Loksabha Election 2024 : सरपंचपदापासून ते राजधानी दिल्ली गाठणारे खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला धोबीपछाड देत त्यांनी दिल्ली गाठली. त्यानंतर त्यांच्या विजयापेक्षा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पराभवाची चर्चा राज्यभर झाली.
खासदार चिखलीकर यांचा राजकीय प्रवास हा काँग्रेस, लोकभारती, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप असा राहिला आहे. सरपंच, तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य, आमदार, तीन वेळा जिल्हा बँकेचे संचालक, लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती, लोहा नगरपरिषद या संस्थांवर त्यांचे वर्चस्व राहिले आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून झालेला त्यांचा विजय हा त्यांच्या राजकीय वाटचालीतील मैलाचा दगड ठरला. (Latest Marathi News)
लोकसभा निवडणुकीतील या विजयामुळे त्यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले आहे. तळागाळातून आल्याने त्यांना ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, शेतीच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. सतत लोकांच्या संपर्कात राहत असल्याने ज्या पक्षात त्यांनी प्रवेश केला, त्या पक्षात त्यांचे समर्थक वाढले आहेत. त्यांनी अनेक चुरशीच्या लढतींमध्ये विजय खेचून आणला आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाची ओळख संपूर्ण राज्यातच नव्हे तर दिल्लीपर्यंत पोहोचली आहे.
प्रतापराव गोविंदराव पाटील-चिखलीकर
2 ऑगस्ट 1961
एम. ए.
प्रतापराव पाटील-चिखलीकर यांचा जन्म चिखली येथील शेतकरी कुटुंबात झाला. शेती हाच कुटुंबाचा आधार आहे. त्यांचे वडील दिवंगत गोविंदराव चिखलीकर हे काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्यांचे व माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे चांगले राजकीय संबंध होते. ते काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य होते. प्रतापराव चिखलीकरांना तीन अपत्ये आहेत. यात प्रवीण पाटील चिखलीकर हे राजकारणात सक्रिय असून, माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.
जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी अर्थ व नियोजन बांधकाम सभापती म्हणून काम पाहिले आहे. ते दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. कन्या प्रणिता देवरे-चिखलीकर या देखील राजकारणात सक्रिय असून त्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचाराचा धुरा हे दोघे समर्थपणे सांभाळत असतात. पुत्र प्रमोद पाटील-चिखलीकर हे व्यवसायाने डॉक्टर असून, त्यांचे नांदेड शहरात रुग्णालय आहे. पत्नी प्रतिभा पाटील-चिखलीकर या गृहिणी आहेत. त्यांच्या मातोश्री वच्छलाबाई या आता हयात नाहीत.
शेती
नांदेड
भारतीय जनता पक्ष
प्रतापराव पाटील चिखलीकरांचे महाविद्यालयीन शिक्षण नांदेड शहरातील यशवंत महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन जीवनात 1981-82 मध्ये त्यांनी विद्यार्थी संसदेची निवडणूक लढविली होती. त्यांनी विद्यार्थी संसदेचे अध्यक्षपद भूषवले. अवघ्या 21व्या वर्षी 'ग्रामविकास शिक्षण संस्था, चिखली' या संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक कार्य केले आहे .
चिखलीकर यांचा राजकीय प्रवास हा चिखली गावाच्या सरपंचपदापासून सुरू झाला. ते 1989 मध्ये सरपंच झाले. त्यांनी सरपंचपदाच्या काळात ग्रामविकासाला चालना दिली. त्यांच्या राजकीय जडणघडणीला येथूनच सुरुवात झाली. त्यांची राजकीय कारकीर्द काँग्रेसमधून सुरू झाली. त्यांनी काँग्रेसमध्ये असताना संघटनात्मक पातळीवर काम केले. ग्रामीण भागातील सर्व विकासकामे व योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येतात.
राजकीय नेतृत्व विकासाची कार्यशाळा म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती यांना ओळखले जाते. ते पहिल्यांदा बारुळ जिल्हा परिषद गटातून निवडून आले. 1992 मध्ये ते नांदेड जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध विकास समिती सभापती बनले. जिल्हा परिषदेच्या विविध योजना ग्रामीण भागातील लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 1993 मध्ये कलंबर विभाग सहकारी साखर कारखाना लि. गांधीनगरचे अध्यक्ष झाले.
1994 मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठाचे (परभणी) कार्यकारणी सदस्य बनले. पुन्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर 1997 मध्ये उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. यासोबतच शिक्षण व आरोग्य समितीचे सभापतीपदही मिळाले. त्यानंतर 2001 मध्ये जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समिती सभापती आणि लोहा तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष झाले. नांदेड जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जिल्हा बँकेचे संचालक म्हणून ते तीनवेळा निवडून आले.
कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला आहे, मात्र तो खिळखिळा झाल्यानंतर ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. 2004 मध्ये ते लोकभारती पक्षाकडून निवडून आले होते. आमदारकीच्या काळात त्यांनी लिंबोटी धरणासाठी 550 कोटींचा निधी आणला. त्यामुळे या धरणाच्या कामाला गती मिळाली. 2014 मध्ये ते शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले. मतदारसंघातील विकासकामांना गती दिली. ते तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कंधार-लोहा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करून घेतला होता.
चिखलीकरांच्या नेतृत्वाखाली 2005 मध्ये कंधार नगरपरिषद निवडणुकीमध्ये मोठे यश संपादन करून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांवर आपल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावली. 2007 च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांना भरघोस मतांनी निवडून आणून सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2008 मध्ये लोहा नगरपालिकेवर आपल्या कार्यकर्त्यांना विजयी करून त्याच्या हाती सत्ता दिली. 2009 मध्ये लोहा बाजार समितीच्या निवडणुकीत यश मिळवले. त्यांचा खासदारकीच्या काळात मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील विविध विकासकामांना चालना मिळाली आहे. यात राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गाची कामे, रेल्वेच्या कामांचा समावेश आहे.
चिखलीकरांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासात पक्षांतराचा विषय हा नेहमीच चर्चेचा असतो. ते मूळ काँग्रेस पक्षाचे. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी विविध पदांवर काम केले. काँग्रेस सोडून ते लोकभारती पक्षात गेले. 'लोकभारती'मध्ये ते आमदार झाले. त्यानंतर त्यांनी 2012 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दोन वर्षांनंतर त्यांनी 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. या पक्षात काही वर्षें काम केल्यानंतर 2019 च्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या उमेदवारीवर ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.
कोरोनाच्या काळात त्यांनी जिल्ह्यातील लोकांना मदतीचा आधार दिला. ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करुन गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली. मतदारसंघातील सर्व पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन, पत्रकारांचा अपघाती विमा काढला. आंतराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन केले होते.
2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले.
जिल्ह्यातील राजकारणात त्यांनी चांगले बस्तान बसवले आहे. देशातील राजकारणात मोदी पर्वाची सुरुवात 2014 मध्ये झाली. जिल्ह्यातील विविध पक्षांतील आजी-माजी आमदार व खासदारांनी भाजपची वाट धरली. यात चिखलीकरांचाही समावेश होतो. त्यांनी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीआधी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नांदेडमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्यांच्या विजयात मोदींची लाट, त्यांचा जनसंपर्क व भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक कामाचा मोठा वाटा होता. .
मतदारसंघातील नागरिकांच्या संपर्कात राहण्यासाठी, त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नांदेड शहरात जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते स्वतः लक्ष घालतात. नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या समजून घेतात. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे
सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसतात.
नाही.
वडील गोविंदराव चिखलीकर, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यांचा मतदारसंघातील नागरिकांशी चांगला संपर्क आहे. मतदारांशी थेट संबंध व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्काळ दखल घेतात. पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम करतात.
कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघात सध्या त्यांचे मेहुणे आमदार श्यामसुंदर शिंदे त्यांच्याविरुद्ध दंड थोपटून आहेत. या नाजुक नात्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली असून, ही त्यांच्यासाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. हा कौटुंबिक वाद मिटविण्यात त्यांना अपयश आले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने चुकीचा संदेश गेला आहे. पक्षातील गटबाजी थांबवून समन्वय साधता आला नाही
पक्षाने उमेदवारी नाकारल्यास बंडखोरी करणार नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.