Sarkarnama Podcast : Sarkarnama
ब्लॉग

Sarkarnama Podcast : दादांनी चक्क मुख्यमंत्रिपद नाकारले; पण पक्ष सोडला नाही…

अय्यूब कादरी

Sarkarnama Podcast : सध्या सत्ता आणि खुर्चीसाठी पक्ष बदलणं....गटा-तटाचं राजकारण करणं हे खूपच वाढलंय...पण चालून आलेले मुख्यमंत्रिपद नाकारणारा, पण आपला पक्ष न सोडणारा, आपल्या विचारसरणीशी प्रतारणा न करणारा असा नेता एकेकाळी महाराष्ट्रानं पाहिला....कोण होता हा नेता...घेऊयात जाणून....

राजकारण आणि नीतिमत्ता याचा काही एक संबंध नसण्याचा, राजकारण्यांना कशाचीही चाड नसण्याचा हा काळ आहे. सत्ता, पद आणि पैसा यालाच राजकारणात आता सर्वाधिक महत्त्व आलंय.....काँग्रेसला विरोध या तत्त्वावर स्थापन झालेल्या शिवसेनेने सत्तेसाठी काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचे आपण पाहिले. ज्या पक्षाने मोठे केले, सर्वकाही दिले, तो सोडून सत्तेसाठी अन्य पक्षासोबत गेलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि ४० आमदारही आपण पाहिले. सत्तेसाठी काका शरद पवार यांना सोडून भाजपच्या वळचणीला गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि काही आमदार हेही पाहायचं 'भाग्य' आपल्याला लाभलंय.....

राजकारणात काहीही म्हणजे अगदी काहीही होऊ शकते, जसे की भाजप जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेसाठी मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीएफ या पक्षाशी युती करू शकतो,  असा हा काळ. पण काही लोक इतके नशीबवान होते की, चालून आलेले मुख्यमंत्रिपद नाकारणारा, पण आपला पक्ष न सोडणारा, आपल्या विचारसरणीशी प्रतारणा न करणारा असा नेताही त्या पिढीने पाहिला होता. तो नेता म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) संस्थापकांपैकी एक..... गोवा मुक्तिसंग्राम, हैदराबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील झुंजार सेनानी (कै.) उद्धवराव दादा पाटील.

इर्ले (ता. परंडा, जि. धाराशिव) हे भाई उद्धवराव दादा यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म ३० जानेवारी १९२० रोजी आजोळी माणकेश्वर (ता. परंडा) येथे झाला. १९३७ मध्ये उस्मानाबादेतून  (आता धाराशिव) मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर उद्धवरावदादांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात प्रवेश घेतला. निझामाच्या राजवटीत बिगरमुस्लिम विद्यार्थ्यांसोबत होणारा टोकाचा भेदभाव त्यांच्या नजरेतून सुटला नाही. तिथं आसिफजाही घराण्याशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा दिली जायची. हे त्यांना आवडलं नव्हतं.... या प्रतिज्ञेऐवजी वंदे मातरम गायलं जावं..... यासाठी विद्यार्थ्यांनी १९३८ मध्ये वंदे मातरम चळवळ सुरू केली. दसऱ्याला त्याचा प्रारंभ झाला. उद्धवरावदादाही त्यात अग्रस्थानी होते. ही चळवळ पूर्ण संस्थानात पसरली. सरकारने या गीतावर बंदी घातली. याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालये बंद अनेक महिने ठेवले. 


त्यामुळे शेवटी सरकारने बंदी मागे घेतली आणि विद्यार्थ्यांचा विजय झाला. या चळवळीनेच हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य आंदोलनाचा पाया रचला गेला. मात्र, या चळवळीमुळे विद्यापीठाने त्यांना काढून टाकलं..... त्यानंतर त्यांनी तेथील स्पर्धा परीक्षा दिली. मात्र, उद्धावरावदादांनी केलेल्या आंदोलनाचा राग म्हणून उत्तीर्ण होऊनही सरकारने त्यांना संधी दिली नाही. मग त्यांनी एलएलबीचे शिक्षण घेऊन अॅड. नरसिंगराव देशमुख काटीकर यांच्याकडं वकिली सुरू केली. पुढं उद्धवराव दादा हैदराबाद मुक्तिसंग्रामातही सहभागी झाले. त्यांनी सशस्त्र लढा दिला. अशा चळवळींतून त्यांचं व्यक्तिमत्त्व घडलं होतं..... ते विचारांशी, तत्त्वांशी आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. याचे कारण कुटुंबातील संस्कार आणि या चळवळी 

स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसमध्ये असलेले उपपक्ष, शेतकरी कामगार संघासारख्या गटांना बाहेर काढण्यासाठी काँग्रेसच्या घटनेत बदल करण्यात आला होता. स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसनं अशा गटांना सामावून घेतलं होतं...., स्वातंत्र्यांनंतर मात्र काँग्रेसला या गटांची गरज वाटत नव्हती. त्यामुळे वेगळ्या विचारसरणीच्या लोकांना काँग्रेसमध्ये यापुढं स्थान राहणार नाही, असा निर्णय आॅल इंडिया काँग्रेसनं घेतला. काँग्रसनं अशी भूमिका घेतल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली. मुंबईत २६ एप्रिल १९४८ रोजी भाऊसाहेब राऊत यांच्या घरी ही घोषणा करण्यात आली. या घडामोडी सुरू असताना उद्धरावदादा हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये कार्यरत होते. 

निझामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध त्यांचा संघर्ष सुरू होता. तिकडं संघर्ष करत असताना राज्यातील घडामोडींकडं त्यांचं लक्ष होतं, ते सतर्क होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ते संपर्कात राहायचे. हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये आॅल इंडिया काँग्रेससारखीच परिस्थिती होती. जनार्दनराव देसाई यांचा वकील गट आणि स्वामी गट असे दोन गट पडले होते. नेतृत्वावरून या गटांत संघर्ष होता. वकील गट वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा आणि स्वामी गट हा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा....... उद्धवरावदादा आणि अॅड. नरसिंगराव देशमुख यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा. त्यामुळं ते वरील दोन्ही गटांत गेले नाहीत. हैदराबाद स्टेट काँग्रेसमध्ये काम करत असतानाच दादा आणि देशमुख यांनी शेतकरी संघाची स्थापना केली होती.

काँग्रेसकडून त्याला मान्यता मिळेल याची शक्यताच नव्हती. उद्धवरावदादा, नरसिंगराव यांना स्वामी गटानं जवळ केलं नाही. शेतकरी संघ विसर्जित केल्याची घोषणा काँग्रेसने केली. शेतकरी कामगार पक्षाचे क्रातिसिंह नाना पाटील, शंकरराव मोरे, केशवराव जेधे, भाई जी. डी. लाड यांच्याशी उद्धवरावदादा संपर्कात होतेच. काटी (ता. तुळजापूर) या नरसिंगराव देशमुख यांच्या गावी १९४९ मध्ये बैठक झाली. मराठवाड्यात शेतकरी कामगार पक्षांची स्थापना करून तो राज्यातील पक्षात विलीन करण्याची सूचना दादांनी मांडली. त्याला समर्थन मिळालं....

....त्याच वर्षी बार्शीमधल्या जाहीर सभेत ही घोषणा करण्यात आली. राज्यात शेतकरी कामगार पक्षाची चांगलीच वाढ झाली होती. पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार उद्धवरावदादांनी जोरकसपणे केला होता. हा पक्ष काँग्रेसला पर्याय ठरू शकला असता, पण त्याला दुहीचे ग्रहण लागलं. १९५० ते १९५६ दरम्यान पक्षात मनभेद निर्माण झाले. पक्षाच्या तिसऱ्या अधिवेशनात (वाठार, ता. कराड) हे मतभेद तीव्र झाले. भाई शंकरराव मोरे आणि दत्ता देशमुख यांच्यात समेट घडावा, यासाठी उद्धरावदादा यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. अखेर पक्ष दुभंगला.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे शेकापमधील नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध होते. साधारण १९६२ च्या सुमारास ते केंद्रात (दिल्ली) गेले. आपल्या मागे बहुजन समाजातील चारित्र्यवान, कार्यक्षम, धडाडीच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये येऊन सत्तेत सहभागी व्हावं.... बहुजनांसाठी कल्याणकारी योजना राबवाव्यात, असं यशवंतरावांना वाटायचं.....यासाठी त्यांनी शेकापमधील अनेकांना निरोप पाठवले होते. यशवंतराव मोहिते यांचं मन वळवण्यात त्यांना यश आलं..... मात्र उद्धवरावदादा यांचं मन ते वळवू शकले नाहीत. उद्धवरावदादा विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाची आॅफर देण्यात आली होती. सत्तेसाठी पक्ष आणि विचारसरणीशी बांधिलकी त्यांनी सोडली नाही. ती बांधिलकी किती महत्त्वाची असते हे आज राजकारणात काय सुरू आहे, हे पाहिल्यास लक्षात येतं.... गोरगरिबांच्या कल्याणाशी उद्धावरावदादांची बांधिलकी होती. त्यामुळे आपला पक्ष सत्तेत येणार नाही, हे लक्षात येऊनही त्यांनी पक्ष सोडला नव्हता. मी विकासासाठी पक्ष सोडला किंवा विकासकामे करण्यासाठी सत्तेत सहभागी झालो, हा आजचे नेते आणि दादा मंडळींचा युक्तिवाद किती तकलादू आणि कूचकामी आहे, हे उद्धवरावदादांचे चरित्र माहीत असणाऱ्यांच्या लक्षात येईल. 

चालून आलेल्या मुख्यमंत्रिपदाकडे पाठ फिरवणारे उद्धवरावदादा यांच्यासारखे नेते आपल्या राज्यात होऊन गेले, यावर आताच्या पिढीतील कुणाचा विश्वास बसणार नाही. दादांनी आपल्या तत्त्वांशी कधीही फारकत घेतली नाही. आपले जीवन लोकांच्या सेवेसाठी आहे, ते सत्तेसाठी नाही, असे जणू त्यांनी ठरवूनच टाकले होतं....

उद्धवराव दादांनी १९५२ मध्ये देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली. त्यावेळच्या उस्मानाबाद-तुळजापूर मतदारसंघातून ते हैदराबाद असेंब्लीत आमदार म्हणून निवडून गेले. त्यावेळी वातावरण काँग्रेसला पूर्णपणे अनुकूल होते. अशा वातावरणातही दादांनी काँग्रेसच्या तुल्यबळ उमेदवाराचा पराभव केला. तिथं अभ्यासू प्रतिनिधी म्हणून ते नावारूपाला आले. १९५७ मध्ये दादांनी उस्मानाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. त्यांच्यासमोर हैदराबाद राज्यात शिक्षणमंत्री राहिलेले फुलचंद गाधी हे तुल्यबळ उमेदवार होते. दादांनी सावकारशाहीविरोधातही लढा दिला होता. याद्वारे त्यांनी फुलचंद गांधींचा रोष ओढवून घेतला होता. संपत्तीच्या बाबतीत दादांचा त्यांच्यासमोर टिकाव लागणे शक्यच नव्हतं..... तरीही दादांनी त्यांचा आश्चर्यकारकपणे पराभव केला. प्रचारात उद्धवरावदादांनी समोरच्या उमेदवाराचं कधीही चारित्र्यहनन केलं नव्हतं..... आजचे राजकारणी त्यांचा हा गुण अंगिकारतील का? 

एस एम. जोशी यांच्यानंतर १९५८-१९५९ मध्ये उद्धवरावदादा मुंबई राज्याचे विरोधी पक्षनेते बनले. सध्या विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्यासारखा दर्जा असतो. पण त्यावेळी तसं नव्हतं...... सभागृहातील अभ्यासू मांडणी आणि झुंजार वृत्तीमुळे दादांनी विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्याला एक प्रकारची उंची मिळवून दिली होती. आता ही उंची लयाला गेली आहे. विरोधी पक्षनेते राहिलेलेच पक्ष बदलून सत्तेत सहभागी झाल्याचे उदाहरण आपल्या पिढीला पाहावं लागलं आहे. 

१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत मात्र उद्धवरावदादांच्या वाट्याला पराभव आला. काँग्रेसचे तुळशीराम पाटील विजयी झाले. या पराभवाने निराश न होता दादांनी लोकचळवळीचे काम थांबवले सुरूच ठेवलं...

१९६२ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षानं त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीत उतरवलं. त्यांची लढत रिपब्लिकन पक्षाचे राजाभाऊ खोब्रागडे यांच्याशी होती. यशवंतराव चव्हाण यांनी खोब्रागडे यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते, मात्र सत्तारूढ काँग्रेसच्या आमदारांनी उद्धवरावदादा यांना मतदान केलं. या निवडणुकीत दादा विजयी झाले. १९६४ ते ६६ या काळात त्यांनी दिल्लीत आपल्या कामाची चुणूक दाखवली होती. १९६७ च्या विधानसभा निवडणुकीत ते उस्मानाबाद मतदारसंघातून विजयी झाले.

१९७२ मध्ये मतदारसंघ बदलून ते भूम-परंड्यातून लढले. तिरंगी लढतीत त्यांचा पराभव झाला. पुढे आणीबाणी उठवल्यानंतर १९७७ मध्ये दादांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांच्याकडे डिपाॅझिट भरायलाही पैसे नव्हते, ते लोकांनी गोळा करून दिले. या निवडणुकीत ते विजयी झाले. आणीबाणी लादल्यामुळे लोक काँग्रेसवर नाराज होते. त्याचा फायदा साहजिकच दादांना मिळाला होता. कर्करोगाशी लढा देणाऱ्या उद्धवराव दादांनी १२ जुलै १९८४ रोजी जगाचा निरोप घेतला.

दादांची सभागृहातील भाषणे खूप गाजली. सत्ताधारीही त्यांची अभ्यासू मांडणी ऐकण्यासाठी अधीर झालेले असायचे. तसे त्यांना काँग्रेसच्या एका माजी मंत्र्यांने खासगीत सांगितलंही होतं..... सभागृहातील आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीनं दादा विरोधकांना सळो की पळो करू सोडायचे. सध्याच्या राजकारणात याच्या अगदी उलट चित्र दिसून येतं. आता सत्ताधाऱ्यांनी सळो की पळो करून सोडणारी मांडणी एकतर केली जात नाही, तशी ती कुणी केलीच तर संबंधितांच्या मागे संकट निश्चितपणे लागलेच समजायचं....

.. याचा अर्थ असा होते, की उद्धरावदादांनी विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्याला मिळवून दिलेली उंची आताच्या राजकारण्यांनी गमावून टाकली..... सर्वच राजकीय नेत्यांचे हात कुठेतरी अडकलेले आहेत. विरोधी पक्षही याला अपवाद नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरुद्ध मांडणी करण्यासाठी विरोधी पक्षातील नेते हात आख़डता घेतात. जनतेच्या कल्याणापेक्षा स्वकल्याण ही वृत्ती रूढ झाली आहे. त्यामुळे आजचे राजकीय नेते आणि दादा मंडळी उद्धवरावदादांसमोर अत्यंत खुजी वाटतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT