Latur Municipal Corporation : महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचारात सध्या भाजपकडून ट्रिपल इंजिन सरकारचा वारंवार उल्लेख केला जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणातून या ट्रिपल इंजिनवर अधिक भर दिला. लातूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आता काँग्रेसकडून ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून विकासाचा दावा केला जात आहे.
पक्षाचे जिल्ह्यातील नेते आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी स्वतः आमदार, लातूरचे खासदार आणि आता निवडून येणारे काँग्रेसचे नगरसेवक म्हणजे आमचे ट्रिपल इंजिन असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती पक्षाकडून नगरपालिका, नगरपंचायत आणि आता महापालिका निवडणुकीतही केंद्र आणि राज्यातील युती सरकारचा दाखला देत हे सरकार ट्रिपल इंजिनचे असल्याचा दावा केला जात आहे.
या ट्रिपल इंजिनमुळेच राज्याचा विकास होत असल्याचे महायुतीचे नेते आपल्या भाषणांमधून सांगतात. खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी तर नांदेड महापालिका निवडणुकीत नरेंद्र मोदी म्हणजे देशाचे पावर इंजिन, देवाभाऊ हे महाराष्ट्राचे दुसरे इंजिन आणि अशोक चव्हाण नांदेडचे छोटे इंजिन म्हणत मतदारांना साद घालत आहेत.
लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र निवडणुका लढवत आहेत. अमित देशमुख यांच्या खांद्यावर या आघाडीची संपूर्ण धुरा आहे. प्रचार सभेतून आता ते ही ट्रिपल इंजिनचा उल्लेख करताना दिसत आहेत. नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा ट्रिपल इंजिनच्या माध्यमातून लातूर शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन ते देत आहेत.
राज्यातील महायुती सरकारमध्ये घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष लातूर महापालिका निवडणुकीत वेगवेगळे लढत असल्याचे दिसत असले तरी ते एकच आहेत, काँग्रेस पक्षाच्या मतांचे विभाजन करण्यासाठी त्यांची ही खेळी आहे. लातूरचे मतदार सुजाण आहेत त्यामुळे त्यांचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत याचा आम्हाला विश्वास असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.
लातूरकर योग्य तेच निवडतात...
काँग्रेसच्या मतावर अनेक पदे घेतलेले लोक आज स्वार्थासाठी इतर पक्षात जाऊन काँग्रेसवरच टीका करीत आहेत. या निवडणुकीत जनता त्यांना योग्य धडा शिकवेल. लातूर शहराचा आत्मा सर्व धर्म समभावाचा आहे, म्हणूनच येथे शांतता आणि विकासाला गती आहे. येथील प्रत्येक समाज घटक सकारात्मक आहे, त्यामुळेच मागच्या पन्नास वर्षापासून येथे लोकप्रतिनिधी म्हणून योग्य व्यक्तीची निवड होत राहिली आहे.
आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर, आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि अलीकडच्या काळात मी स्वतः लातूरचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला नाही, ही परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायची आहे, अशी साद अमित देशमुख घालताना दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.