Sindhudurg Political News : कोकणाची ओळख ही शिवसेनेचा बालेकिल्ला अशीच कायम राहिली आहे. त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरेविरुद्ध नारायण राणे हा संघर्ष कायम पहावयास मिळतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश या मध्ये आहे. या तीन मतदारसंघांत वेगवेगळ्या पक्षाचे आमदार नेतृत्व करतात.
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Ncp) पडलेल्या उभ्या फुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
नुकत्याच झलेल्या लोकसभा निवडणुकीत कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड या दोन मतदारसंघात भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी विजय मिळवला. त्यामुळे महाविकास आघाडी बॅकफूटवर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लोकसभेनंतर तळकोकणातील राजकारण वेगळं वळण घेण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमध्ये विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांचे सत्र सुरु आहे.
विधानसभेची मोर्चेबांधणी करण्यासाठी राजकीय नेत्यांच्या बैठकांचा धडाका लागला आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कोकणात ठाकरेविरुद्ध राणे असा संघर्ष पाहावयास मिळणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षीय बलाबल :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ असून तळकोकणात कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. कुडाळ विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे आमदार आहेत. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी एक तर महायुती दोन असे चित्र आहे.
विधानसभानिहाय आमदार व पक्ष
कणकवली मतदारसंघ: नितेश राणे (भाजप)
कुडाळ मतदारसंघ: वैभव नाईक (शिवसेना ठाकरे गट)
सावंतवाडी मतदारसंघ : दीपक केसरकर (शिवसेना शिंदे गट)
2019च्या निवडणुकीत काय झाले होते ?
कणकवली मतदारसंघ:
कणकवली मतदारसंघात गेल्या दोन टर्मपासून नितेश राणे आमदार आहेत. या वेळेस तेच उमेदवार असल्याने त्यांना हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. 2019 मध्ये नारायण राणे यांना सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटामध्ये गेलेले सतीश सावंत यांनी नितेश राणेंविरोधात लढत दिली होती.
त्यांचा राणेंनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. यातच कणकवली मतदारसंघातून नितेश राणेंनी लोकसभेच्या निवडणुकीत नारायण राणे यांना 42 हजाराचे मताधिक्य मिळवून देत आपली पकड भक्कम केली आहे.
या मतदारसंघात भाजप सोडून अजून कोणत्याही राजकीय पक्षाने दावा केलेला नाही. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार कोण हा प्रश्नचिन्ह कायम आहे. यंदाच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार त्यानंतर उमेदवार ठरणार आहे. येत्या याकाळात कणकवली विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे.
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ :
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचे वर्चस्व कायम आहे. या मतदारसंघातून त्यांनी दोन टर्म पूर्ण केल्या आहेत यावेळेस त्यांना हॅट्ट्रीकची संधी आहे.
2019 च्या निवडणुकीत नारायण राणे यांचे शिलेदार रणजीत देसाई या मतदारसंघातून उभे होते. त्यांचा पराभव करत वैभव नाईक विधानसभेत निवडून गेले. 2024 मध्ये वैभव नाईक यांच्यासमोर नवी आव्हानं उभी राहिली आहेत. या मतदारसंघांमध्ये भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एक वर्षापासून या मतदारसंघांमध्ये कामांचा जोरदार धडका लावला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून नारायण राणे यांनी 26 हजार 236 इतके मताधिक्य मिळवले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक हे 14 हजार 349 हजारांचं मताधिक्य मिळवत विजयी झाले होते.
परंतु यंदा आव्हानं उभी ठाकल्याने वैभव नाईक यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटला तर याठिकाणी भाजपकडून निलेश राणे यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे या ठिकाणी उमेदवार कोण असणार याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ:
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. याठिकाणी मंत्री दीपक केसरकर यांचे वर्चस्व आहे. केसरकर यांनी सलग तीन टर्म या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. चौथ्या टर्मसाठी ते मैदानात उतरणार आहेत. शिवसेनेत फूट पडण्याआधी ते निवडून आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी फारकत घेत शिंदे गटामध्ये ते सहभागी झाले आहेत. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्या राजकीय नाट्यानंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणुक लागली आणि लोकसभेचे उमेदवार असलेले आणि भाजपचे नेते नारायण राणे यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून 37 हजाराचं मताधिक्य मिळवून दिले आहे. त्यामुळे विधानसभेत हा आकडा कायम ठेवल्यास आमदारकी दीपक केसरकर यांच्या पदरात पडू शकते.
या मतदारसंघावर महायुतीचे मित्रपक्ष असलेले भाजपचे नेते माजी आमदार राजन तेली यांचा देखील दावा केला आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांची यंदा डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाला सुटणार याची उत्सुकता लागली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना घारे देखील गेल्या एक वर्षापासून या मतदारसंघांमध्ये तयारी करत आहेत. त्यामुळे कोण-कोण निवडणूक रिंगणात उतरणार याची उत्सुकता आता पासूनच शिगेला पोचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.