Mumbai News : हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक लोकविलक्षण असे पर्व होते. स्वामी रामानंद तीर्थ व शेकडो स्वातंत्र्यसैनिकांच्या खडतर प्रयत्नातून हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा यशस्वी झाला. मात्र, संयुक्त महाराष्ट्राच्या वाटचालीत लढ्याचा इतिहास उपेक्षीतच राहिला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत सुरू असलेली इतिहासाची उपेक्षा अजून काही थांबलेली नाही. मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या विरोधात लढलेले हा साहसी लढा सुवर्णअक्षरांनी लिहावा असाच आहे. मात्र, त्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी घेतलेल्या पुढाकारामुळेच हा दिवस राज्यभर उत्साहात साजरा केला जातोय.
मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 ला निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. त्यामुळेच भारतीय स्वातंत्र्याला खऱ्या अर्थांने पूर्णत्व लाभले. त्यानंतरच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. सुरुवातीच्या काळात केवळ मराठवाड्यातच हा दिवस साजरा केला जात होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्यानंतरच 17 सप्टेंबर 1997 पासून भाजप-शिवसेना सरकारच्या काळापासून हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातोय.
भारत स्वतंत्र झाला तरी हा मराठवाड्यातील हा भाग पारतंत्र्यात होता. निजामाच्या राज्यातच मराठवाड्याचा समाविष्ट होता. एकूण 224 वर्ष हैदराबादवर निजामाचे राज्य होते. मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकाच्या काही भागाचा यामध्ये समावेश होता. हैदराबाद संस्थानात एकूण सात निजाम होऊन गेले. या प्रत्येक निजामांनी हुकुमशाही प्रवृत्तीनेच कारभार केला. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात 563 संस्थाने होती. दक्षिण भारतात हैदराबाद कोल्हापूर व नागपूर ही तीन संस्थाने होती. 1724 ते 1948 या कालखंडात हैदराबाद संस्थानात राज्याचा संस्थापक मीर कमरुद्दीन हा राजा होता त्याने सतराशे राज्याची स्थापना केली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला ; परंतु निजामाने आपले राज्य स्वतंत्र्य ठेवण्याची घोषणा केली. अर्थात हैदराबाद राज्याला स्वतंत्र वेगळ्या राष्ट्राचा (दक्षिण पाकिस्तान) दर्जा प्राप्त करुन देण्याचा निजामाचा मानस होता.
या निजामाच्या जुलमी राजवटीला कंटाळून त्यांच्याविरुद्ध मराठवाड्यात हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा छेडण्यात आला. रझाकारांच्या या जुलमी राजवटीच्या विरोधात पुकारलेल्या या मुक्तिसंग्राम लढ्यात कित्येकांना रक्त सांडावे लागले तर अनेकांना प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी लष्करी कारवाई करून मराठवाड्याला मुक्ती मिळवून दिली.
या मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला आणि देशाला अनेक नेते दिले. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्यासारख्या नेत्यांनी पी. व्ही. नरसिंह राव शंकरराव चव्हाण, यांच्यापर्यंत कित्येकांना याच मुक्तिसंग्रामाने घडवले. नेतेच घडले नाही तर कित्येक कार्यकर्ते देखील घडले. त्यामुळे या इतिहासाचे संपूर्ण मराठवाडयात स्मरण केले जाते.
या लढ्यात प्राणाची आहुती व रक्त सांडलेल्याची आठवण रहावी म्हणून मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यानंतर हा दिवस मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरा करण्यास सुरवात झाली, पण त्याकाळात हा दिवस फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित होता. त्यानंतरच्या काळात शंकरराव चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांच्यासारखे मराठवाड्याचे सुपुत्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण त्यानंतरही काही काळ हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाला शासन दरबारी मान्यता मिळाली नव्हती. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी दिलेला लढा, कित्येकांने त्यासाठी केलेले त्याग याकडे एकार्थाने दुर्लक्षितच राहिले होते.
त्यानंतरच्या काळात हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाला खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे न्याय मिळवून दिला. 1995 साली राज्यात सत्तातर होऊन प्रथमच शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आले. त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले होते. या युती सरकारच्या सत्तेचा रिमोट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होता. त्याचवेळी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते (Diwarakr Ravte) होते. या काळात मराठवाड्याची सांस्कृतिक, ऐतिहासिक माहिती जाणून घेण्यासाठी दिवाकर रावते यांचे मुक्तिसंग्रामाचा लढा देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांनाही अनेकदा भेटत होते.
लातूर येथील स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर वाजपेयी यांच्याशी त्याकाळात रावते यांची अनेकदा भेटीगाठी झाल्या. वाजपेयी यांनी त्यांना हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या या लढ्यात गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंग नाईक, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे यांच्यासह अनेक नेत्यांचा हिरीरीने सहभाग होता. मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले होते. यासह हजारो नागरिकांच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. त्यात प्रामुख्याने त्यांनी देशाचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला साजरा केला जातो. त्याचप्रमाणे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन 17 सप्टेंबरला साजरा व्हायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balashaeb Thackeray) यांच्याशी याबाबत दिवाकर रावते यांनी चर्चा केली. निजामाच्या राजवटीतून मुक्तता मिळवण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान स्व. बाळासाहेब ठाकरे यांनाही खूप चांगल्या प्रकारे माहिती होते. त्यामुळे हा दिवस त्यांनी जल्लोषात साजरा व्हायला हवा, या लढ्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचायला हवी, अशी त्यांचीही आग्रही भूमिका होती. त्यांनी मान्यता दिल्यानंतर रावते हे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी बोलले. त्याचा प्रस्तावही सादर केला.
त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हा दिवस साजरा करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या. त्यानंतर शिवसेना-भाजप सरकारच्या पुढाकाराने लातूर येथे 1997 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यसैनिकांचा मोठा मेळावा घेण्यात आला. याच कार्यक्रमात त्यांनी पुढील वर्षीपासून शासकीय स्तरावर मुक्तिसंग्राम दिन साजरा करणार असल्याची घोषणा करण्यात आली.
शासकीय स्तरावर हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्याची घोषणा झाल्यानंतर हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचा पहिला कार्यक्रम नांदेडमधील श्री गुरू गोविंदसिंग स्टेडियममध्ये पार पडला. या मध्ये स्वातंत्र्यसंग्रामात प्रत्यक्ष सहभाग घेणारे व राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, अनेक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात हुतात्मा स्तंभ उभारले गेले. आजही मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन राज्यभरात थाटामाटात साजरा केला जातो, त्यामुळे याचे सारे श्रेय शिवसेनाप्रुमख बाळासाहेब ठाकरे यांना जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.