
Ahilyanagar News : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक होतआहे. या पाचही रिक्त जागा सत्ताधारी महायुतीच्या असल्याने त्यावर महायुतीचेच आमदार होणार आहेत. नगर जिल्ह्यातही महायुतीतील (Mahayuti) सात जण विधानपरिषदेच्या आमदारकीचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र, त्यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.
भाजपचे कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडे हे दोन प्रबळ दावेदार आहेत. कोल्हे यांनी कोपरगावचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार आशुतोष काळे यांच्यासाठी विधानसभा मैदानातून माघार घेतली व काळेंच्या विजयात हातभार लावला होता. तर कानडे यांचा महायुतीतील बंडखोरी व अपक्ष उमेदवारामुळे झालेल्या मतविभागणीत पराभव झाला होता.
आता मात्र, कोल्हे व कानडे यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावून वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डींग लावली तर त्यांच्यापैकी किमान एकाची विधानपरिषदेवर वर्णी लागू शकते. उमेदवारी दाखल करण्याची 17 मार्च रोजी अंतिम मुदत असून, याच दिवशी याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विधान परिषदेचे आमदार असलेले शिवसेना शिंदे गटाचे आमशा पाडवी (अक्कलकुवा), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर (पाथरी) तर भाजपचे प्रवीण दटके (नागपूर मध्य), गोपीचंद पडळकर (जत) आणि रमेश कराड (लातूर ग्रामीण) हे पाच जण विधानसभेवर निवडून आल्याने त्या रिक्त जागांसाठी येत्या 27 मार्चला पोटनिवडणूक होत आहे.
या रिक्त जागांपैकी भाजपच्या तीन तसेच अजितदादा गट व शिंदे सेनेची प्रत्येकी एक जागा आहे. त्यामुळे याच निकषानुसार संभाव्य उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. 17 मार्चला उमेदवारी दाखल करतानाच ही निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे ही स्पष्ट होईल.
विधानपरिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड मतदार संघाच्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी त्यांची विधानपरिषद आमदारकी शाबूत आहे. त्यांना आता विधान परिषदेच्या सभापतीपदाची संधी मिळाल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले. मात्र, नगर जिल्ह्यातून विधानपरिषदेवर महायुतीकडून संधी मिळण्याची आशा आणखी सात जणांना आहे. भाजपचे विवेक कोल्हे (कोपरगाव), सदाशिव लोखंडे (शिर्डी), सत्यजित कदम (देवळाली प्रवरा-राहुरी) व अभय आगरकर (अहिल्यानगर) या चार जणांसह अजितदादा गटाचे लहू कानडे (श्रीरामपूर), सुजित झावरे (पारनेर) व अविनाश आदिक (श्रीरामपूर) या तिघांच्या समर्थकांना आशा आहे.
नगर जिल्ह्यात शिंदे सेनेचे अमोल खताळ व विठ्ठल लंघे हे दोन आमदार असले तरी ते दोघेही मूळचे भाजपचे आहेत व संघटनात्मक विचार केला तर शिंदे सेनेने जिल्ह्यात अजून बाळसे धरलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रभावी व्यक्तिमत्व विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चर्चेत नाही. कोल्हे व कानडे यांचे पारडे तसे जड आहे.
कोपरगाव विधानसभा निवडणुकीत बंडखोरीच्या तयारीत असलेले विवेक कोल्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर मागे फिरले व तेथील अजितदादा गटाचे आशुतोष काळे यांच्या विजयात त्यांनी योगदान दिले. तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार असताना उमेदवारीचा पत्ता कट झाल्यावर अजितदादा गटाकडे जाऊन श्रीरामपूरची उमेदवारी मिळवणारे लहू कानडे यांना शिंदेसेनेचे स्वयंघोषित उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे व हिंदुत्ववादी अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्यामुळे झालेल्या मतविभागणीचा फटका बसला व पराभव पत्करावा लागला.
मात्र, आता अजित पवार पक्षाने (Ajit Pawar) त्यांना पक्षाचे प्रदेश उपाध्यक्षही केले आहे. त्यामुळे विधान परिषदेची उमेदवारी त्यांना अजितदादांकडून दिली जाते की नाही, याची उत्सुकता आहे. दरम्यान, विधान परिषदेवर प्रा. राम शिंदे व सत्यजित तांबे असे दोन आमदार जिल्ह्यातील आहेत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नसल्याने या मतदार संघातील विधान परिषद आमदारकीची जागा रिक्त आहे.
रिक्त जागांमध्ये महाविकास आघाडीची एकही जागा नाही. त्यामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या इच्छुकांमध्ये निराशा आहे. मविआकडून जिल्ह्यात बाळासाहेब थोरात (काँग्रेस), प्राजक्त तनपुरे, अमित भांगरे, प्रताप ढाकणे, अभिषेक कळमकर, राणी लंके (सर्व शरद पवार गट), संदेश कार्ले व शंकरराव गडाख (ठाकरे सेना) व सुवर्णा कोतकर (अपक्ष) असे नऊ जण दावेदार आहेत.
यापैकी कोतकर वगळता अन्य आठ जण विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी वा पक्षांतरामुळे चंद्रशेखर घुले, अनुराधा नागवडे, भाऊसाहेब कांबळे, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, राहुल जगताप, सागर बेग यांचे पत्ते महायुती व मविआ अशा दोघांकडून कट झाल्याचे समजते.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.