Solapur News : पश्चिम महाराष्ट्रातील तरुण आणि बडा चेहरा गळाला लागल्याने भारत राष्ट्र समितीचे प्रमुख, तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपल्या सर्व मंत्र्यांना घेऊन भगीरथ भालके यांच्या पक्षप्रवेशासाठी सरकोलीत (ता. पंढरपूर) आले होते. मोठा गाजावाजा करत भालकेंचा बीआरएसमध्ये प्रवेश झाला. त्यांना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसमन्वयकही करण्यात आले. मात्र, भगीरथ भालके यांनी बीआरएसच्या वाढीसाठी सोलापूर जिल्ह्यात एकही दौरा केल्याचे ऐकिवात नाही. भालके हे पक्षवाढीसाठी काम करताना दिसत नाहीत, त्यामुळे भालकेंच्या मनात नेमकं काय चालू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Bhagirath Bhalke will not be active in BRS party)
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर विधानसभा लढलेले भगीरथ भालके यांनी भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना जोरदार टक्कर दिली. मात्र, त्या पोटनिवडणुकीत भालकेंचा निसटत्या मताने पराभव झाला. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भगीरथ यांच्या पाठीशी सहानुभूतीचे मोठे वलय होते. त्यानंतरही त्यांचा पराभव झाल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह स्थानिकांतही अस्वस्थता होती. त्यातूनच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हायकमांडच्या गळाला लागले आणि भगीरथ भालके यांनी उचल खाल्ली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अभिजित पाटील यांना पक्षश्रेष्ठींनी जवळ केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भगीरथ भालके नाराज होते. त्याचवेळी भारत राष्ट्र समितीही तेलंगणाबाहेर आपला विस्तार करू पाहत होती. भारत भालके यांचे चिरंजीव आणि पोटनिवडणुकीत दिलेली कडवी झुंज यामुळे भगीरथ यांचे राजकीय महत्त्व वाढले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील नाराज भगीरथ यांच्यावर माजी आमदार केशवअण्णा धोंडगे यांच्या माध्यमातून केसीआर यांनी जाळे फेकले आणि राष्ट्रवादीतील नाराज भगीरथ बीआरएसच्या जाळ्यात अडकले.
पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात मास बेस असलेला तरुण चेहरा गळाला लागल्याने केसीआरही खूश हेाते. त्यातून त्यांनी भगीरथ भालके यांना भेटायला तेलंगणाला बोलावले आणि त्यांच्या खास हैदराबादहून विमान पाठवले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी भालके यांच्या प्रवेशासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री खुद्द केसीआर आले होते. येताना त्यांनी अख्खं मंत्रिमंडळ सोबत आणलं होतं. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश झाला. त्या वेळी आम्ही संपूर्ण ताकदीने भालके यांच्या पाठीशी राहू, असे केसीआर यांनी सांगितले होते.
बीआरएसमधील प्रवेशानंतर केसीआर यांनी भालके यांच्याकडे पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सहसमन्वयकपदाची जबाबदारी दिली होती. सोलापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात बीआरएस पक्षाची संघटना वाढविण्याची जबाबदारी भालके यांच्याकडे देण्यात आली होती. पुढे तेलंगणातील निवडणुकीत केसीआर यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. त्यामुळे ज्या सत्तेकडे पाहून महाराष्ट्रातील नेत्यांनी बीआरएसकडे प्रवेश केला होता, ती गेल्याने सर्वजण अज्ञातवासात गेले. भालके तर अगोदरपासून अलिप्त वागत होते. सत्ता असतानाही आणि आताही भगीरथ भालके यांनी बीआरएसच्या वाढीसाठी एकही दौरा केल्याचे दिसून येत नाही.
अजितदादांशी जवळीक
दरम्यान, अजित पवार हे शिवसेना-भाजप युतीसोबत राज्य सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर काही दिवसांनी भगीरथ भालके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांना पक्ष प्रवेशाचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यावर भालके यांचा अजूनही निर्णय झालेला नाही. मात्र, भालके हे अजित पवार गटाच्या जवळ गेल्याची चर्चा आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.