Narayan Patil-Tanaji Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karmala Politics : बागल भाजपत जाताच आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी घेतली नारायण पाटलांची भेट

Tanaji Sawant Meet Narayan Patil : विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी तानाजी सावंत यांनी विद्यमान आमदार नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना तिकिट दिले होते. रश्मी बागल ह्या शिवसेनेकडून लढल्या, तर नारायण पाटील हे अपक्ष लढले. त्यातून शिवसेनेने आपली जागा गमावली. आता त्याच रश्मी बागल यांनी पुन्हा पक्ष बदलला असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आण्णा काळे

Karmala News : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज (ता.10 मार्च) करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांची जेऊर येथे जाऊन भेट घेतली. सावंत आणि पाटील यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पाटील हे गेल्या काही दिवसांपासून सावंतांपासून फाटकून वागत होते. तसेच, गेल्या निवडणुकीत पाठबळ दिलेल्या रश्मी बागल आणि त्यांचा गट भाजपत गेल्यानंतर सावंत यांनी पाटील यांची भेट घेणे महत्वाचे आहे.

उजनी धरणातून मराठवाड्याला जाणाऱ्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे आज करमाळा (Karmala) तालुक्यातील दहिगाव येथे आले होते. सावंत यांनी दहिगावला जाण्यापूर्वी जेऊर ग्रामपंचायात कार्यालयात आले. माजी आमदार नारायण पाटील यांनी सावंतांचे स्वागत केले. मंत्री सावंत यांचा पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, माजी सभापती अतुल पाटील यांनी सत्कार केला.

माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. मात्र, गेली अनेक दिवसांपासून पाटील हे पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहत असल्याचे दिसून येत आहे. करमाळ्यात झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यालाही पाटील गेले नव्हते. तसेच, सावंत आणि पाटील यांच्यातही दुरावा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीवेळी तानाजी सावंत यांनी विद्यमान आमदार नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना तिकिट दिले होते. रश्मी बागल ह्या शिवसेनेकडून लढल्या, तर नारायण पाटील हे अपक्ष लढले. त्यातून शिवसेनेने आपली जागा गमावली. आता त्याच रश्मी बागल यांनी पुन्हा पक्ष बदलला असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, विधानसभेचे तिकिट कापूनही नारायण पाटील यांनी सावंत यांच्याशी जुळवून घेतले. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या प्रकरणात सावंत यांनी राज्य सहकारी बँकेचे पैसे भरून कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळी माजी आमदार नारायण पाटील आणि बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल हे दोघेही सावंत यांचे ऐकत होते.

आदिनाथ कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून आरोग्य मंत्री सावंत यांनी स्वतःच्या मर्जीतील प्रशासकीय संचालक मंडळ नेमले आहे. ते नेमताना मंत्री सावंतांनी नारायण पाटील आणि बागल या दोघांकडेही दुर्लक्ष केले होते. त्यामुळे सावंत हे बागल आणि पाटील यांचा वापर करत आहेत, अशी चर्चा करमाळा तालुक्यात होती.

माजी आमदार पाटील हे सावंत यांच्यापासून लांब राहत होते. करमाळा येथील शिवसंकल्प मेळाव्यासाठी संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी फोन करूनही नारायण पाटील हे या मेळाव्याला गेले नव्हते. या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी पाटील यांची भेट घेणे महत्वाचे ठरत आहे. सावंत आणि पाटील यांच्यात पंधरा ते वीस मिनिट चर्चा केली. या चर्चेचा मात्र तपशील समजू शकला नाही.

आमच्यात दुसरी कोणतीही चर्चा झाली नाही : नारायण पाटील

आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे जेऊर ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. आम्ही त्यांचे स्वागत केले, त्यांचा आदर सत्कार केला. आमच्यामध्ये वेगळ्या कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही, असे माजी आमदार नारायण पाटील यांनी या भेटीबाबत सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT