Latur News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ती हिंदुत्व, मराठी माणूस या मुद्यावर. काँग्रेसविरोध हा बाळासाहेब आणि शिवसेनेचा कायम अजेंडा राहिला. पण एखाद्या काँग्रेसच्या बड्या नेत्याने मदतीचा हात मागितला, तर त्याबदल्यात बाळासाहेब त्याला थेट पक्षात घेण्याचाच प्रयत्न करायचे. काँग्रेसचे दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांना फार वर्षांपूर्वी शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. (Balasaheb Thackeray offered Vilasrao Deshmukh to join Shiv Sena)
माझ्या रक्तातली काँग्रेस तुम्ही कशी काढणार? असे म्हणत विलासरावांनी बाळासाहेबांची ती ऑफर नम्रपणे नाकारली होती. परिणामी विलासरावांचा विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. विलासराव देशमुख यांचा 1995 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे ते बेचैन होते, त्यामुळे विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी त्याची धडपड सुरू होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेसने त्यांना 1996 मध्ये विधान परिषदेची उमेदवारी नाकारत झटका दिला होता. मग काय विलासरावांनी थेट अपक्ष लढवण्याचा निर्णय घेत दंड थोपटले. अपक्ष निवडून येण्यासाठी त्यांना विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या मतांची जमवाजमव करावी लागणार होती. ही कसरत करूनही विजयाचे गणित जुळत नव्हते. मग त्यांनी शिवसेनेची मदत घेण्याचे ठरवले. त्यावेळी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. विलासराव आपल्याकडे मदत मागणार, हे लक्षात आल्यावर बाळासाहेबांनी त्यांना थेट शिवसेनेची उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली आणि तशी ऑफरच देऊन टाकली.
मदतीच्या बदल्यात थेट काँग्रेस सोडून विचारधारेच्या विरोधातील पक्षात प्रवेश करणे म्हणजे राजकीय आत्महत्या ठरेल, हे मुरब्बी विलासरावांनी ओळखले. मग बाळासाहेबांची ऑफर त्यांनी नम्रपणे नाकारली. बाळासाहेबांनीही त्यांच्या विचाराचा आदर करत बिनशर्त पाठिंबा देण्याचे मान्य केले. पण, शिवसेनेचा पाठींबा असतानाही विधान परिषद निवडणुकीत विलासरावांना पराभवाला सामोरे जावे लागले.
विधानसभेच्या 1995 च्या निवडणुकीत विलासराव देशमुख यांचा शिवाजी पाटील कव्हेकर यांनी पराभव केला होता. कव्हेकर हे जनता दलाचे उमेदवार होते. तेव्हा विलासरावांच्या पराभवाची आणि कव्हेकराच्या विजयाची जोरदार चर्चा राज्यभरात झाली होती. पुढे 1996 मध्ये विधान परिषद निवडणूक लागली, तेव्हा विधानसभेत पराभूत झालेल्यांना विधान परिषदेत संधी देऊ नये, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. तरीही त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवारांनी त्यांचे समर्थक असलेल्या छगन भुजबळांचं नाव विधान परिषदेसाठी पुढे केलं.
मग विलासराव देशमुखांनीही बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले. बंडखोरी केली म्हणून काँग्रेसने त्यांना पक्षातून काढून टाकले. या निवडणुकीत शिवसेनेने विलासराव देशमुखांना पाठिंबा दिला. मात्र, तो देण्याआधी बाळासाहेब ठाकरे यांनी विलासरावांना शिवसेनेत येण्याची ऑफरही दिली होती. मात्र, 'माझ्या रक्तातील काँग्रेस तुम्ही कशी काढणार?' पराभव झाला तरी बेहत्तर, पण काँग्रेसचा विचार सोडणार नाही, असे उत्तर विलासरावांनी तेव्हा दिले होते.
गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबध होते. विलासराव देशमुख यांचे अपक्ष उमेदवार म्हणून विधान परिषदेला सामोरे गेलेल्या विलासरावांचा शिवसेनेचा पाठिंबा असतानाही पराभव झाला होता. विलासराव देशमुखांना पहिल्या पसंतीची 19 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील उमेदवार राठोड यांना 20 मते मिळाली होती. त्यानंतर पुन्हा शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशा राजकीय संघर्षात बाळासाहेबांनी विलासराव देशमुख यांच्यावर खास ठाकरी शैलीत अनेकदा हल्ला चढवला होता.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.