Shahapur News : शहापूर विधानसभा क्षेत्रात भाजपने चांगली कामगिरी केल्याचे दिसते. २००९ मध्ये येथे भाजप तिसऱ्या क्रमांकावर होती. २०१४ मध्ये मोदी लाट आणि मित्रपक्ष शिवसेनेमुळे शहापुरात भाजप उमेदवाराला पहिल्या क्रमांकाची मते मिळाली, तर दुसरीकडे फार कमी फरकाने काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान झाले आहे. त्यामुळे यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर आहे. सध्याच्या तापत्या राजकारणापेक्षा शहापूर विधानसभा मतदारसंघात पाणीटंचाईचाच मुद्दा कळीचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर मतांची घागर भरताना महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या तोंडचे पाणीच पळण्याची शक्यता जास्त आहे.
शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी शहापूर पिंजून काढत येथे पक्ष वाढवला. त्या वेळी शिवसेनेचा आमदार म्हणून पहिल्यांदा दरोडा निवडून आले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षानेही आपली पाळेमुळे येथे घट्ट रोवली आहेत. त्यामुळे दहा वर्षांपासून येथे राष्ट्रवादीचा उमेदवार आमदार म्हणून निवडून येत आहे. पण, सध्याचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा हे अजित पवार गटाकडे आहेत, तर माजी आमदार पांडुरंग बरोरा हे शिवसेनेतून स्वगृही शरद पवार गटात आले आहेत. येथील राजकारणात ते कमालीचे सक्रिय आहेत.
दुसरीकडे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शहापूरचा मतदार शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी ही जमेची बाजू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात समृद्धीमुळे पूर्वीपासूनच जी नाराजी होती ती कायम आहे. त्यात गेल्या दहा वर्षांत येथील पाणी समस्येपासून ते लोकापर्यंत कोणताच मुद्दा सोडवण्यात विद्यमान खासदारांना फारसे यश आलेले नाही.
कल्याण-कसारा रेल्वे मार्गाचे कामही संथ गतीने सुरू आहे. खर्डी-दळखण रेल्वे फाटकात प्रवाशांना थांबून राहावे लागते. त्यामुळे गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून मिळालेले मताधिक्य टिकवण्यासाठी विद्यमान खासदारांना घाम गाळावा लागणार आहे. त्यात आपल्या सामाजिक कार्याने जिजाऊ संघटनेने कामाचा ठसा उमटवल्यामुळे काही अंशी मते तिथेही फिरण्याची शक्यता आहे.
धरणांचा तालुका म्हणून शहापूरची ओळख आणि मुंबईसह ठाणे जिल्ह्याच्या शहराला पाणीपुरवठा करणारा शहापूर दरवर्षीप्रमाणे यंदाही तहानेने व्याकूळ झाला आहे. येथील आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत असून, टँकरचा फेरा सुरू झाला आहे. त्यात ऐन टंचाई ज्या काळात उच्चांक गाठेल, त्याच वेळी मे महिन्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे तापत्या राजकारणापेक्षा शहापूर विधानसभा मतदारसंघात पाणीटंचाईचाच मुद्दा कळीचा ठरणार आहे.
आदिवासीबहुल असा शहापूर विधानसभा क्षेत्र असून, एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जातीचे सहा टक्के, तर अनुसूचित जमातीचे ३५.७ टक्के लोकसंख्या येथे आहे. येथील दोन लाख ७४ हजार ७४६ मतदार लोकसभेसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्याच्या अतिदुर्गम भागांमध्ये पक्के रस्ते न पोहाेचल्यामुळे दरी-खोऱ्यातून डोलीतून एखाद्या रुग्णाला घेऊन जाण्याची वेळ ओढावते.
सर्वांत कळीचा मुद्दा म्हणजे येथील पाणीटंचाई. जलजीवन योजना राबवूनही शहापूरचे गाव-पाडे तहानलेलेच आहेत. डोक्यावर हंडे ठेवून महिलांना भर उन्हात मैलोन मैल पायपीट करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक वेळी मुबलक पाणीपुरवठ्याचे हक्काच्या धरणाचे स्वप्न दाखवत येथील राजकारण रंगते. पण घागर काही भरत नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीत शहापूरमधून झालेले मतदान
२००९ : अपक्ष- ३६,०९३, काँग्रेस- २०,०१०, भाजप- १७,६७७, मनसे- १६,५४२
२०१४ : भाजप- ५३,२७०, काँग्रेस- ४९,८०९, मनसे- २२,५०३
२०१९ : भाजप- ६७,९०७, काँग्रेस- ५३,५२०, अपक्ष- ७,४७४
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.