Ex Minister Diliprao Deshmukh News Sarkarnama
मराठवाडा

Diliprao Deshmukh News : वडीलांना मला शेतकरी अन् विलासरावांना वकील करायचे होते..

Former minister Diliprao Deshmukh reveals he never intended to enter politics and that his brother Vilasrao Deshmukh initially aspired to become a lawyer. त्या निवडणूकीत बिनविरोध निवडून आलो. आमदार व्हायचे नाही, मंत्री व्हायचे नाही म्हणून फोन बंद करून बसलो होतो. पण कार्यकर्त्यांचा आग्रह टाळता आला नाही.

Jagdish Pansare

सुशांत सांगवे

Latur News : मला आधीपासूनच शेतीची आवड होती. त्यात घरी बाराशे एकर शेती, शंभर बैल होते असे लहानपणी ऐकले होते. घरात शेतीचेच वातावरण होते, पण आमच्या वडीलांना मात्र मी आणि विलासराव यांनी खूप शिकलं पाहिजे, अशी इच्छा होती. मला त्यांना शेतकरी करायचे होते, तर विलासराव यांना वकील. राजकारणात येण्याचे कधीच ठरवले नव्हते. गंमत म्हणून फॉर्म भरला आणि चोवीसाव्या वर्षी बाभळगाव ग्रामपंचायतीचा सदस्य झालो. पुढे सरपंच झालो अ्न न मागता वेगवेगळी पदे मिळत गेली, असे सांगत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी आपल्या राजकारणातील प्रवेशाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

दिलीपराव देशमुख यांचा अमृतमहोत्सव लातूरमध्ये साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांनी सकाळ 'थेट-भेट' मध्ये संवाद साधला. (Vilasrao Deshmukh) विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर पुण्यात फ्लॅट घेवून राहू लागलो. राजकारणातून बाजूला व्हायचे म्हणून महिन्यातून एकदाच लातूरला यायचो. पण, अचानकपणे काही मित्रांनी विधानपरिषदेचे तिकीट मिळावे म्हणून फॉर्म भरला. स्वत:च दहा हजार रुपये भरले. त्यानंतर त्यांनी मला याबाबतची कल्पना दिली.

त्यावेळी मी त्यांना म्हणालो, 'आता तुमचे दहा हजार रुपये बुडाले,असे समजा'. पण, नियमानूसार माझे नाव दिल्लीत गेले. त्यावेळी गोविंदराव आदिक हे प्रदेशाध्यक्ष होते. मुख्यमंत्र्यांचे आणि प्रदेशाध्यक्षाचे फारसे पटत नाही, अशी चर्चा त्याकाळी वर्तमानपत्रातून व्हायची. (Congress) त्यामुळे मला तिकीट मिळावे म्हणून प्रदेशाध्यक्षच पुढे झाले. पुढच्या दोन दिवसांत माझे नाव जाहीर झाले. त्या निवडणूकीत बिनविरोध निवडून आलो. आमदार व्हायचे नाही, मंत्री व्हायचे नाही म्हणून फोन बंद करून मी घरी बसलो होतो. पण मित्रांचा, कार्यकर्त्यांचा आग्रह टाळता आला नाही.

आजवरच्या प्रवासाबाबत मी समाधानी आहे. आता राजकारण करायचे नाही, अशा मन:स्थितीत असतानासुद्धा वेगवेगळी संधी मिळत गेली. आता कुठलेही पद राहिलेले नाही. कुठलीही निवडणूक आता लढवायची नाही. ना विधानसभा, ना लोकसभा, ना राज्यसभा. कुठले तरी एक पद नाही म्हणून माझे काम कधीच थांबलेले नाही. कुठलेही काम मी लहान किंवा मोठे मानत नाही. कारखाना कसा चांगला चालेल, जिल्हा बँक कशी चांगली चालेल, त्यातून लोकांचे हित कसे साधले जाईल, याचाच मी विचार करतो. राजकरणात आलो असलो तरी मी राजकारणी कमी आणि समाजकारणीच जास्त असल्याचे दिलीपराव म्हणाले.

विलासरावांचा स्पर्धक नाही, फॉलोअर्स

विलासराव देशमुख हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते. त्यांना नव्या गोष्टींचा ध्यास होता. मंत्री, मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाल्यानंतर राज्यासाठी, लातूरसाठी काय करता येईल, याचाच सतत ते विचार करीत आणि पावलेही उचलत. म्हणून तर त्यांचे नाव आजही जागोजागी घेतले जाते. विलासराव देशमुख हे माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे होते. मी कधीच त्यांचा स्पर्धक नव्हतो. पण, फॉलोअर्स नक्की होतो. खेळणे, पोहणे, घोडेस्वारी करणे अशा अनेक बाबी त्यांच्याकडे पाहून मी शिकत गेलो.

पुढे विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नांतून पहिला कारखाना लातूरच्या मातीत उभा राहिला. एकाचे दोन, दोनाचे चार कारखाने झाले. पुढे मोठी साखळीच तयार झाली. कारखान्यांचा आकडा वाढवत असताना गुणवत्तेशी कधीही तडजोड आम्ही केली नाही. मराठवाड्यातील लातूरात बारा महिन्यांच्या उसाला 3 हजार रुपये प्रति टन भाव दिला जातो आणि पश्चिम महाराष्ट्रात 18 महिन्यांच्या उसाला 3200 रुपयांचा भाव दिला जातो. ते 200 रुपये जास्त देत असले तरी शेतकऱ्यांना 18 महिने थांबावे लागते. अठरा महिन्यांच्या उसाला त्यांनी 4500 रुपयांचा भाव द्यायला हवा. पण तसे होत नाही.

दोन्हींची तुलणा केली तर आपला दर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांपेक्षा जास्त आहे. योग्य नियोजन, शिस्त आणि पारदर्शकता यामुळे आपले कारखाने कधीच तोट्यात आले नाहीत. कारखान्यातील पैसे बाजुला काढून आपण राजकारण करीत नाही. तसे केले तर कारखाने बंद पडतात. कारखाने बुडाले की बँक बुडते. बँक बुडवण्यासाठी वेगळे काही करावे लागत नाही, असेही दिलीपराव देशमुख यांनी सांगितले.

प्रसिद्धीसाठी वाचाळपणे बोलणारे नेते वाढलेत..

जेव्हा समाजाचे नेतृत्व करत असतो तेव्हा आपण मुल्य पाळली पाहीजेत. लाखो लोक आपले फॉलोअर्स असतात. त्यामुळे आपण आपली प्रतिमा जपण्याचे काम सतत केले पाहीजे. आपण चांगले केले तर लोक आपल्याला चांगला नेता म्हणतील. समाजात सन्मान, आदर हवा असेल तर बोलण्यात तारतम्य हे पाळलेच गेले पाहीजे. अलिकडे प्रसिद्धी हवी म्हणून वाचाळपणे बोलणारे नेते दिसतात. नाही बोलले तर लोक आपल्याला विसरतील, असे काही राजकीय नेत्यांना वाटत असावे.

चांगले बोलले तर छापून येत नाही, अशीही भीत काहींना वाटते. वर्तमानपत्रांच्या मुख्य पानावर झळकण्यासाठी प्रक्षोभक बोलण्याची पद्धतच जणू रूढ होवू लागली आहे. याला बोलणारेच अधिक जबाबदार आहेत, असे मला वाटते. म्हणून काय बोलू नये, हे राजकारण्यांना कळले पाहिजे, असा सल्लाही देशमुख यांनी दिला. कोणी आपल्यावर टीका केली तर त्याला प्रत्यूत्तर आपण द्यायचे नाही. प्रत्यूत्तर दिले की मग त्याचे रुपांतर आरे ला कारेमध्ये होते. एकमेकांमध्ये वाद वाढत जातो, संबंध बिघडतात.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT