Shivajirao Adhalrao Patil-Amol Kolhe Sarkarnama
विश्लेषण

Shirur Lok Sabha Vishelshan : आढळरावांच्या विजयाची भिस्त ‘आंबेगाव’वर; कोल्हेंना जुन्नर हात देणार का?

Lok Sabha Election 2024 : राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली होती. कारण, गेल्या निवडणुकीत ज्यांचा टोकाचा विरोध केला, त्याच आढळराव पाटील यांच्यासाठी मते मागण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. ज्या अमोल कोल्हेंना मेहनत करून निवडून आणले, त्याच कोल्हेंच्या विरोधात भूमिका घेण्याची वेळ अवघ्या पाच वर्षांत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आली होती.

Vijaykumar Dudhale

Shirur Lok Sabha Constituency : शिरूर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये मतदानाचा टक्का तब्बल 5.28 टक्क्यांनी घसरला आहे. हा घसरलेला टक्का कोणाचा गेम करणार आणि कोणाला ‘हात’ देणार, याची उत्सुकता आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत तडजोडीच्या राजकारणामुळे धनुष्य बाणाची साथ सोडून राष्ट्रवादीत आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या घड्याळाची टिकटिक वेग घेणार की विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या तुतारीतून ‘सहानुभूती’चे स्वर दुमदुमणार, याची चर्चा शिरूरमध्ये रंगली आहे.

आढळराव यांचे होम ग्राउंड असलेल्या आंबेगावात सर्वाधिक मतदान झाले आहे. आढळरावांच्या विजयाची भिस्तही आंबेगावरच अवलंबून असणार आहे. दुसरीकडे गृहतालुका असलेला जुन्नर डॉ. अमोल कोल्हे यांना किती साथ देणार, यावरही त्यांच्या विजयाचे समीकरण ठरणार आहे.

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली होती. कारण, गेल्या निवडणुकीत ज्यांचा टोकाचा विरोध केला, त्याच आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यासाठी मते मागण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. ज्या अमोल कोल्हेंना (Amol Kolhe) मेहनत करून निवडून आणले, त्याच कोल्हेंच्या विरोधात भूमिका घेण्याची वेळ अवघ्या पाच वर्षांत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर आली होती. तशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी जाहीरपणे घेतली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजितदादांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे मोहिते हे आढळरावांच्या प्रचारात सामील झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जुन्नरमध्ये तुतारीची हवा?

शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार होते. फक्त शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहेत. जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके हे आमदार आहेत. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचेही होम ग्राउंड आहे. त्यांच्या पाठीशी विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर हे ठामपणे उभे होते. त्यामुळे जुन्नरमधून कोल्हे आघाडी घेतील, अशी शक्यता वर्तविण्यात येते. तालुक्याच्या आदिवासी भागात तुतारी जोरात वाजल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, आमदार अतुल बेनके यांनीही आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून डावपेच आखल्याचे दिसून आले. आता जुन्नरमध्ये कोण कोणाला भारी पडणार, याची उत्सुकता आहे.

सायंकाळचे मतदान निर्णायक ठरणार

ज्या आढळरावांना विरोध करण्यात उभे आयुष्य घालवलेले आमदार दिलीप मोहिते यांच्या मतदारसंघात कमी मतदान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मोहिते यांनी स्वतःला आढळरावांच्या प्रचारात झोकून दिले. खेडमध्ये सर्वाधिक चांगली परिस्थिती असताना त्याचा लाभ राष्ट्रवादीला उठवता आला नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, खेडमधील भाजपच्या दोन गटांतील वादाचा फटकाही आढळरावांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वाधिक नेते महायुतीकडे असूनही खेडच्या पश्चिम पट्ट्यात तुतारीचा जोर जाणवला. पण सायंकाळी मतदानासाठी झालेली गर्दी त्या तुतारीच्या भरतीला ओहोटी लावेल, अशी परिस्थिती वर्तविण्यात येत आहे.

हडपसरमध्ये आढळराव पुन्हा लीड घेणार का?

शिरूर लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी 47.71% मतदान हे हडपसर विधानसभा मतदारसंघात झाले. खरंतर गेल्या निवडणुकीतही जवळपास तेवढेच म्हणजे 47.84 टक्केच मतदान झाले होते. अमोल कोल्हे यांना हडपसरमधून लीड मिळाले नसले तरी आढळरावांची मते खेचण्यात कोल्हे यशस्वी ठरले होते. आताही जेमतेम गेल्या निवडणुकीएवढेच मतदान झाले आहे. मात्र, कोण कोणाची मते खेचतो, हा महत्वाचा मुद्दा हडपसरमध्ये महत्वाचा ठरणार आहे.

हडपसरमध्ये आढळराव यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर यांनी प्रयत्नांची पराकष्टा केली. कोल्हे यांच्यासाठी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, महादेव बाबर, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी उपमहापौर नीलेश मगर यांनी खिंड लढवली. पवार आणि ठाकरेंना असणारी सहानुभूतीही याठिकाणी दिसून आली. हडपसर मतदारसंघातील सव्वा लाखाच्या आसपासची मुस्लिम मते आणि माळा समाजाचा असणारा टक्का निर्णायक भूमिका बजावू शकतो.

वळसे पाटील-आढळरावांची ऐकी दिसणार

शिरूर मतदारसंघातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघावर सर्वाधिक लक्ष होते. शिवाजीराव आढळराव पाटील हे आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीचे आहेत. त्यांना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची मोलीची साथ लाभली आहे. हे दोघे आंबेगावमध्ये कितीपर्यंत लीड घेतात, त्यावरच शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे. मात्र ऐन निवडणुकीत वळसे पाटील हे रुग्णालयात दाखल झाल्याने रणनीती आणखण्यात त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवली. आंबेगावच्या राजकारणात वळसे आणि आढळराव यांच्याशिवाय तिसरा गट नाही, त्यामुळे हे दोन्ही नेते एकत्र आल्याने आंबेगावमध्ये मोठ्या मताधिक्क्याची अपेक्षा आढळरावांना असणार आहे. येथील लीडवरच आढळराव पाटील यांच्या विजयाचे गणित समीकरण अवलंबून असणार आहे.

अशोक पवारांनी एकट्याने लढवला किल्ला

पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार अशोक पवार हे शरद पवार यांच्या बाजूने असून ते शिरूरचे प्रतिनिधित्व करतात. लोकसभा निवडणुकीतील आकड्यावरच राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने अशोक पवारांनीही मोठी ताकद अमोल कोल्हे यांच्या पाठीशी लावली होती. शिरूर तालुक्याच्या ग्रामीण भागात अमोल कोल्हे यांना, तर शहरी भागात विशेषतः पुणे-नगर रस्त्यालगतच्या गावांत आढळरावांना लीड मिळेल, अशी चर्चा आहे. महायुतीकडे अनेक नेत्यांची फौज असतानासुद्धा अशोक पवार यांनी निकराने शिरूरचा किल्ला लढविल्याचे दिसून आले. त्यात त्यांना किती यश येते, हे 4 जूनला समजणार आहे.

भोसरीकडे सर्वांचे लक्ष

भोसरीकडे सर्वांचे लक्ष होते. कारण, भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे हेही शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार विलास लांडे यांनीही तयारी चालवली होती. पण भोसरीत अपेक्षेप्रमाणे मतदान झालेले नाही. आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा कमळाचा प्रचार करावा लागणार असल्याने भाजपच्या काही नगरसेवकांनी काम केले नाही, अशी चर्चा आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात झालेले विधानसभानिहाय मतदान

विधानसभा मतदारसंघ......2024...........2019

जुन्नर........... 58.16 टक्के .......... 64.65 टक्के

खेड ............57.76 टक्के............ 62.20 टक्के

शिरूर........... 56.91टक्के ....................64.45 टक्के

भोसरी............. 49.41.......................57.45 टक्के

हडपसर........... 47.17 टक्के................. 47.84 टक्के

आंबेगाव............ 62.95 टक्के ................70.13 टक्के

एकूण .................54.16........................59.44 टक्के

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT