Eknath Shinde : 50 खोके,एकदम ओके घोषणा शिंदे गटाचा पिच्छा सोडणार नाही...

Shivsena Political News : गेल्यावर्षी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी अन्य काही नवीन घोषणा दिल्या होत्या
Eknath Shinde Shivsena
Eknath Shinde Shivsena Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेनेच्या भाषेत फुटीरांचा उल्लेख गद्दार असा केला जातो. छगन भुजबळ, नारायाण राणे यांच्यासह अनेकांच्या नावासमोर हे बिरूद लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांचीही यातून सुटका झाली नाही. या बिरुदासह अनेक घोषणाही त्यांच्या वाट्याला आल्या. 50 खोके एकदम ओके ही घोषणा तर राज्यातील घराघरांत पोहोचली. त्यानंतर गेल्यावर्षी अधिवेशनात विरोधकांनी फुटीरांसाठी आणखी काही घोषणा शोधून काढल्या होत्या.

गेल्यावर्षी 19 डिसेंबरला विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन सुरू झाले होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. 50 खोके, एकदम ओके, 50 खोके, माजले बोके, गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी, कर्नाटक तुपाशी, महाराष्ट्र उपाशी, खाऊन महाराष्ट्राची भाकरी, करतात गुजरातची चाकरी, विदर्भावर अन्याय करणाऱ्या ईडी सरकारचा धिक्कार असो, महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो... आदी घोषणांनी विधानभवनाचा परिसर दणाणून गेला होता.

Eknath Shinde Shivsena
Pune ACB News : पोलिसांचं चाललंय काय? तीन दिवसांत दुसरा जमादार पकडला

आता सरकारमध्ये सहभागी असलेले अजित पवार, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हेही यावेळी उपस्थित होते. मुंडे हे घोषणेचा फलक हाती घेऊन सर्वात समोर उभे होते. आता शिंदे गटात गेलेल्या मनिषा कायंदे यांनीही त्यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.

राज्यात येणारे काही मोठे प्रकल्प गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातेत गेले होते. त्यामुळे सरकारवर मोठी टीका सुरू झाली होती. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ केलेली घोषणाबाजी त्याचाच परिणाम होता. वेदांता-फॉक्सकॉनचा एक लाख 54 हजार कोटी रुपयांचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातेत हलवण्यात आला, त्यामुळे राज्यात रणकंदन माजले होते. त्यानंतर टाटा एअरबसचा 21,395 कोटी रुपयांचा प्रकल्पही गुजरातेत नेण्यात आला होता. हा प्रकल्प नागपूर येथे होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी जाहीर केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती असते, असे असतानाही अनेक प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. गुंतवणूक आणण्यासाठी सर्वच राज्यांत स्पर्धा असतो, मात्र महाराष्ट्र आणि गुजरातमधे हा वाद वेगळ्या वळणावर जातो. त्याला राजकीय स्वरूप प्राप्त होते. गुजरातचे राज्यकर्ते महाराष्ट्रावर राग काढत आहेत, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून असे प्रकार वाढले आहेत, अशी चर्चा सुरू होते. (Shivsena)

50 खोके एकदम ओकेच्या त्रासातून मुक्तता झालेली नसतानाच सरकारवर अशा अन्य घोषणांचा पाऊस त्यादिवशी विरोधकांनी पाडला होता. 50 खोके...च्या घोषणाने शिंदे गटातील आमदारांच्या नाकीनाऊ आणले होते. शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावरही बाका प्रसंग उद्भवला होता. आम्ही दिसलो की लोक 50 खोके...अशी घोषणा देतात, एका कार्यकमात आपल्याला तसा अनुभव आला होता, असे बच्चू कडू यांनी जाहीरपणे सांगितले होते.

Eknath Shinde Shivsena
Pune BJP Office : मुरलीधर मोहोळ, धीरज घाटेंना भाजपसाठी कुणी ऑफिस देता का ऑफिस! पण...

आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनाही तसाच अनुभव आला होता. ही घोषणा गावोगावी पोहोचली आहे. यापुढेही ही घोषणा शिंदे गटाच्या आमदारांचा पिच्छा सोडणार नाही, असेच चित्र आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde Shivsena
Shivsena: 'गल्लीबोळातील नेत्या' म्हणणाऱ्या फरांदेंना अंधारेंनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाल्या...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com