Balasaheb Thackeray-Uttamprakash Khandare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेबांनी, गिरणी कामगाराच्या मुलाला उमेदवारी दिली अन् मंत्रीही केलं...

Solapur Shivsena : पंधरा मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला बाळासाहेबांनी आत बोलावले आणि विचारले ‘तुम्ही पोटनिवडणूक लढवायची म्हणता...

Vijaykumar Dudhale

Solapur News : उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाची 1993 मध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली. माझ्या अंगात निवडणूक लढविण्याची खुमखुमी आलेली. त्यामुळे शिवसेनेने ही पोटनिवडणूक लढवावी, यासाठी आम्ही मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर आग्रह धरला. आमचा आग्रह पाहून बाळासाहेबांनी इतर नेत्यांशी चर्चा केली आणि सुभाष देसाई यांनी ही पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा करीत माझी उमेदवारी जाहीर केली. प्रचारासाठी खुद्द बाळासाहेब आले होते. तेव्हापासून मी सहा निवडणुका लढवल्या आणि सलग तीन जिंकल्या. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मी मंत्री झालो, हे केवळ शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादामुळेच शक्य झाले, अशी आठवण माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी सांगितली. (Balasaheb Thackeray gave a ticket to the son of Mill worker and made him a minister)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खंदारे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या आयुष्याचा पट उलगडला. गिरणी कामगाराचा मुलगा केवळ बाळासाहेबांमुळे मंत्री बनू शकतो, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

शिवसेनेच्या पाठिंब्यावर 1989 मध्ये मुंबईच्या शिवाजी पार्कवर झालेल्या हिंदू अभिमानी दलित मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पहिले दर्शन झाले होते. पण, शिवसेनाप्रमुखांवर मी खरा प्रभावित झालो, गोपलेसाहेबांना चांदीची तलवार भेट देऊन केलेल्या आवाहनामुळे. ‘उठा गोपले... ही भवानीमातेची तलवार घ्या आणि मातंगाच्या शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी माझी शिवसेना आणि मी तुमच्यासोबत आहे. गेंड्याच्या कातडीच्या सरकारसमोर उपोषण कसले करताय? चला रस्त्यावर उतरू,’ बाळासाहेबांचे ते शब्द ऐकून मी भारावून गेलो. मनात विचार आला, मातंग समाजाला झेंडा नाही, असे समाज म्हणतो, मग हाच आपलाच आहे ना’ हीच भावना मनात ठेवून मी सोलापूरला आलो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खंदारे म्हणाले, शिवसेनेकडूनच 1993 ची पोटनिवडणूक लढवायची, या निश्चयाने वर्तमानपत्रातील बातमी घेऊन दोन सहकाऱ्यांसोबत तत्कालीन सोलापूर शहरप्रमुख अजय दासरी यांच्या अशोक चौकातील आम्रपाली हाॅटेलजवळील चादर कारखान्यात भेटून चर्चा केली. दासरी सरांनी संपर्कप्रमुख आमदार रमेश प्रभू यांच्या नावाने पत्र दिले.

मी साईनाथ अभंगराव, प्रकाश वानकर, आणखी दोघे इच्छुक ढावरे आणि वाघमारे मुंबईला पोहोचलो. शिवसेना भवनमध्ये रमेश प्रभू आणि सुधीर जोशी आम्हाला भेटले. त्यांनी सांगितले, साहेबांनी तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता मातोश्रीवर बोलावले आहे. आम्ही मातोश्रीवर पोहोचलो. पंधरा मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला बाळासाहेबांनी आत बोलावले आणि विचारले ‘तुम्ही पोटनिवडणूक लढवायची म्हणता. काॅंग्रेस पैशावर व जातीवर निवडणुका लढविते. तुम्ही निराश होणार, समाजाची मते मिळणे अवघड आहे,' असे बाळासाहेबांनी मला बजावले.

मी शिवसेनाप्रमुखांसमोर ‘उत्तर सोलापूरची पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी,’ असा आग्रह धरला. ताकदीने निवडणूक लढविण्याचा शब्दही दिला. आमची दांडगी इच्छाशक्ती पाहून शिवसेनाप्रमुख म्हणाले, ‘माझा आशीर्वाद आणि शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. शिवसेना जातपात मानत नसल्याने 1990 च्या निवडणुकीत कशा चुका होऊन एसीच्या जागेवर एसटीचे उमेदवार दिले गेले, अशा अनेक घटना कथन करून आपल्याला महाराष्ट्रात बहुजनांचे राज्य आणायचे आहे, हे सांगून आम्हाला त्यांनी थोडावेळ बाहेर थांबायला सांगितले, असेही उत्तमप्रकाश खंदारे यांनी नमूद केले.

तोपर्यंत मातोश्रीबाहेर मीडियाही जमला होता. थोड्या वेळाने सुभाष देसाई बाहेर आले. मीडियाला संबोधित करताना ते म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुखांनी उत्तर सोलापूरची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून उत्तमप्रकाश खंदारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मी आश्चर्यचकित झालो. उमेदवारी तर मिळाली, पण पैशाची बोंब. आता काय होणार समजेना, त्यात पुन्हा राखीव मतदारसंघाची पोटनिवडणूक, प्रचारासाठी कोण येणार? स्थानिक पातळीवरच निवडणूक लढवावी लागणार होती! ही मनभावना लगेच गळून पडली.

शिवसेना नेते मनोहर जोशी हे दमाणी सभागृहात प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आले. (स्व.) लिंगराज वल्याळ आमदार म्हणून, तर किशोर देशपांडे हे निवडणूकप्रमुख म्हणून उपस्थित होते. लगेच दत्ताजी नलावडे, लीलाधर डाके प्रचारासाठी आले. सुभाष देसाई यांच्याही सभा झाल्या. शरद आचार्य हे तर मतदान होईपर्यंत सोलापुरात तळ ठोकून होते. अरविंद सावंत हे सुरुवातीपासूनच प्रचारात होते. मी तर भारावूनच गेलो होतो.

पुन्हा आश्चर्याचा मोठा धक्का बसला. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रचारसभेसाठी सोलापूरला आले. उद्धव आणि राज हेही साहेबांसोबत माझ्या प्रचाराला आले होते. मी रात्री उशिरा डाकबंगल्यावर पोहोचलो. साहेब विश्रांती घेत होते. सकाळी डाकबंगल्यावर पोहोचून बाळासाहेबांचे आशीर्वाद घेतले, तेव्हा ते म्हणाले, ‘खंदारे तुमच्या आई-वडिलांना बोलवा, मला त्यांना भेटायचे आहे,’ असे बाळासाहेब म्हणताच मी हादरलो. मनातल्या मनात विचार केला, वडील गिरणी कामगार. परंतु आई-वडील आल्यानंतर साहेबांनी त्यांना बसविले. माझे कौतुक करून मलाच उमेदवारी का दिली, ते सांगून आई-वडिलांसोबत फोटो काढले.

शिवसेनाप्रमुखांची सायंकाळी होम मैदानावर प्रचंड मोठी सभा झाली. सभेनंतर बाळासाहेब, गाडीत बसले, मी त्यांना अभिवादन करण्यासाठी गाडीजवळ उभा होतो. मला पाहून बाळासाहेबांनी काच खाली केली. मला म्हणाले, ‘खंदारे यश घेऊनच मुंबईला या. नाही यश आलं तरी हरकत नाही. मी पुढच्या वेळेसही तुमचाच विचार करणार आहे, जय महाराष्ट्र.’

पुढे मी विधानसभेच्या सहा निवडणुका लढलो. त्यातील तीन सलग जिंकलो. मी असा भाग्यवान आहे की, सहाही वेळेस मातोश्रीवरून माझी उमेदवारी जाहीर झाली. पहिल्याच टर्ममध्ये राज्यमंत्रीही झालो. त्यानंतर शिवसेना विधिमंडळ पक्षाचा प्रतोद ते आता सहसंपर्कप्रमुख असा माझा प्रवास शिवसेनाप्रमुख, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे झाला आहे. हीच जाणीव आणि निष्ठा अखेरच्या श्वासापर्यंत राहील, अशी ग्वाहीही माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी या वेळी दिली.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT