Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Loksabha Election 2024 : अजितदादांना हव्यात लोकसभेच्या दहा ते बारा जागा!

Chaitanya Machale

Pune News : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असतानादेखील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. महाविकास आघाडी तसेच महायुतीमध्ये सहभागी असलेल्या कोणाचेच जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात नक्की कोणत्या पक्षाचा उमेदवार उभा राहील, याबद्दल इच्छुक उमेदवारांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महत्त्वाच्या नेत्यांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगत पक्ष ताब्यात घेतलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील नेत्यांकडून काही जागांचा आग्रह धरला जात आहे. शिरूर, बारामती या लोकसभा मतदारसंघांबरोबरच दहा ते बारा मतदारसंघ आपल्या पदरात पडावेत, यासाठी अजित पवार गटाचे नेते विशेष आग्रही आहेत. त्यासाठी त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारीदेखील सुरू केलेली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीत सहभागी असलेले अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीत सहभागी असलेल्या इतर घटक पक्षांची एक बैठक आज पुण्यात होत आहे. या बैठकीला सर्वच पक्षांचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून, यामध्ये कोणती जागा कोणत्या पक्षाने लढवावी, याबद्दल चर्चा होऊन तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटातील नेत्यांकडून राज्यातील 48 जागांपैकी किमान दहा ते बारा जागा आपल्याला मिळाव्यात, यासाठी प्रयत्न केला जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या वतीने 195 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही उमेदवाराचा समावेश करण्यात आलेला नाही.

शिंदे-फडणवीस सरकारला जाहीरपणे पाठिंबा देत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले. तसेच त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झालेले ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची मंत्रिपदे बहाल करण्यात आलेली आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत अधिकाधिक जागांवर आपले उमेदवार कसे उभे करून विजयी करता येतील, यासाठी अजितदादा गटाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

बारामती, शिरूर यांसह अन्य मतदार संघातील जागा द्या...

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षाच्या मदतीने विजय मिळविण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार देऊन ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून केला जात आहे.

याबरोबरच शिरूर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघामध्ये उमेदवार देत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पराभव करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केलेले आहे. त्यामुळे बारामती, शिरूर या जागांसाठी ते विशेष आग्रही आहेत. शिरूर, बारामती, सातारा रायगड या लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. या जागांबरोबरच भाजपकडे असलेल्या माढा, गडचिरोली, शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेल्या हिंगोली, बुलढाणा या जागांसह परभणी, धाराशिव या जागा आपल्याला द्याव्यात, अशी भूमिका अजित पवार गटातील नेत्यांनी घेतलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे (Pune) जिल्ह्यात येत असलेल्या बारामती-शिरूर आणि पुणे शहर या लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात महायुतीत सहभागी असलेल्या कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडणूक लढू शकेल आणि विजयी होऊ शकेल, यावर चर्चा करण्यासाठी आज चंद्रकांत पाटील यांनी सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत चर्चा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहेत. या तिन्ही लोकसभा मतदारसंघांचा चंद्रकांत पाटील आढावा घेत वरिष्ठांना अहवाल देणार आहेत.

भाजप पक्ष कार्यालयात होणार बैठक...

डीपी रस्त्यावरील भाजपच्या नवीन पक्ष कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीसाठी महायुतीत सहभागी असलेल्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भाजप, शेतकरी संघटना, लोक जनशक्ती पार्टी, आरपीआय तसेच शिवसंग्राम या पक्षांचे नेते आणि वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असून, या बैठकीनंतर जागांचे धोरण निश्चित होण्याची शक्यता आहे, असे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT