Abhishek Ghosalkar Shot Dead : गोळ्या सुटताहेत....धमक्या घुमताहेत! लोक म्हणताहेत.... 'हम जायें तो जाये कहां ?

Abhishek Ghosalkar Case :अभिषेक घोसाळकरांवरील गोळीबाराचा व्हिडिओ विचलित करणारा, मन सुन्न करणारा
Abhishek Ghosalkar Shot Dead : गोळ्या सुटताहेत....धमक्या घुमताहेत! लोक म्हणताहेत.... 'हम जायें तो जाये कहां ?

Abhishek Ghosalkar Shot Dead : काहीजण बोलत बसले आहेत, त्याचे फेसबुक लाइव्ह करत आहेत आणि अचानक त्यातील एकजण दुसऱ्यावर गोळीबार करतो... शिवसेनेचे युवा नेते (ठाकरे गट) अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार पाहिलाय का? पहिल्या गोळीने त्यांच्या छातीचा वेध घेतल्यानंतर ते जिवाच्या आकांताने ओरडायला लागतात... ते पाहून मन सुन्न होते, विचलित होते, निराशा दाटून येते आणि एका अनामिक भीतीने मन ग्रासून जाते... राजकारण्यांचे, सत्ताधाऱ्यांचे सुशासनाचे दावे भुर्रकन उडून जातात. अभिषेक यांचा जीव तर गेलाच, त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिस या गुंडानेही स्वतःवर गोळ्या झाडून घेत आपले जीवन संपवले.

माणसाचा जीव इतका स्वस्त असतो का, राजकीय नेत्यांची अशी अवस्था असेल तर सामान्य माणसाने काय करावे? गेल्या काही दिवसांत झालेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे राज्यातील सामान्य नागरिक गर्भगळीत झाले आहेत. तुम्हाला काय करायचे ते करा, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे, असे जाहीर वक्तव्य केलेल्या नेत्याचे संबंधितांनी वेळीच कान पिळायला हवे होते. त्यामुळेच या गोळीबाराच्या घटना घडल्या, असे म्हणता येणार नाही. मात्र, त्या नेत्याचे ते जाहीरपणे केलेले विधान अराजकता निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरू शकते, सत्तेच्या छत्रछायेखाली असलेल्या गुंडांचे मनोबल वाढवू शकते. सत्ता, पैसा आणि त्यातून पुन्हा सत्ता आणि राजकारण हे समीकरण तसे जुनेच आहे. मतांची पोळी भाजून घेण्यासाठी, आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी काही राजकीय नेते गुन्हेगारांना जवळ करतात, त्यांना अभय देतात. अशा गुन्हेगारांसोबत जायचे का, त्यांच्यासोबत मैत्री करायची का, यावर अभिषेक घोसाळकर प्रकरणानंतर राजकीय नेत्यांनी विचार करायला हवा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Abhishek Ghosalkar Shot Dead : गोळ्या सुटताहेत....धमक्या घुमताहेत! लोक म्हणताहेत.... 'हम जायें तो जाये कहां ?
Abhishek Ghosalkar Shot Dead : इतना सन्नाटा क्यो हैं भाई...? अभिषेकच्या हत्येनंतर घोसाळकर कुटुंबीय पुरते हादरले

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या एका नेत्यावर गोळीबार केल्याचे प्रकरण ताजेच आहे. एक आमदार पोलिस ठाण्यात एका नेत्यावर गोळीबार करतो, ही घटना राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे स्वास्थ्य बिघडल्याची निदर्शक होती. मुख्यमंत्री, काही नेत्यांसोबत गुंडांचे फोटोही छापून आल्याचे राज्याने नुकतेच पाहिले आहे. महायुतीचे सरकार गुंडांना आश्रय देत आहे, साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी सत्ताधारी गुन्हेगारांचा आधार घेत आहेत, या विरोधकांच्या आरोपात तथ्य वाटावे, अशा घटना राज्यात घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात एका गुंडाचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून करण्यात आला. राज्यात अशा घटना वाढणार, याचे ते संकेत तर नव्हते, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

सामान्य नागरिकांच्या समस्या वेगळ्या असतात. महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे. राज्यात धर्माच्या आधारावर जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही नेत्यांकडून सातत्याने केले जात आहेत. निवडणुका जवळ यायला लागल्या, की एका विशिष्ट समुदायावर आगपाखड सुरू होते. आताही तसेच होऊ लागले आहे. काही नेते जाहीर सभांमध्ये प्रक्षोभक, चिथावणीखोर विधाने करत आहेत. लोकांच्या मूळ समस्या बाजूला पडत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाकडे, महागाई, बेरोजगारीकडे नागरिकांचे लक्ष जाऊ नये, यासाठी अशा पद्धतीने आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. हे कमी की काय म्हणून आता राज्यात गोळीबाराच्या घटना घडत आहेत.

अभिषेक घोसाळकर यांना पहिली गोळी लागते, ते दृश्य नागरिकांचे मन विचलित करणारे आहे, मनात अनामिक भीतीचा काहूर माजवणारे आहे. राजकीय नेत्यांना गुंडांची साथ का लागते, ते गुंडांसोबत उठ-बस का करतात? याची उत्तरे समाजाला मिळायला हवीत. राज्यातील अनेक भागांत राजकीय नेत्यांनी असे गुंड पोसले आहेत. त्याचा उद्रेक कधी ना कधी होणारच आहे. हा भस्मासुर कधी ना कधी राजकीय नेत्यांवरही उलटणारच असतो. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. या प्रकरणाचे राजकारण करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मग त्यांचेच काही नेते न घडलेल्या घटनांवरून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत, याचाही विचार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी भाजप नेते म्हणून शक्य नसेल, तर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून तरी नक्कीच करायला हवा.

अभिषेक घोसाळकर यांच्या खुनाचे दुःख हे त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित राहिले नाही. गोळीबाराच्या या घटनेमुळे समाजमन हादरून गेले आहे. सरकारची प्रतिमा डागाळली आहे. गुंडांमध्ये इतकी हिम्मत येते कुठून, सरकारचा, पोलिसांचा गुन्हेगारांना धाक राहिला नाही का, असे प्रश्न समाजाला पडत आहेत. हीच घटना बिगरभाजप सरकारच्या राज्यात किंवा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना घडली असती, तर देवेंद्र फडणवीस आणि अन्य सत्ताधारी नेत्यांची प्रतिक्रिया काय राहिली असती? प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा आहे, राज्यात शांतता प्रस्थापित करण्याचा आहे. त्यामुळे गुन्हेगारांचा बीमोड करणे, असे दुर्दैवी प्रकार टाळणे हे कोणत्याही सरकारचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. सत्ता काय, येत राहील आणि जातही राहील.

Edited By : Rashmi Mane

R

Abhishek Ghosalkar Shot Dead : गोळ्या सुटताहेत....धमक्या घुमताहेत! लोक म्हणताहेत.... 'हम जायें तो जाये कहां ?
Abhishek Ghosalkar Death: जालना, पुणे, उल्हासनगर अन् आता दहिसर...; महाराष्ट्र बनला 'गोळीबार' मैदान!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com