
Mumbai News : काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाणारा नेता हा काँग्रेसच्या नेतृत्वावर टीका करीत आहे. प्रत्येक जण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर आरोप करीत आहे. त्यामुळे या नेतेमंडळींकडून करण्यात येत असलेल्या आरोपामुळे राहुल गांधी खरेच पक्षातील नेतेमंडळीसोबत अशाप्रकारे वागत आहेत का? अशी शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना भेटणे, झोपडीत राहणे, त्यांच्यासोबत जेवण करणे हे वागणे नाटकी आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पक्ष सोडताना केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्यासह आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या टीकेमुळे त्याला दुजोराच मिळाला आहे.
विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनी नुकतीच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर मुलाखती दरम्यान टीका केली आहे. 'राहुल गांधी अॅक्सेसेबलच नाहीत. पंजाबमध्ये त्यावेळी भारत जोडो यात्रा सुरू होती. त्यावेळी त्यांना संपर्क केला. तिकडून प्रतिसाद मिळाला नाही. निवडणुकीनंतर संपर्क झाला. भेटायला बोलवलं, भेटायला गेलो. पण भेटून दिलं नाही. माझ्या वडिलांनी तीन वेळा पत्र लिहिलं. वडील देखील काँग्रेसमधून निलंबित आहेत. माझ्या वडील तर हार्ड कोअर काँग्रेसी आहेत. त्यांच्या रक्ता रक्तात काँग्रेस आहे. त्यांनी तीनदा पत्र लिहून माझ्यावरचं निलंबन मागे घ्यावा, अशी मागणी केली. त्याचंही काही झालं नाही. यातून असे दिसते की, अॅक्सेसेबल नाही. हाच मोठा 'ड्रॉ-बॅक' आहे', अशी टीका त्यांनी केली आहे.
'मी छातीठोक पणे सांगतो की, महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी एक तासांच्या आत राहुल गांधी यांना भेटायला जाऊन दाखवावे कोणत्याही नेत्यानी, प्रदेशाध्यक्षांसह कुणीही, एकतासांत, फोनवर बोलून दाखवावे, आणि असे जर नेतृत्व असेल, मग कोणाच्या भरवशावर लढाई लढायची आणि कोणाच्या भरवशावर कोणाची बाजू घ्यायची', असे प्रश्न सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे येत्या काळात तांबे यांच्या या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी अॅक्सेसेबल नाहीत आणि महाराष्ट्रातील काँग्रेस (Congress) नेत्यांना एक तासाच्या आत त्यांना भेटून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. तांबे यांनी असा आरोप केला की, राहुल गांधी दिल्लीतील 'चांडाळ चौकडी'ने घेरले आहे, ज्यामुळे पक्षातील इतर नेत्यांना त्यांच्याशी संपर्क साधणे कठीण झाले आहे. त्याशिवाय त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसमधील कोणत्याही नेत्याने राहुल गांधींना एक तासाच्या आत भेटून दाखवावे असे उघड चॅलेंज दिले आहे.
या पूर्वी देखील काँग्रेस सोडताना अशास्वरूपाचे चॅलेंज देशातील अनेक नेत्यांनी दिले आहे. त्यामुळे आता राहुल गांधींच्या अडचणीत येत्या काळात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. मध्य प्रदेशातील नेते ज्योतीरादित्य शिंदे यांनी देखील काँग्रेस सोडत असताना राहुल गांधी यांच्या बाबतीत हेच विधान केले होते. त्यामुळेच पक्ष सोडून जात असलेल्या नेत्याकडून पक्ष नेतृत्वावावर टीका केली जात आहे.
सत्यजीत तांबेंनी केलेले हे विधान सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांना थेट चॅलेंज दिले आहे."राहुल गांधींना एक तासांत भेटून दाखवा." या विधानातून तांबेंनी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष, वर्चस्वाची लढाई आणि नेतृत्वाविषयी असलेली नाराजी स्पष्ट केली आहे. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमधून अप्रत्यक्षपणे त्यानी असे सूचित केलंय की, पक्षात काही नेत्यांचा आवाज उच्च नेतृत्वापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांचे महत्त्व कमी झाले आहे.
सत्यजीत तांबें यांनी केलेलं विधान हे येत्या काळात पक्षासाठी चिंतेचं कारण ठरू शकतं,हा प्रकार पाहता काँग्रेसमध्ये गटबाजी, नेतृत्वाचं संकट आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उभं राहिलेलं अस्वस्थ वातावरण अधोरेखित होत आहे. कारण यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक उघड होत आहेत. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होता आहेत. त्या निवडणुकची तयारी आता सर्वच पक्षातुन केली जात आहे. त्यामुळे त्यातच अशा प्रकारच्या केलेल्या विधानामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होंण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांच्यावर काँग्रेस नेत्यांना तात्काळ भेटत नसल्याचा आरोप हा पक्षातील अंतर्गत असंतोष, संवादाच्या अभावामुळे आणि त्यांच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, पक्षातील एकात्मता आणि संवाद वाढवण्यासाठी राहुल गांधी यांनी अधिक खुल्या संवादाची भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या काळात राहुल गांधी त्यांच्या कार्य पद्धतीत बदल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.