Abdul Sattar-Ajit Pawar-EX MLA Nitin Patil Sarkarnama
मराठवाडा

Nitin Patil Join NCP (AP) : माजी आमदार नितीन पाटील यांना अब्दुल सत्तारांनी डावलले, अजितदादांनी सावरले..

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Politics : शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार नितीन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. 1999 मध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झालेले नितीन पाटील हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. 2004 मध्ये नितीन पाटील यांचा कन्नड विधानसभा मतदारसंघात अवघ्या सातशे मतांनी शिवसेनेकडून पराभव झाला होता.

राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी जिल्हा बॅंक ताब्यात घेण्यासाठी नितीन पाटील यांना शिवसेनेत प्रवेश करायला लावला होता. शिवसेनेत प्रवेश करताच पाटील यांना जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद देत सत्तार यांनी सगळी सुत्र आपल्या हाती ठेवली होती. पण सत्तार यांच्या मनमानी कारभाराला नकार देताच सत्तार यांनी जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावरून नितीन पाटील यांची उचलबांगडी केली आणि तिथे आपल्या समर्थकाची वर्णी लावली.

तेव्हापासून नितीन पाटील हे पक्षात आणि जिल्हा बॅंकेतही दुर्लक्षित होते. अब्दुल सत्तार यांनी जिल्हा बॅंक ताब्यात घेण्यासाठी नितीन पाटील यांचा वापर करून घेतला. बॅंकेचे अध्यक्षपद असूनही सत्तार यांचा हस्तक्षेप, ढवळाढवळ सहन न झाल्याने नितीन पाटील यांनी राजकीय दबावाला बळी पडत पदाचा राजीनामा दिला होता.

विशेष म्हणजे तोट्यात गेलेली औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक नफ्यात आणि सेक्शन अकरा मधून बाहेर आणण्यात नितीन पाटील यांचे वडील दिवंगत काँग्रसे नेते सुरेश पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. (Shivsena) प्रशाकीय खर्चांना कात्री लावत, बॅंकेचा कारभार शिस्तबद्धपणे चालवत सुरेश पाटील यांनी जिल्हा बॅंक नफ्यात आणली होती. पण त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सगळी सुत्र मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या हाती घेतली.

निवडणुकीत सत्ता मिळवत सत्तार यांनी जिल्हा बॅंक शिवसेनेच्या ताब्यात आणल्याचा गवगवा केला. पण खऱ्या अर्थाने बॅंक अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात गेल्याचे चित्र होते. दिवंगत नेते व जिल्हा बॅंकेचे प्रदीर्घ काळ अध्यक्ष राहिलेल्या सुरेश पाटील यांच्याबद्दल संचालक, बॅंकेचे सभासद, शेतकरी यांच्या मनात प्रचंड सहानुभूती होती. ती सत्तांतरानंतर कायम राहावी या हेतून अब्दुल सत्तार यांनी नितीन पाटील यांना शिवसेनेत प्रवेश करायला लावला.

अध्यक्षपदाचा राजीनामा दिला अन्..

पक्ष प्रवेश केल्यानंतरच बॅंकेचे अध्यक्ष पद नितीन पाटील यांच्याकडे सोपवले. पण सत्तार यांचा जिल्हा बॅंकेच्या कामातील वाढता हस्तक्षेप, मनाविरुद्ध घ्यावे लागणारे निर्णय यातून पाटील आणि सत्तार यांच्यात बरेच खटके उडाले. (Chhatrapati Sambhajinagar) यातून नितीन पाटील यांना अध्यक्षपदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या. संचालक मंडळ अध्यक्षांच्या विरोधात गेले आणि नव्या अध्यक्ष निवडीच्या प्रक्रिये आधीच नितीन पाटील यांनी अध्यक्ष पद सोडले.

त्यानंतर झालेल्या निवडणूकीत अब्दुल सत्तार यांच विश्वासू म्हणून ओळखले जाणारे अर्जून गाढे पाटील यांची या पदावर वर्णी लावण्यात आली. जिल्हा बॅंकेच्या राजकारणातूनच नितीन पाटील आणि मंत्री अब्दुल सत्तार यांचे संबंध बिघडले. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाने कन्नड विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून अब्दुल सत्तार यांच्यावर नुकतीच जबाबदारी दिली आहे.

सत्तार यांच्याच हाती कन्नडची सुत्रे गेल्याने ते येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळू देणार नाही, याचा अंदाज नितीन पाटील यांना आला होता. कन्नडमधून लढण्यासाठी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या तीनही पक्षातून मोठी स्पर्धा आहे. अशावेळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याशिवाय नितीन पाटील यांच्याकडे पर्याय शिल्लक नव्हता.

अखेर नितीन पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत आज त्यांच्या पक्षात प्रवेश केला. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे. परंतु लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभेला अनेक मतदारसंघात अदलाबदल होण्याची शक्यता आहे.

नितीन पाटील यांना कन्नडमधून उमेदवारी देण्याचा शब्द अजित पवारांनी दिला असल्याचे बोलले जाते. नितीन पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने कन्नडमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठी स्पर्धा पहायला मिळणार आहे. नितीन पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने अब्दुल सत्तार यांनी डावलले अन् अजितदादांनी सावरले, अशी जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

विधानसभेची वाट बिकटच..

दोन वेळा कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या नितीन पाटील यांच्यासाठी तिसऱ्यांदा मैदानात उतरणे सोपे असणार नाही. त्यात नितीन पाटील यांनी महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादीतच प्रवेश केल्याने अब्दुल सत्तार कन्नडची निवडणूक प्रतिष्ठेची करतील. शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान आमदार उदयसिंह राजपूत यांना रोखण्याबरोबरच नितीन पाटील यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी सत्तार निश्चित प्रयत्न करतील.

याशिवाय माजी आमदार हर्षवर्धन जाधव, माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या कन्नडमधून विधानसभा लढण्यास इच्छूक आहेत. अशावेळी महायुतीत कन्नडची जागा राष्ट्रवादीला सुटेल का? हा खरा प्रश्न आहे. अजित पवार यांनी नितीन पाटलांना पक्ष प्रवेश दिला, म्हणजे पुढची योजना त्यांच्या डोक्यात असणार एवढे मात्र नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT