Ashok chavan-Devendra Fadnavis-Amit Shah-Meenal Khatgaonkar  Sarkarnama
मराठवाडा

Nanded Lok Sabha Constituency : चव्हाणांची शिफारस अन्‌ फडणवीसांची शिष्टाई खतगावकरांना उमेदवारीची भेट देणार?

Laxmikant Mule

Nanded News : नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर ट्विस्ट आला आहे. विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उमेदवारी पक्की मानली जात असताना, आता त्याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. यामागे अशोक चव्हाण हेच कारण असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसमध्ये असताना लोकसभा निवडणुकीसाठी अशोक चव्हाण यांचे भाऊजी, माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांच्या सूनबाई डाॅ. मीनल खतगावकर यांनी तयारी सुरू केली होती. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यावर पाणी फिरते की काय? असे वाटत होते, परंतु पक्ष बदलला असला तरी खतगावकर यांच्या तयारीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, याची काळजी चव्हाण यांनी घेतल्याचे दिसून येत आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या संभाजीनगर येथील बैठकीपूर्वी मीनल खतगावकर (Meenal Khatgaonkar) यांनी त्यांची भेट घेत उमेदवारीवर दावा केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे त्यावेळी तिथे उपस्थितीत होते. याचाच अर्थ अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची शिफारस आणि त्याला फडणवीसांची जोड असा तर्क काढला जात आहे. आता चव्हाण यांची शिफारस आणि फडणवीसांची शिष्टाई कामाला येऊन मीनल खतगावकर यांना नांदेड लोकसभेच्या उमेदवारीची भेट शाह यांकडून मिळते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत जागावाटपासाठी ओढाताण सुरू आहे. महायुतीच्या घटक पक्षांना किती जागांची गॅरंटी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महायुतीच्या जागावाटपात नांदेडची जागा भारतीय जनता पक्षाला सुटणार ही गॅरंटी असली तरी नांदेडमध्ये (Nanded) कोणाला उमेदवारी मिळणार, याची गॅरंटी नाही. त्यामुळे उत्सुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षात अशोक चव्हाण आल्याने नांदेड जिल्ह्याची सूत्रं त्यांच्याकडे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांचे पक्षात स्थान बळकट होत असून, त्याचा फायदा मीनल पाटील खतगावकर यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी होऊ शकतो.

अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच नांदेड लोकसभेच्या भाजपच्या उमेदवारात फेरबदल होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली. नांदेडच्या जागेसाठी विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, आमदार राम पाटील रातोळीकर व मीनल पाटील खतगावकर हे उत्सुक आहेत. गेल्या निवडणुकीत चिखलीकरांना देगलूर-बिलोली, मुखेड नायगाव या भागात चांगले मताधिक्य मिळाले होते.

गेल्या निवडणुकीत भास्करराव पाटील खतगावकर हे भारतीय जनता पक्षात होते. त्याचा फायदा भाजपला झाला होता. विधानसभा निवडणुकीत नायगाव विधानसभा मतदारसंघातून मीनल पाटील खतगावकर यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती. पण, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. या मतदारसंघात राजेश पवार यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे नाराज झालेल्या खतगावकरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, परंतु आता चव्हाण-खतगावकर हे दोघेही भाजपमध्ये आहेत.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपने एकदाही महिलेला उमेदवारी दिलेली नाही. त्यामुळे मीनल पाटील खतगावकर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे बोलले जाते. आता नव्याने भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाण यांचा शब्द दिल्लीतील नेते ऐकतात की, विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याच नावावर दुसऱ्यांदा शिक्कामोर्तब करतात, हे भाजपच्या दुसऱ्या यादीनंतर स्पष्ट होणार आहे. तूर्तास खतगावकर यांच्या शाहसोबतच्या भेटीने चिखलीकरांची चिंता मात्र वाढली आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT