Shivsena Politics: शिवसेनेच्या फुटीनंतर दुसऱ्या फळीतील नेत्यांना मोठी संधी; अनेक नवे चेहरे आले समोर

Thackeray group : संकटातून मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे ठाकरे गटासमोर आव्हान
Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav Thackeray Sarkarnama

Political News: गेल्यावर्षी शिवसेनेत फूट पडली. बाहेर पडलेल्या आधीच्या बहुतांश मंत्र्यांची पदे कायम राहिली. बच्चू कडू यांच्या सारख्यांना मात्र आधी होते ते राज्यमंत्रिपदही गमवावे लागले. खासदार गजानन कीर्तिकर स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष होते. ते शिंदे गटात गेल्यामुळे हे अध्यक्षपद अनिल देसाई यांना मिळाले. याप्रमाणेच संघटनेतही अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. प्रस्थापितांच्या प्रभावाखाली दबून राहिलेले अनेक तरुण चेहरे समोर आले.

अनिल देसाई हे शांत स्वभावाचे आहेत. पक्षाची धोरणे ठरवणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. शिवाय ते ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय समजले जातात. कीर्तिकर शिंदे गटात दाखल झाल्यामुळे स्थानिय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदावर अनेकांचा डोळा होता. मात्र, देसाई यांची वर्णी लागली. भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांच्या रोजगाराच्या हक्काचे रक्षण व्हावे, यासाठी ही समिती काम करते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Maratha Reservation : फडणवीसांच्या हस्ते कार्यक्रम; पाऊण तासाच्या चर्चेनंतर जरांगेंनी BJP आमदाराला दिला मोठा शब्द

शिवसेनेशी संलग्न ही समिती भूमिपुत्र आणि मराठी भाषकांसाठी काम करणारी संघटना असून, दहा हजारांपेक्षा अधिक सदस्य आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील विमान वाहतूक, रेल्वे, संशोधन, विमा, तेल आदी केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांच्या कार्यालयांत ही समिती सक्रिय आहे. राज्यातील ८० टक्के नोकऱ्या मराठी भाषकांना मिळाव्यात, असा समितीचा प्रयत्न असतो.

संकटात संधी शोधणाऱ्यांचा उत्कर्ष होतो. फुटीनंतर शिवसेनेनेही तसा प्रयत्न केला आहे. त्याला किती यश मिळेल, हे आगामी निवडणुकांनंतर दिसून येईल. देसाई यांच्याप्रमाणे अंबादास दानवे यांनाही फुटीमुळे संधी मिळाली. त्यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळाले. आपल्या कामाची चुणूक दाखवत दानवे यांनी या संधीचे सोने केले आहे.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Sharad Pawar Amit Shah : रामलल्लाच्या नावाने मते मागणाऱ्या अमित शाहांना पवारांनी दाखवला आरसा

संघटनात्मक पातळीवरही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य माणसांना संधी दिली. ड्रायव्हर, रिक्षाचालक अशा लोकांना त्यांनी आमदार, खासदार, मंत्री केले. अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेले असे लोकही कालांतराने प्रस्थापित झाले. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळणे अवघड झाले होते.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर मात्र दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांसाठी भली मोठी स्पेस निर्माण झाली. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी बाळा नांदगावकर या तरुण चेहऱ्याला संधी दिली होती. शिवसेना सोडून भुजबळ काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत नांदगावकर यांनी भुजबळ यांचा दणदणीत पराभव केला होता.

शिवसेनेचे ४० आमदार सोडून गेले आहेत. या ४० मतदारसंघात नवी फळी तयार करण्याची संधी ठाकरे गटाला उपलब्ध झाली आहे. काही आश्वासक चेहरे समोर येत आहेत. फुटीनंतरच सुषमा अंधारे यांच्यासारख्या चळवळीतल्या नेत्या शिवसेनेला मिळाल्या आहेत.

अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रा काढून शिंदे गटाला घाम फोडला होता. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना शिंदे गटाकडून समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. ठिकठिकाणी अशा नव्या चेहऱ्यांना पुढे आणत संकटात संधी शोधण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Edited by : Ganesh Thombare

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Maratha Reservation : जरांगे पाटील नाशिकला येऊन पुन्हा भुजबळांची झोप उडविणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com