Chhatrapati Sambhajinagar News : महायुतीतील लोकसभा निवडणुकीत जागावाटप, त्यासंदर्भातील चर्चा, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर बैठका या सगळ्यापासून दूर असलेले शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार सध्या आपल्या मतदारसंघातच रमले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या कुठल्याच चर्चेत किंवा प्रक्रियेत ते सहभागी नाहीत. यावरून त्यांच्या भूमिकेबद्दल शंकाही उपस्थित केल्या जात आहेत.
मध्यंतरी त्याचा आजारपणाने डोके वर काढल्यामुळे काहीकाळ ते रुग्णालयात भरती झाले होते. मात्र आता पुन्हा मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. इकडे संभाजीनगरात शिवसेनेचे इतर नेते, मंत्री लोकसभेची जागा आम्हीच लढवणार, जिंकणार असे दावे करत आहेत. तर दुसरीकडे त्यांचेच एक मंत्री जे की प्रचंड अॅग्रेसिव्ह आणि राजकीय डावपेचात माहिर आहेत ते अब्दुल सत्तार मात्र या सगळ्या गोष्टीपासून नामनिराळे आहेत.
त्यांच्या अलिप्तपणाचे अनेक अर्थ काढले जात असले तरी मतदारसंघ पक्का, तर कोणालाही धक्का? असे त्यांचे राजकारण राहिले आहे. सिल्लोड-सोयगाव सारख्या हिंदूबहुल मतदारसंघातून एकदा नव्हे तर सलग तीनवेळा निवडून येत सत्तार यांनी आपली पकड किती मजबूत आहे हे सिद्ध केले आहे. या जोरावरच ते जिल्हा आणि राज्य पातळीवरील नेत्यांना झुकवत आले आहेत.
काँग्रेस, शिवसेना आणि आता शिवसेना शिंदे गटासोबत असलेल्या सत्तार यांचा राजकीय प्रवास सतत बदलत राहिला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांच्या सहकार्याने अब्दुल सत्तार राजकारणात पुढे आले. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी दिलेल्या उमेदवाराविरोधात बंड पुकारत त्यांचा पराभव करण्यास हातभार लावला होता.
त्यामुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवताना सत्तार यांना दूर ठेवले आहे की मग सत्तार स्वतः दूर राहून वेट अॅन्ड वाॅच करत आहेत? हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल. अब्दुल सत्तार शिंदेच्या उठावानंतर त्यांच्यासोबत गेले असले तरी त्यांचे स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, पक्षाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, प्रा. रमेश बोरनारे यांच्याशी फारसे कधी जमलेच नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपल्याला किंवा मतदारसंघासाठी जे काही हवं ते थेट मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून आणत सत्तार यांनी जिल्ह्यातील इतर नेत्यांना कधी फारसी किमंत दिली नाही. याचा फटका त्यांना जिल्हा बॅंक, जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत बसला होता. पण सत्तार कोणालाही बधले नाही. आपला शिवसेना शिंदे गटाशी प्रासंगिक करार आहे, असे सांगत सत्तार सतत आपला दबाव ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.
मतदारसंघाची मजबूत बांधणी हेच सत्तार यांचे बलस्थान राहिले आहे. या जोरावर कोणालाही धक्का देण्याची त्यांची ताकद असल्यामुळेच सत्तारांना ग्रहीत धरणे शिवसेनेच्या नेत्यांना परवडण्यासारखे निश्चितच नाही. सध्या शांत असलेले सत्तार शिवसेना शिंदे गटाचा संभाजीनगरचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर काय भूमिका घेतात? हे महत्वाचे ठरणार आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.