Prathmesh Kothe-Mahesh Kothe
Prathmesh Kothe-Mahesh Kothe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : सोलापुरात भाजप-राष्ट्रवादीत वाद पेटला; कोठे पिता-पुत्रांविरोधात गुन्हा दाखल

प्रमोद बोडके

Solapur News : विकास कामांच्या श्रेयावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात श्रेयवादावरून झालेला वाद चांगलाच पेटला आहे. या हाणामारीप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी महापौर महेश कोठे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये कोठे यांचे सुपुत्र तथा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे आणि माजी नगरसेवक विठ्ठल कोटा यांचा समावेश आहे.

या प्रकरणी भाजपचे सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांचे समर्थक तथा सोलापूर शहर भाजपचे कार्यकारिणी सदस्य सतीश कलप्पा भरमशेट्टी (रा. सरवदे नगर, जुना विडी घरकुल, मुळेगाव रोड, सोलापूर) यांनी फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीवरून रविवारी मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास या पाच जणांवर मारहाण करणे, दमदाटी करणे व जमाव जमविणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूरच्या पूर्व भागातील विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिर ते राज इंग्लिश मीडियम स्कूलपर्यंतच्या डांबरी रस्त्याच्या उद्‌घाटनावरून कोठे आणि देशमुख समर्थक भाजपचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात हाणामारी झाली होती. हाणामारीच्या घटनेनंतर आमदार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख आणि महेश कोठे (Mahesh Kothe) व त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्यासह दोन्ही पक्षाच्या समर्थकांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पराविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडले होते.

भरमशेट्टी यांनी रस्त्याच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमास देशमुख यांना का निमंत्रित केले म्हणून महेश कोठे, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, शाबीर कुर्ले आणि जावळे सर यांनी जमाव जमवून लोखंडी वस्तूंनी मारहाण केली. भांडण सोडविण्यास आलेल्या माझ्या पत्नीलाही लागले आहे, असे भरमशेट्टी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात भरमशेट्टी यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

महेश कोठे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. गेली वर्षे ते दीड वर्षापासून ते विधानसभेची तयारी करत आहेत. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना आव्हान देण्याचा प्रयत्न कोठे यांच्याकडून हेाताना दिसत आहे. विधानसभेच्या संभाव्य प्रतिस्पर्ध्यांमधील निवडणूक कशी असणार याची चुणूक काही महिने आधीच सोलापूरकरांना पहायला मिळाली आहे.

सत्तेचा गैरवापर सुरू आहे, पोलिस आयुक्तांना भेटणार : महेश कोठे

दरम्यान, एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणाची फिर्याद देण्यासाठी आम्ही गेलो होतो. मात्र, पोलिसांनी आमची फिर्याद घेतली नाही. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने आमची फिर्याद त्यांनी घेतली नाही, असा आरोप महेश कोठे यांनी केला. आमच्याच कार्यक्रमात येऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या सत्तेचा गैरवापर सुरू आहे. पोलिसांनी आमची बाजू समजून घ्यावी आणि आमचीही फिर्याद घ्यावी, यासाठी आम्ही पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी भेटणार आहे, असेही महेश कोठे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT