Operation Tiger update : 'ऑपरेशन' करूनच खासदार फोडले! एकनाथ शिंदेंनी ओमराजे, आष्टीकरांना उघडे पाडले...

Eknath Shinde news : नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांनी काही लोकं आपल्याकडे आल्याचे सांगत त्यांनी खासदारांनी शिवसेनेत येण्यासाठी ऑफर दिल्याचाही दावा केला होता.
Nagesh Patil Ashtikar, Eknath Shinde, Omraje Nimbalkar
Nagesh Patil Ashtikar, Eknath Shinde, Omraje NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena UBT Crisis : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. रविवारी ओमराजेंसह नागेश पाटील आष्टीकर यांनी तसे अधिकृतपणे जाहीर केले. पण पक्षांतर करण्यासाठी त्यांनी विकास आणि निधीचे कारण दिले. हा आता ट्रेंडच झाला आहे. अन्य पक्षातील लोकप्रतिनिधी स्वत:हून आपल्याकडे येत असल्याचा दावा शिवसेनेतील नेते करत आहेत. पण त्यांचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हे फुलप्रुफ प्लॅनिंग करूनच केलेले ऑपरेशन असल्याचे स्पष्ट केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत पहिल्यांदाच उघडपणे ऑपरेशन टायगरवर भाष्य केले. आम्ही कुठलेही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही. तुम्हाला लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल, असे शिंदे म्हणाले होते. शिंदे यांचे हे विधान हलक्यात घेण्यासारखे नाही. उद्धव ठाकरे यांचे खासदार फोडण्यासाठी मागील काही महिन्यांपासून त्यांचे प्रयत्न सुरू असल्याची कुजबूज होती. त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांनी काही लोकं आपल्याकडे आल्याचे सांगत त्यांनी खासदारांनी शिवसेनेत येण्यासाठी ऑफर दिल्याचाही दावा केला होता. राजाभाऊंनी आपल्याकडे अशी कुठलीही ऑफर आली नाही, असे सांगितले असले तरी ते उघडपणे या गोष्टींवर बोलणार नाहीत, हे स्पष्टच आहे. त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या दाव्यानुसार, शिंदेंचे नेते खासदारांचे मन वळविण्यासाठी त्यांना विविधप्रकारच्या ऑफर देत होते, हे उघड आहे.

Nagesh Patil Ashtikar, Eknath Shinde, Omraje Nimbalkar
Rahul Gandhi News : भाऊबंदकी सुरू; राहुल गांधींना मिळाला नवा 'भाऊ', पण दगाफटका होण्याची धास्ती...

ऑपरेशन अर्धवट सोडत नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी एकप्रकारे ते मान्यही केले आहे. त्याआधी ओमराजे आणि आष्टीकरांनी आपण विकास आणि निधीसाठी सत्तेत असलेल्या शिवसेनेत जात असल्याचे म्हटले आहे. ते स्वत:हून लोकहितासाठी जात असल्याचे त्यांना सांगायचे होते. आपण मतदारसंघातील नेत्यांशी बोलून निर्णय घेऊ असे ओमराजे सांगत होते. त्यानुसार रविवारी त्यांनी बैठक घेतली आणि नंतर आपला निर्णय जाहीर केला. पण मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा आमदारांनी आठवडाभरापूर्वीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले आहे. असे असेल तर ओमराजे त्यांच्या मतदारांसमोर उघडे पडले आहेत, हे स्पष्ट होते.

ऑपरेशन टायगरची कबुली देत एकनाथ शिंदे यांनी ओमराजे आणि आष्टीकरांचा बुरखा फाडला आहे. इतर चार खासदारही पुढील काही तासांत पुढे येऊन विकास आणि निधी, खासदार संजय राऊतांची भाषा वगैरे अशी कारणे देतील. आष्टीकर यांनी तर कहरच केला. १८ जूनपर्यंत आपण कुठेही गेलो नव्हतो, असे ते बोलले. पण तेच आष्टीकर १७ तारखेच्या पक्षाच्या दिल्लीतील बैठकीला हजर राहिले नाहीत. त्यादिवशी त्यांच्यासह काही खासदार दिल्लीतच असल्याचा दावाही केला जात होता. ओमराजे पुण्यात असूनही मुंबईतील पक्षाच्या बैठकीला मातोश्रीवर गेले नाहीत. मात्र, नंतर कोर्टाच्या निकालादिवशी ते मुंबईत आले.

Nagesh Patil Ashtikar, Eknath Shinde, Omraje Nimbalkar
Shiv Sena UBT Crisis : खासदार वडिलांनी ठाकरेंना सोडलं, 'फादर्स डे'दिवशीच 'मातोश्री' गाठणारी लेक कोण?

खासदारकी वाचावी म्हणून दोन तृतियांश आकडा गाठण्यासाठी एका पक्षाच्या सहा खासदारांना एकत्र आणणे, पक्षाला त्याची कुणकुणही न लागू देता बैठका करण्यासाठी सगळी जुळवाजुळव कोण करू शकते? ऑपरेशन टायगर हे मागील काही महिन्यांपासून सुरू होते, त्याच्या बातम्या अधूनमधून येत होत्या. केवळ वाटाघाटींमध्ये वेळ गेल्याचीही चर्चा आहे. काही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपद हवे असल्याचीही चर्चा आहे. खासदार संजय राऊत यांनी तर थेट पैशांचा आकडाही सांगितला. आदित्य ठाकरेंनीही निष्ठा विकल्याचे म्हटले आहे. हे दावे, आरोपांमध्ये तथ्य आहे किंवा नाही, हे ऑपरेशन करणारे आणि त्यामध्ये सहभागी खासदारच सांगू शकतील. हे आरोप, टीका होण्यालाही खासदारच जबाबदारी नाहीत का?

खासदार संजय जाधव यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात उघडपणे आपण आज पक्षात आहोत, उद्याचे माहिती नाही, असे म्हणाले होते. संजय दिना पाटील हे मुंबईतील बैठकीला खूप उशिराने दाखल झाले. मात्र, नंतर ते दिल्लीच्या बैठकीला दिसले नाहीत. संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे यांनीही पक्षाच्या दोन्ही बैठकांना उपस्थित राहणे टाळले. या सहाही खासदारांनी अत्यंत नियोजनपूर्वक शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com