Shivsena UBT News Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : बाळासाहेब ठाकरेंच्या आवडत्या संभाजीनगरात शिवसेनेची वाताहत! नेते बघ्याच्या भूमिकेत

Shiv Sena's defeat in Sambhajinagar, Khaire-Danve dispute hits the party - Uddhav Thackeray - Marathwada - Maharashtraएकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी झालेल्या बंडाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाताहत झाली आहे.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विशेष प्रेम असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये पक्षफुटी नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला घरघर लागली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि आता महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पक्षातील माजी महापौर, नगरसेवक, नेते, पदाधिकारी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली आहे.

विशेष म्हणजे पक्षाला लागलेल्या या गळतीचे रूपांतर भगदाडात होण्याची चिन्हे असताना पक्ष टिकवून ठेवण्याची जबाबदारी असलेल्या शिवसेना नेते (Chandrakant Khaire) चंद्रकांत खैरे आणि दुसरे नेते अंबादास दानवे यांनी मात्र सध्या बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसते आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सलग दोन लोकसभा निवडणूक आणि नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशामुळे पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यातच दानवे- खैरे यांच्या वादाने पक्षाची पुरती वाट लागल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे.

खैरे- दानवे यांच्यातील वर्चस्वाची लढाई ही तशी गेल्या अनेक वर्षांपूर्वीची. मात्र शिवसेना एकसंध असल्यामुळे त्याचा फारसा परिणाम आतापर्यंत जाणवला नव्हता. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्षांपूर्वी झालेल्या बंडाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची वाताहत झाली आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव गमावल्यानंतर आता पक्षातील एक एक नेते, पदाधिकारी, सत्ताधारी शिवसेनेची पालखी वाहण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई, पुणे, ठाणे या मोठ्या शहरानंतर शिवसेनेला बूस्ट मिळाला तो छत्रपती संभाजीनगर मधून. पक्षाची शाखा स्थापन झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. हिंदुत्ववादी विचार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर भूमिकेला संभाजीनगरकरांनी भरभरून साथ दिली. महापालिकेत पहिल्याच फटक्यात 27 नगरसेवक निवडून आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या विजयी सभेत लोटांगण घालत संभाजीनगरकरांचे आभार मानले होते.

बाळासाहेब ठाकरे झाले होते नतमस्तक..

त्यानंतर प्रत्येक जाहीर सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर वर आपले विशेष प्रेम असल्याचे सांगितले होते. आज मात्र त्यांच्या या आवडत्या संभाजीनगर शहरात पक्षाची दुरावस्था होत आहे. शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हाती नेतृत्व गेल्यानंतर खैरे आणि दानवे या दोघांच्याही समर्थकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत धोक्याची घंटा वाजवली होती. मात्र एकमेकांवर कुरघोडी आणि वर्चस्वाच्या लढाईतून खैरे- दानवे यांनी पक्षाची होणारी वाईट अवस्था उघड्या डोळ्यांनी पाहिली.

माजी महापौर नंदकुमार घोडेले व त्यांच्या पत्नी अनिता घोडेले यांना पक्षाने संभाजीनगर महापालिकेचे महापौर पद दिले होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची सावली म्हणून वावरणारे घोडेले यांनीही काल उद्धव सेनेला जय महाराष्ट्र केला. खैरे यांनी त्यांच्यावर टीका केली असली तरी घोडेले यांचा हा निर्णय पक्षाच्या नेत्यांना माहीत नव्हता, असे म्हणता येणार नाही. शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या भोवतीच संशयाचे जाळे असल्यामुळे ते कुणालाही रोखण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसते.

तर पक्ष फुटीचे खापर अंबादास दानवे यांच्या माथी फोडता येईल या विचारातून चंद्रकांत खैरे हे देखील पक्षाच्या गळतीकडे डोळेझाक करताना दिसत आहेत. घोडेले दांपत्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धवसेनेचे दहा ते 12 माजी नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. घोडेले यांच्या पक्ष सोडल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी या माजी नगरसेवकांची बैठक बोलावून त्यांना रोखण्यचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. परंतु साप निघून गेल्यानंतर भुई धोपटण्याचा हा प्रकार असल्याची चर्चा या निमित्ताने शिवसेनेच्या गोटात होत आहे.

माजी महापौर विकास जैन किशनचंद तनवाणी, नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले या शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षात असलेल्या नेत्यांनी ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धवसेनेची साथ सोडल्याने पक्ष निम्मा रिकामा झाल्याचे चित्र आहे. अशावेळी महापालिकेवर असलेली सत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कशी टिकवणार? असा सवाल केला जात आहे. अर्धा पक्ष रिकामा झाला तरीही चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे याकडे गांभीर्याने बघायला तयार नाहीत.

तर उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका राखायची आहे, अशावेळी त्यांचे आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे मराठवाड्यासह राज्यातील इतर भागाकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या संभाजीनगर शहरात उद्धवसेनेची झालेली ही दुरावस्था रोखण्यासाठी आता तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काही धडाडीचे निर्णय घेणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT