
New Delhi News : जगदीप धनखड यांनी दोनच दिवसापूर्वी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता उपराष्ट्रपती पदाची संधी कोणाला दिली जाणार? याची उत्सुकता लागली आहे. येत्या काळात लवकरच उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेतली जाणार असल्याने भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. त्यामुळेच भाजपकडून यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव केली जात आहे. उपराष्ट्रपती पदासाठी पीएम मोदींचे सर्वात विश्वासू केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे नाव आघाडीवर आहे. राजनाथ सिंह यांच्या कार्यालयातून धनखड यांच्या राजीनाम्याची सूत्र फिरली होती.
भाजपकडून (BJP) उपराष्ट्रपती पदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून काही नावाची चाचपणी केली जात आहे. या पदासाठी भाजपकडून तीन नावाची चर्चा आहे. त्यामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे नाव चर्चेत आहे. या तीन नावापैकी एका नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. पीएम नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्याठिकाणाहून परतल्यानंतर उपराष्ट्र्पती पदाचा उमेदवार ठरविणार असल्याचे समजते. त्यामुळे ते कोणाचे नाव सुचविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्यस्थितीत भाजपकडे लोकसभेत व राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे भाजपला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळेच भाजपकडून मित्रपक्षाला रुचेल अशा नावाची घोषणा करावी लागणार आहे. त्यामुळे सध्य परिस्थितीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव सर्वसमावेशक ठरेल असे आहे. त्यांच्या नावाला कोणाचाही विरोध होणार नसल्याने राजनाथसिंह (Rajnath singh) यांच्या नावावरच भाजपकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
राजनाथसिंह यांनी संरक्षण, गृह, कृषी या खात्याची जबाबदारी सांभाळली आहेत. त्यांना संसदीय कामकाज खात्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. या सर्व खात्यांचा विस्तृत अनुभव पाहता जे उपराष्ट्रपतीच्या संवैधानिक आणि प्रतिनिधिक भूमिकेसाठी उपयुक्त ठरणारा आहे. त्याशिवाय लोकसभा, राज्यसभा संबंध सांभाळण्यात त्यांचा हातखंडा आहे.
2022 मध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यावेळी देखील पहिल्यांदा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे नाव समोर आले होते. मोदी सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहेत. त्याशिवाय ते 2005ते 2009 या काळात तर गडकरी यांनी राजीनामा दिल्याने 2013 ते 2014 भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. त्याशिवाय ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री देखील होते. सोबतच गेल्या 11 वर्षाच्या कारकिर्दीत ते केंद्रीयमंत्री आहेत. त्यामुळे या पदासाठी आता राजनाथ सिंह यांचे नाव आघाडीवर आहे.
उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील भाभौरा गावात राजनाथ सिंह यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीने प्रेरित होते. वयाच्या 13 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. 1972 मध्ये ते मिर्झापूरचे शाखा कार्यवाह होते. 1969 ते 1971 दरम्यान ते गोरखपूरमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (आरएसएसची विद्यार्थी शाखा) चे संघटनात्मक सचिव होते. 1970 च्या दशकात, सिंग जयप्रकाश नारायण यांच्या जेपी चळवळीने प्रभावित झाले होते. 1975 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात जेपी चळवळीशी संबंध असल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती आणि 2 वर्षांच्या कालावधीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
तुरुंगातून सुटल्यानंतर, सिंग जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेल्या जनता पक्षात सामील झाले आणि 1977 मध्ये मिर्झापूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांनी यशस्वीरित्या निवडणूक लढवली आणि मिर्झापूरमधून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1980 मध्ये ते भाजपमध्ये सामील झाले आणि पक्षाच्या सुरुवातीच्या सदस्यांपैकी एक होते.
राजनाथसिंह यांनी यापूर्वी 2000 ते 2002 पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि 1999 ते 2000 पर्यंत वाजपेयी सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि 2003 ते 2004 पर्यंत कृषी मंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2014 पासून लखनौमधून लोकसभेचे आणि 2009 ते 2014 पर्यंत गाझियाबादमधून सदस्य होते. ते 2002 ते 2008 आणि 1994 ते 2001 पर्यंत राज्यसभेचे सदस्य देखील होते.
राजनाथसिंहाच्या नावाला 'आरएसएस'चा पाठिंबा
भाजपसोबतच उपराष्ट्रपती पदासाठीच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पसंती असणे गरजेचे आहे. त्यामुळे राजनाथसिंह यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही समर्थन मिळणार आहे. त्यासोबतच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील मित्र पक्ष असेलल्या तेलगु देसम, संयुक्त जनता दल (जेडीयू) यांच्यासह एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष यांच्याशी राजनाथ सिंह यांचे संबंध चांगले राहिल्याने त्यांना या सर्व पक्षाचा पाठिंबा मिळणार आहे.
उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक जिकंण्यासाठी 394 मताची आवश्यकता आहे. लोकसभेत 542 सदस्यांमध्ये इंडिया आघाडीला 293 खासदारांचा पाठींबा आहे तर राज्यसभेच्या 285 सदस्यापैकी 129 सदस्याचा पाठींबा आहे. राज्यसभेत सध्या पाच तर लोकसभेत एक अशा एकूण सहा जागा रिक्त आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 786 पैकी 422 सदस्यांचे समर्थन असून या बहुमतावर त्यांचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उपराष्ट्रपती पदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव आघाडीवर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.