Beed Police Sarakarnama
मराठवाडा

Beed Crime : पोलिस अन् आरोग्य विभागाकडून फिल्मी स्टाइलने गेवराईत गर्भलिंग निदान व गर्भपात केंद्राचा भांडाफोड!

Busted the gender Diagnosis and abortion center : जाणून घ्या, सात दिवसांच्या प्लॅनिंगनंतर नेमकी कशी झाली कारवाई?

दत्त देशमुख

Beed News : बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात केला जात असल्याच्या तक्रारी नंतर या प्रकाराचा भांडाफोड करण्याचा चंग आरोग्य विभाग व पोलिसांनी बांधला. पण, या प्रकरणी कारवाईसाठी तीन विभाग एकत्र असूनही पाळलेली गेलेली गुप्तता या कारवाईच्या यशाचे इंगित ठरले. मात्र, इथपर्यंत पोहचायला सात दिवसांचा कालावधी लागला.

यासाठी पोलिस दलातीलच गर्भवती महिला कर्मचाऱ्याने डमी म्हणून घेतलेला सहभाग, दोन्ही विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दुचाकीवरुन इकडून - तिकडे करावा लागलेला प्रवास आणि शेतकऱ्याचा वेश हे या कारवाईची इनसाईड स्टोरी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दीड वर्षांपूर्वी बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणात गुन्हा नोंद झालेली मनिषा सानप पुन्हा जालनामधील डॉ. सतीश गवारेच्या साथीने गेवराईत याच प्रकारात सक्रीय झाल्याची तक्रार आरोग्य विभागाला प्राप्त झाली. 29 डिसेंबर रोजी जिल्हा शल्यचिकीत्सकांनी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली आणि यासाठी संयुक्त कारवाईची गरज व्यक्त केली.

ठाकूर यांनीही आरोग्य विभागाच्या साथीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे व अनैतिक मानवी व्यापार शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेखा धस दिल्या. कारवाईबाबतची माहिती, डॉ. बडे यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांच्याही कानी घातल्यानंतर त्यांनीही ‘गो अहेड’ म्हणून सांगितले.

दरम्यान, मनिषा सानप व डॉ. सतीश गवारे यांचा गोरखधंदा उघडा करण्यासाठी त्यांच्याकडे डमी महिला पाठविणे गरजेचे होते. अन्य एखादी महिला असेल तर ती आपली भूमिका बदलण्याचा किंवा न्यायालयात जबाब बदलण्याचा धोका असतो. जिल्ह्यातील प्रकरणांत असे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचारी किंवा शक्यतो पोलिस दलातील महिलाच असावी, असे प्लॅनिंग पोलिस(Police) अधीक्षक नंदकुमार ठाकूर व डॉ. अशोक बडे यांनी केले. योगायोगाने पोलिस दलातीलच एक कर्मचारी गर्भवतीही होती आणि या मोहिमेसाठी त्यांनी होकारही दिला आणि सहभागही घेतल्याने मोहिम फत्तेही झाली.

दरम्यान, आरोग्य विभागाला मिळालेल्या तक्रारीतील क्रमांकावर सोमवारी फोन लावून गर्भलिंग निदान करायचेय, असे विचारले असता समोरुन उडवाडवी झाली. त्यामुळे पुन्हा बुधवारी दुसऱ्या क्रमांकावर फोन लावल्यानंतर गुरुवारी गेवराईत या असा निरोप आला. यासाठी किती पैसे लागतील, असे विचारल्यानंतर ३५ हजारांत दोन्ही गोष्टी करण्याचे समोरुन मान्य करण्यात आले. कुठे यायचे हे विचारल्यानंतर सकाळी लवकर गेवराईत पोहचा, मग तुम्हाला सांगू कुठे यायचे असे उत्तर देण्यात आले.

या मोहिमेत सहभागी आरोग्य विभाग व पोलिस पथक सकाळीच गेवराईत(Gevrai ) पोहचले. डमी रुग्ण असलेल्या महिला कर्मचाऱ्यासोबत गणेश हंगे यांनी शेतकरी वेश धारण केला होता. काही जण बसस्थानक तर काही जण पंचायत समितीच्या कॉर्नरजवळ थांबले. बसस्थानकापासून फोन लावल्यानंतर मनिषा सानप तिथे पोहचली. तिने डमी रुग्ण महिलेला सोबत येण्यास सांगीतले व गेवराईतल्या संजय नगर भागातील हा प्रकार चालत असलेल्या घरी नेले.

याच वेळात जालना(Jalna)वरुन डॉ. सतीश गवारे आपल्या वाहनाने गेवराईतील एका हॉटेलवर उतरला व दुचाकीवरुन तोही संबंधित ठिकाणी आला. त्याने अगोदरच या ठिकाणी आलेल्या एका महिलेचे गर्भलिंग निदान केले. डमी रुग्ण असलेल्या कर्मचारी महिलेबद्दल त्याला शंका आल्याने त्याने झटापट करुन पळ काढला. दरम्यान, आरोग्य विभाग व पोलिस यांच्यातील संयुक्त मोहिमेचे नियोजन 29 डिसेंबरला सुरु झाले. 1 जानेवारीला अपयशही आले. तर, गुरुवारी मोहिम फत्ते झाली. मात्र, या काळात पाळली गेलेली गुप्तता या भांडाफोडीचे इप्सीत ठरली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT