Uddhav Thackeray News : लोकहो, भाजपा महाराष्ट्र या हँडलवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात केलेले ट्विट तु्म्ही वाचले आहे का? वाचले नसेल तर जरूर वाचा, मग तुमच्या लक्षात येईल की, देशाचे राजकारण कोणत्या दिशेला चालले आहे. तुम्ही तिकीट काढून एखाद्या आरामदायी रेल्वेतून प्रवास करत असाल तर तुम्ही सरकारचे लाभार्थी झाला आहात!
देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यावेळी बिकट अवस्था होती. नंतर टप्प्याटप्प्याने औद्योगिकरण झाले, सिंचनाच्या, दळणवळणाच्या, शिक्षण, आरोग्य आदी सुविधा उपलब्ध झाल्या. हे सगळे 2014 पूर्वी झाले होते. कायम निवडणुकीच्या मोडवर राहणाऱ्या, एकच गोष्ट वारंवार सांगितली की ती लोकांना खरी वाटते, असे समजून चालणाऱ्या भाजप नेत्यांना मात्र सत्तेच्या धुंदीत काही गोष्टी कळत नाहीत की काय, अशी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. वंदे भारतच्या आधीही आरामदायी रेल्वेगाड्या उपलब्ध होत्या, याचा विसर भाजपला पडला आहे.
शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी नुकताच वंदे भारत रेल्वेने प्रवास केला. त्याचे फोटो भाजपा महाराष्ट्र या हँडलवरून ट्विट करण्यात आले आहेत. मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदे भारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार... मोदी सरकार! असे फोटोसोबत लिहिले आहे. कोणतेही सरकार जनतेला सेवा-सुविधा उपलब्ध करून देते म्हणजे काही उपकार वगैरे करत नाही. ते सरकारचे कामच असते आणि या सुविधा सशुल्क असल्या तर उपकाराचा विषयच नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी तिकीट काढूनच वंदे भारत रेल्वेने प्रवास केला असणार. मग लाभार्थी होण्याचा विषय काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह भाजपचे अन्य नेते कोणत्या शाळांमध्ये शिकले आहेत, त्या शाळा कुणी सुरू केल्या होत्या, भाजप नेते विमानात प्रवास करत असतील, ती विमानसेवा कुणी सुरू केली होती? या सर्व सुविधा काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेल्या आहेत. भाजपा महाराष्ट्रचा (BJP Maharashtra) निकष लावला तर मग पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्व भाजप नेते काँग्रेस सरकारचे लाभार्थी आहेत, असे म्हणावे लागेल. विषय असा लांबत जाईल. हा विषय कुणीही लांबवणार नाही, अशी खात्री भाजपला झाली असेल का? ती झाली असेल तर कशाच्या बळावर? असे प्रश्न उपस्थित होतात.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजकीय आरोप-प्रत्यारोप नित्याचेच असतात. त्याबाबत आक्षेप असण्याचे कारण नाही. पण आता गोष्ट लोकांच्या अधिकारांवर आली आहे. एका माजी मुख्यमंत्र्यांबद्दल भाजप नेते असा विचार करत असतील सामान्य लोकांचे काय होणार? एखाद्याने सशुल्क सेवेचा वापर केला तर तोही आमच्या राज्यात लाभार्थी आहे, हे भाजपला लोकांच्या मनावर बिंबवायचे आहे. या कामासाठी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची निवड केली आहे.
वंदे भारतच्या आधीपासून अनेक आरामदायी रेल्वेगाड्या धावत आहेत. काही काँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या आहेत. एकीकडे वंदे भारतसारख्या आरामदायी गाड्या सुरू झाल्या असल्या तर दुसरीकडे जनरल डबे खचाखच भरलेले असतात. पुण्यासारख्या शहरातून उत्तरेकडील राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांचे किती हाल होतात, खचाखच भरलेल्या डब्यांतून त्यांना किती यातना सहन करत प्रवास कारावा लागतो, हे भाजपा महाराष्ट्राने पाहायला हवे आणि मग त्याचेही श्रेय घेण्याचे धारिष्ट्य दाखवायला हवे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.