Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वर्षापूर्वी उभी फूट पडली होती. यावेळी अजित पवार यांच्यासह 40 आमदार पक्षातून बाहेर पडले. यावेळी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजित पवार भाजपसोबत गेले. त्यानंतर अजितदादांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच उपमुख्यमंत्रीपद मिळाले. मात्र, त्यानंतरच्या काळातही त्यांनी गोरक्षणांना रोखा, योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगाला, हिंदी सक्तीला विरोध, नवाब मलिक यांना विरोध करणाऱ्या भाजपच्या भूमिकेला विरोध करीत अजित पवार यांनी त्यांची वेगळी अशी 'आयडेंटिटी' जपली आहे.
भाजपसोबत (BJP) गेल्यानंतरही अजितदादांनी त्यांची वेगळी प्रतिमा व प्रत्येक बाबीत वेगळा बाणा जपण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. प्रत्येक निर्णय घेताना केवळ भाजपच्या सुरात सूर मिसळणे त्यांनी टाळले आहे. त्यांच्या मनाला न पटणाऱ्या गोष्टीला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. विशेषता महायुती सरकारमध्ये असताना त्यांनी उघडपणे हिंदी सक्तीच्या मुद्द्याला विरोध केला होता. याच मुद्द्यावरून महायुती सरकार अडचणीत देखील आले होते. अजितदादांनी मात्र विरोध करून हिंदी सक्तीचा जीआर राज्य सरकारला मागे घेण्यास भाग पाडले होते.
अजित पवार (Ajit pawar) गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहेत. त्याचे कारण म्हणजे, हिंदुत्त्ववादी पक्षांसोबत राहूनही पुरोगामी भूमिकेला चिकटून राहण्यासाठी करत असलेली कसरत पाहून त्यांची चर्चा होत असते. गेले काही दिवस अजित पवारांचे मित्रपक्ष असलेले भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांमधील नेत्यांकडून जेव्हा कधी धर्माधारित मते व्यक्त केली जातात, तेव्हा तेव्हा अजित पवार आपले मत व्यक्त करताना पुरोगामी भूमिकेला धरून राहण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, यातून महायुतीतल्या पक्षांची विचारधारेच्या पातळीवरून कसरत स्पष्टपणे दिसून येते.
योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगा'ला केला विरोध
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ ही दिलेली घोषणा हरियाणातील निवडणुकीच्या वेळी चर्चेचा विषय ठरली होती. भाजपचे प्रमुख प्रचारक असलेल्या योगींनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्यावेळी याची प्रचारसभांमध्येही घोषणा दिली होती. योगी आदित्यनाथ यांच्या या घोषणेला महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी ‘व्हायरल’ केले होते. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडियावरून याबाबतची पोस्ट शेअर करीत विरोध दर्शवला. हिंदुत्त्ववादी विचार सातत्याने मांडणारे आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र याविरोधात भूमिका घेतली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अगदी बहरात आला असताना “अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्र सहन करत नाही. इतर राज्यांमध्ये ते चालू शकते. महाराष्ट्रातील जनतेने आजवर पुरोगामीपण जपले आहे. महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना मानणारा आहे. बाहेरच्या राज्यातील नेत्यांनी येथे येऊन वेगळी वक्तव्ये करू नयेत,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते.
नवाब मलिकांच्या घरात उमेदवारी दिली अन् निवडुनही आणले
महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप व मंत्री नवाब मलिक यांच्यात वादावादी झाले होती. त्यानंतर भाजपने मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर काही काळ त्यांना जेलमध्ये राहावे लागले होते. त्यानंतर आघाडीचे सरकार कोसळले त्यानंतर नवाब मलिक अजितदादासोबत राहिले. भाजपने त्यांना विरोधही केला मात्र अजितदादा त्यांच्या पाठीशी उभे राहिले. विधानसभा निवडणुकीत भाजपचा विरोध झुगारून त्यांनी नवाब मलिक यांच्या अणुशक्तीनगर या मतदारसंघातून त्यांच्या कन्या सना मलिक यांना उमेदवारी दिली अन् निवडूनही आणले.
हिंदी सक्तीला अजितदादांनी केला विरोध
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंदी भाषा अनिवार्यपणे पहिल्या इयत्तेत शिकवण्याच्या धोरणाचा विरोध केला. त्यांच्या मते, बालकांना मराठीवर आधी प्रभुत्व मिळावे आणि हिंदीची शिकवण पाचवीपासून लागू करावी, त्याऐवजी पहिल्या ते चौथीपर्यंत मराठी भाषेवर लक्ष केंद्रित करायला हवे, असे त्यांचे मत होते. मराठी ही महाराष्ट्रातील प्रमुख भाषा असल्याने तिच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक भूमिकेला प्राधान्य देणं गरजेचं आहे, आणि हिंदी शिकवणे चुकीचे नाही, परंतु ते शालेय शिक्षणाच्या पहिल्या चार वर्षांत अनिवार्य बनवायला नको, अशी त्यांनी भूमिका घेतली होती.
सरतेशेवटी, अजित पवारांच्या या भूमिकेमुळे हा विषय राजकीय आणि सामाजिक दोन्हीच चर्चेत आला होता. त्यातच हिंदी सक्तीला ठाकरे बंधूनी जोरात विरोध केला होता, प्रसंगी त्यांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्तीच्या विरोधातील दोन्ही जीआर मागे घेतले होते.
त्यामुळे एकंदरीतच अजित पवार यांनी भाजपसोबत गेल्यानंतरही ते भाजपमय झाले नाहीत. या काळातही गोरक्षणांना रोखा, योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगाला, हिंदी सक्तीला विरोध, नवाब मलिक यांना विरोध करणाऱ्या भाजपच्या भूमिकेला विरोध करीत अजित पवार यांनी त्यांची वेगळी अशी 'आयडेंटिटी' या निमित्ताने जपली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.