Ambadas Danve Meet Padaswan Family News Sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve Letter To Devendra Fadnavis : तरुणाच्या खूनाची एसआयटी चौकशी करा! अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र..

Ambadas Danve has written to the Chief Minister demanding an SIT inquiry into the youth’s murder : निमोणे कुटुंबीयाने जीवाला धोका असल्याची पहिली तक्रार 11 जानेवारी, 20 जून, 11 सप्टेंबर, 6 जानेवारी 2022, पाच व 16 एप्रिल 2024 आणि 31 जानेवारी, 30 एप्रिल, 5 मे व 5 ऑगस्ट रोजी पोलिसात दिली होती.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : प्लाॅटच्या वादातून छत्रपती संभाजीनगरमध्ये निमोने कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला. यात प्रमोद पाडसवान यांच्यावर चाकूने अनेक वार झाल्यामुळे त्यांचा यात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले. आरोपींना राजकीय आश्रय असल्याचा आरोप केला जात असताना काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पाडसवान कुटुंबियांची भेट घेतली.

कुटुंबातील सदस्यांनी घटनेबद्दल माहिती दिल्यानंतर आज दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र पाठवून या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई आणि खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणीही दानवे यांनी या पत्राद्वारे केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर दोन दिवसापूर्वी खूनाच्या घटनेने हादरून गेले. सिडकोच्या संभाजी काॅलनी भागातील प्रमोद पाडसवान व त्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये चाकूने वार केल्यामुळे प्रमोद पाडसवान या तरुणाचा मृत्यू झाला.

हे प्रकरण अत्यंत गंभीर असून आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करून प्रकरणाचा तपास विशेष पथकाद्वारे करावा, अशी मागणी अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या हत्या प्रकरणानंतर वातावरण तापले आहे. आरोपींवर कठोर कारवाईसाठी पाडसवान कुटुंब पोलिसांकडे दाद मागत आहे. दरम्यान पाडसवान कुटुंबाची अंबादास दानवे, पालकमंत्री संजय शिरसाट, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार संजय केनेकर, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भेट घेत आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

अंबादास दानवे यांनी काल या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले. पत्रात दानवे यांनी पाडसवान कुटुंबाचा गेल्या चार वर्षापासून कसा छळ सुरू होता याचा उल्लेख केला. संभाजी कॉलनी येथील पाडसवान कुटुंबीयांचा 2021 पासून निमोने कुटुंब सातत्याने छळ व त्यांच्या अधिकृत प्लॉटवर अतिक्रमण करून जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. या संदर्भात स्थानिक पोलीसात वारंवार तक्रारी पाडसवान कुटुंबाकडून करण्यात आल्या. परंतु स्थानिक पोलीस यंत्रणेने याची दखल न घेतल्यामुळे 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रमोद पाडसवान यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

निमोणे कुटुंबीयांकडून आपल्या कुटुंबाला धोका असल्याची पहिली तक्रार 11 जानेवारी, 20 जून, 11 सप्टेंबर, 6 जानेवारी 2022, पाच व 16 एप्रिल 2024 आणि 31 जानेवारी, 30 एप्रिल, 5 मे व 5 ऑगस्ट रोजी पोलिसात करण्यात आली होती. पाच ऑगस्ट रोजी पाडसवान कुटुंबाने पोलीस आयुक्त तसेच सिडको पोलीस ठाण्याकडे हा आमचा शेवटचा पर्याय असून निमोने कुटुंबाच्या त्रासातून आम्हाला मुक्तता द्यावी, अशा शब्दात आर्त विनंती केली होती. तथापि सदर तक्रारीवरही कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. परिणामी प्रमोद पाडसवान यांच्यावर जीवघेणा हल्ला होवून यात त्यांचा मृत्यू झाला.

ही घटना केवळ एका कुटुंबावर झालेली क्रूर, अन्यायकार हिंसा नसून पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींना वेळेत व गांभीर्याने दखल न घेण्यामुळे उद्भवलेला कायदा व सुव्यवस्थेवरील गंभीर प्रश्न आहे. याकरिता संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणी तात्काळ चौकशी करून तातडीने कारवाई करावी. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत उच्चस्तरीय व नि:पक्षपाती पद्धतीने करण्यात यावा. पाडसवान कुटुंबीयांनी केलेल्या सर्व तक्रारींची मूळ नोंद तपासात समाविष्ट करून पोलीस प्रशासनाने कारवाई का केली नाही? असा प्रश्नही अंबादास दानवे यांनी पत्रात केला.

याची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, जाणीवपूर्वक निष्क्रियता व टाळाटाळा केलेल्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक, प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात यावी. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करून खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. निमोने कुटुंबाच्या अतिक्रमण, बेकायदेशीर कृती व त्यांना मिळालेल्या राजकीय आश्रयाबाबत चौकशी करून तथाकथित व्यक्तीं विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही दानवे यांनी मुख्यमंत्र्‍यांकडे केली आहे.

सदर प्रकरण हे अतिगंभीर स्वरूपाचे असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनाने तातडीने व निर्णय भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सदर प्रकरणाची वरील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून निर्देश द्यावेत, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

काय आहे घटना?

प्लॉटवर डोळा ठेवून असलेल्या व्यक्तीला ढोल ठेवण्यास मज्जाव केल्याने टोळक्याने धारदार शस्त्राने एका कुटुंबावर हल्ला केला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सिडको एन 6 येथील संभाजी कॉलनीमध्ये घडली. प्रमोद पाडसवान (वय 38) रा. संभाजी कॉलनी असे मयत तरुणाचे नाव आहे. तर रमेश आणि रुद्र पाडसवान हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. पाडसवान कुटुंब हे सिडको एन 6 भागातील संभाजी कॉलनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहते. त्यांच्या घराशेजारी किराणा दुकान आहे.

घराच्यासमोर त्यांनी एक मोकळा भूखंड सिडकोकडून विकत घेतला आहे. मात्र याच भूखंडावर निमोणे कुटुंबाचा डोळा होता. काही दिवसांपासून निमोणे कुटुंबाने या प्लॉटवर अतिक्रमण करायला सुरुवात केली. पाडसवान कुटुंबाने निमोणे यांना तीव्र विरोध केला. यामुळे निमोणे कुटुंबाने पाडसवान कुटुंबाला त्रास द्यायला सुरुवात केली. वाद होऊ नये, आपली जागा आपल्यालाच ताब्यात राहावी म्हणून पाडसवान कुटुंबाने मोकळ्या भूखंडावर बांधकाम करण्यासाठी साहित्य आणले होते. कामाला सुरुवात देखील केली होती. मात्र याचवेळी निमोणे कुटुंबाने याच भूखंडावर शेड बांधायला सुरुवात केली.

वाद नको म्हणून काही नागरिकांनी यात मध्यस्थी केली. मात्र, काशिनाथ निमोणे, ज्ञानेश्वर निमोणे, सौरभ निमोणे व गौरव निमोणे यांनी पाडसवान कुटुंबावर चाकूने हल्ला केला. यात प्रमोद पाडसवान, रमेश पाडसवान, रुद्र पाडसवान हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान प्रमोद पाडसवान यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे वडील आणि मुलगा हे गंभीर जखमी झाले. पोलीसांनी आरोपींना अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT