आता ही परिस्थिती बदलली आहे का? या अर्थानेच भाजपच्या आत्मविश्वासाचा स्तर खाली आला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आत्मविश्वास खालावला असेल तर तर त्याला गेल्या पाच वर्षांतील घडामोडी कारणीभूत आहेत, असे म्हणावे लागेल.
लोकसभा निवडणुकीत भाजपने 'मिशन 45' चा नारा दिला होता. ते मिशन सपशेल अपयशी ठरले. पक्षनेतृत्वाने केलेल्या चुकांची किंमत जमिनीवरील कार्यकर्त्यांना मोजावी लागली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्यातील दोन प्रभावी प्रादेशिक पक्ष फुटले. त्याचे खापर अंतिमतः भाजपच्या डोक्यावर फुटले. लोकांना याचे उत्तर देता देता कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले. दोन पक्ष फुटल्यामुळे राज्यातील चार प्रमुख पक्षांची संख्या सहावर गेली आणि यामुळेच विद्यमान आमदारांची तिकिटे न कापण्याचा निर्णय भाजपला घ्यावा लागला.
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने 50 आमदारांना उमेदवारी नाकारली होती. हा पॅटर्न महाराष्ट्राताही राबवण्याचा भाजपचा विचार होता. नुकत्याच झालेल्या हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीतही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती.
हरियाणात बहुमत मिळाले, सत्ता आली, मात्र 9 मंत्र्यांचा पराभव झाला. हा अनुभव पाठिशी असतानाही महाराष्ट्रात पहिल्या यादीत भाजपने आमदारांना उमेदवारी नाकारलेली नाही. निवडणूक कोणतीही असेल, कुठेही असेल, भाजप हा धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. मात्र महाराष्ट्रात भाजपला हे धक्कातंत्र वापरता आलेले नाही.
धक्कातंत्र न वापरण्याचे कारण आहे, पक्षांत पडलेली फूट आणि त्यामुळे वाढलेली पक्षांची संख्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नेत्यांची इनकमिंग सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडेही गेल्या काही दिवसांत नेत्यांचा ओढा वाढला होता.
भाजपने आमदारांची तिकीटे कापली असती तर संबंधित आमदारांना सक्षम पर्याय उपलब्ध होते. यातील काही आमदार शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेले असते आणि त्यांना उमेदवारीही मिळाली असती, कारण या दोन्ही पक्षांतील प्रत्येकी 40 आमदार आता महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे आमदार सोडून गेल्यामुळे त्यांच्याकडे नव्या उमेदवारांसाठी मुबलक संधी आहेत. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. अशा आणखी दिग्गज नेत्यांनाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सामावून घेतले असते. कार्यकर्ते आधीच नाराज आहेत. आमदारांची तिकिटे कापली असती तर त्यांच्या नाराजीत भर पडली असती. या प्रकारामुळे भाजपची डोकेदुखी आणखी वाढली असती, हे टाळण्यासाठी भाजपने विद्यमान आमदारांनाच पुन्हा रिंगणात उतरवले आहे.
महाराष्ट्र हा गुजरात नाही, महाराष्ट्र हा हरियाणाही नाही, महाराष्ट्र हा महाराष्ट्रच आहे, हे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना दिसून आले आहे. विद्यमान आमदारांची तिकीटे कापली असती, तर भाजपसाठी ती नसती उठाठेव ठरली असती. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये आले, पण त्यांच्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार पराभूत झाला. तरीही भाजपला अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांना विधानसभेची उमेदवारी द्यावी लागली आहे.
महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री न करण्याचे धक्कातंत्र भाजपला खूप महागात पडले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपने धक्कातंत्राचा वापर न करता पहिल्या यादीत विद्यमान आमदारांना संधी दिली आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.