Praveen Mane  Sarkarnama
पुणे

Fadnavis Indapur Tour : पवारांच्या सभेला दांडी मारणाऱ्या दशरथ मानेंची फडणवीसांनी घरी जाऊन घेतली भेट

Indapur BJP Melava : माने पिता-पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसची पर्यायाने पवारांची साथ सोडणार का, अशी चर्चा रंगली होती. त्यावर आज फडणवीस यांनी माने यांच्या घरी भेट देऊन शिक्कामोर्तब केले आहे. आता फडणवीस मेळाव्यात माने यांच्यावर काय बोलणार का, याकडेही सर्व इंदापूरचे लक्ष असणार आहे.

संतोष आटोळे

Pune, 05 April : इंदापूरच्या दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाट वाकडी करत इंदापूरचे ज्येष्ठ नेते, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्या घरी जाऊन भेट घेतली. दशरथ माने हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मात्र, मागील दहा दिवसांपूर्वी शरद पवार यांची इंदापूरमध्ये सभा झाली होती, त्या सभेलाही माने अनुपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) इंदापूरमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल, पृथ्वीराज जाचक, प्रवीण माने उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, इंदापूरच्या दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी मेळाव्याच्या ठिकाणी जाण्याअगोदर वाट वाकडी करत पुणे जिल्हा माजी सभापती दशरथ माने (Dashrath Mane) यांच्या घरी भेट दिली आहे. दशरथ माने हे इंदापूरच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. ते स्वतः जिल्हा परिषदेला निवडून आले हेाते. तसेच त्यांचे चिरंजीव प्रवीण मानेही जिल्हा परिषदेत सभापती होते. सोनाई परिवाराच्या माध्यमातून त्यांनी दूध आणि गूळ व्यवसायात नावलौकिक मिळविला आहे.

सोनाई दूध हे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेला ब्रॅंड आहे. त्या माध्यमातून माने यांनी अनेकांना रोजगार दिला आहे. त्यामुळे इंदापूर विधानसभेचा निकाल ठरविण्यात माने यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. एकसंघ राष्ट्रवादीत ते राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते होते. मात्र, राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. मात्र, इंदापुरात झालेल्या पवारांच्या सभेला माने पिता-पुत्रांनी दांडी मारली होती.

माने पिता-पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसची पर्यायाने पवारांची साथ सोडणार का, अशी चर्चा रंगली होती. त्यावर आज फडणवीस यांनी माने यांच्या घरी भेट देऊन शिक्कामोर्तब केले आहे. आता फडणवीस मेळाव्यात माने यांच्यावर काय बोलणार का, याकडेही सर्व इंदापूरचे लक्ष असणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT