Ranjitsinh Naik Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madha Politics : मतासाठी कुणाच्या बंगल्यापुढे झुकणार नाही; निंबाळकरांचा खणखणीत इशारा कोणाला?

Vijaykumar Dudhale

Natepute News : स्टेजवर आज काही लोक नाहीत. पण, नाईक निंबाळकर हा द्वेषाने राजकारण करणारा कार्यकर्ता नाही. दुरावा ठेवून काम करणारा नाही. आज व्यासपीठावर नसतील ते उद्या येतील. तिकीट मागायचा अधिकार सर्वांना आहे. माझ्या विरोधात कितीही बातम्या छापून आणल्या तरीही मी नेत्यांच्या आदेशाने काम करीत राहणार आहे. मतासाठी कुणाच्या बंगल्यापुढे झुकणार नाही, असा शब्द देतो, अशा शब्दांत भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पक्षांतर्गत विरोधकांना इशारा दिला. (Ranjitsinh Naik Nimbalkar's warning to the opponents within the BJP party)

माढा मतदार संघातील कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा व स्नेह भोजनाचे आयोजन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले होते. माजी मंत्री सदाभाऊ खोत हे मेळाव्याचे अध्यक्ष होते. आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, उत्तमराव जानकर, रणजित शिंदे, योगेश बोबडे, के. के. पाटील, राजकुमार पाटील, महाळुंग-श्रीपूरच्या नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण, माळशिरसचे नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख, ज्योती पाटील, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मेळाव्याकडे मोहिते पाटील समर्थकांनी संपूर्णपणे पाठ फिरवली. विशेष म्हणज आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, राम सातपुते यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर असूनही हे दोघे मेळाव्याला अनुपस्थित होते. तसेच, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान आवताडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी पंढरपूरला गेले होते.

निंबाळकर म्हणाले की, लोकसभेची मागील निवडणूक मी पाणी प्रश्नावर लढवली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने मतदारसंघाचा तो प्रश्न मार्गी लावला आहे. निवडणुकीच्या अगोदर ही सर्व कामे सुरू झाली तरच मी निवडणुकीचा फार्म भरेल. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना मागील सरकारने रद्द केली होती. मात्र, ती मी नव्याने मंजूर करून घेतली आहे. त्याचबरोबरच लोहमार्गाचा सव्वाशे वर्षांचा प्रश्नही सोडविला आहे.

ट्रोलिंग करणाराला ट्रॉलिंगने उत्तर देऊ नका. त्या लोकांना आपण कामाने उत्तर देऊ. काम हेच अशा लोकांना उत्तर आहे. आगामी निवडणुकीत मी साडेतीन लाख मतांनी विजयी होणार आहे, असा विश्वासही खासदारांनी पुन्हा व्यक्त केला.

माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाचा दावा केला आहे. निंबाळकर हे आगामी निवडणुकीत दोन लाखांच्या मताधिक्याने विजय होतील. सामान्य कार्यकर्ते आज त्यांच्यासोबत आहेत. राजकारणात सगळ्यांनाच वाटतं असतं, कायम आपल्यालाच सत्ता मिळावी. खासदार, आमदार आपणच असलं पाहिजे. त्यात दुसरं कोणी आलं नाही पाहिजे, असा टोला खोत यांनी लगावला.

पाण्यासाठी ४५ वर्षांपूर्वी (कै.) हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी लढा उभारला होता. त्याला आता यश आले आहे. सुमारे सात टीएमसी पाणी त्यांनी सांगोला तालुक्याला मिळवून दिले आहे. स्वप्ने सगळ्यांनी बघावीत, ती चुकीची नसतात. पण, हा भाजप आहे. थोडं जरी तिरकं वागलं तरी काय खरं नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाचं वेगळं आणि भाजपचं वेगळं आहे, असा इशारा आमदार शहाजी पाटील यांनी दिला.

पाणी प्रश्न सोडविण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनीही प्रयत्न केले. मात्र, त्यांना नेतृत्वाने साथ दिली नाही. माढा मतदासंघाच्या उमेदवारीचा विषय आहे, आमच्या घरातील विषय आहे. तो भाजप आपल्या घरात सोडवेल. त्याची इतरांनी चिंता करण्याची गरज नाही. रणजितदादा आमच्यासोबत येतील. निवडणुकीसाठी तिकिट मागायचा अधिकार सर्वांना आहे, असेही जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

श्रीकांत भारतीय यांचा संदेश स्क्रीनवर दाखवण्यात आला. तसेच, उत्तमराव जानकर, चेतनसिंह केदार, ज्योती पाटील, दीपक साळुंखे आदींची भाषणे या वेळी झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT