
Mumbai News : बहुचर्चित वक्फ विधेयक संसदेत मंजूर झाले. त्याचवेळी नितीश कुमार यांचा जदयू तर चंद्राबाबू नायडूंचा तेलुगु देसम पक्ष विधेयकाच्या बाजूने उभे राहिले. त्यांनी लोकसभा व राज्यसभेतही मतदानही बाजूनेच केले. टीडीपी व जेडीयू या दोन्ही पक्षांची आंध्र प्रदेश व बिहार या राज्यांमध्ये सत्ता आहे. या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लीम समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे वक्फ विधेयकावरील या दोन्ही राज्यात पडसाद उमटणार आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नितीश कुमार, चंद्राबाबूंच्या पक्षांत नाराजी दिसून येत आहे. वक्फ विधयेकाला संसदेत जदयूने पाठिंबा दिल्याने नाराज झालेल्या नेत्याने थेट राजनीमा देत कोंडी केली आहे. त्यामुळे सभागृहात जरी पाठिंबा दिला असला तरी बाहेर मात्र विरोध असेच चित्र दिसून येत आहे.
राज्यात पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होत असल्याने हे विधेयकाबाबत पक्षाची भूमिका महत्वाची मानली जात होती. आता विधेयक मंजूर होताच पक्षातील मुस्लिम नेत्यांची नाराजी चव्हाट्यावर येऊ लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार (NitishKumar) यांचे टेन्शन वाढणार आहे. पक्षातील अनेक मुस्लिम नेत्यांनी विधेयकाला समर्थन दिल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. विधेयक मंजूर होताच ही नाराजी उफाळून आली असून गुरूवारी एका नेत्याने राजीनामा दिला आहे.
बिहारमध्ये डिसेंबर अखेरीस विधानसभेच्या निवडणूक होत आहेत. त्यातच आता बहुचर्चित वक्फ विधेयक संसदेत मंजूर झाले आहे. त्यामुळे टीडीपी व जेडीयू (JDU) या दोन्ही पक्षासमोर पक्षांतर्गत आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच आता येत्या काळात पहिल्यांदाच बिहारमध्ये निवडणुका होत असल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. विशेषतः बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या समोरील अडचणी वाढणार आहेत. या वक्फ विधेयकाचे ‘साईड इफेक्ट्स’ आता भाजपच्या मित्रपक्षांना सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतरच टीडीपी, जेडीयू या दोन्ही पक्षांमधील अस्वस्थता समोर आली आहे. या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या बिहारमध्ये सत्ताधारी जदयूमधील दोन प्रभावी मुस्लीम नेत्यांनी पक्षाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. याशिवाय पक्षाचे चंपारण जिल्ह्यातील प्रमुख नेते मोहम्मद कासिम अन्सारी यांनी थेट पक्षाला सोडचिठ्ठी दिली. एकीकडे जदयूमधील नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेतली जात असताना काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीपूर्वी आणखीन काही घडामोडी घडणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वक्फ विधयेकाला संसदेत जदयूने पूर्ण पाठिंबा दिला आहे. तरी बाहेर मात्र विरोध दिसून आला आहे. जदयूचे सरचिटणीस आणि माजी राज्यसभा खासदार गुलाम रसूल बलयावी यांनी मुस्लीम संघटनांनी संयुक्त संसदीय समितीला सुचवलेल्या सुधारणा का दुर्लक्षित करण्यात आल्या? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे येत्या काळात या मुद्द्यावरून नितीशकुमार यांची चांगलीच कोंडी होणार आहे.
वक्फच्या मुद्दयावर पक्ष सोडणारे अन्सारी हे पहिले नेते ठरले आहेत. आणखी काही मुस्लिम नेते व पदाधिकारी नितीश कुमार यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. त्यामुळे पुढील काळात काही राजीनामे येऊ शकतात, अशी पक्षाला भीती आहे. त्याचा निवडणुकीतही पक्षाला फटका बसू शकतो. विरोधकांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वक्फचा मुद्दा प्रचारात आणला जाणार, हेही आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येत्या काळात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांची कोंडी होऊ शकते. त्यामुळे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगु देसम पक्षात सावधपणे प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षात कोणी उघडपणे नाराजी व्यक्त करीत नसले तरी त्यांनी पत्ते उघडले नाहीत. त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी विधेयकातील काही तरतुदींवर आक्षेप नोंदवला आहे. येत्या काळात या नोंदविण्यात आलेल्या आक्षेपाचे निरसन केले जाईल, असे चंद्राबाबू नायडूंनी यांनी सांगितले.
तेलुगु देसम पक्षानं संसदेत विधेयकातील एका तरतुदीत सुधारणेची मागणी करताना विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये त्यात बिगर मुस्लीम व्यक्तींच्या वक्फमधील समावेशाचा मुद्दा होता. मात्र, त्यानंतरही या पक्षातील काही नेत्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे ? त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तर दुसरीकडे पण दोन्ही पक्षांनी चर्चेदरम्यान मुस्लीम समुदायासाठीची आपली बांधिलकी अधोरेखित केली. या सर्व घडामोडी पाहता येत्या काळात टीडीपी, जेडीयू या दोन्ही पक्षासमोरील अडचणीत भरच पडणार आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.