Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama
विश्लेषण

Losabha Election 2024 : मराठवाड्यात 3 आणि विदर्भातील 5 मतदारसंघांत मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरणार ?

अय्यूब कादरी

Loksabha Election News : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान 26 एप्रिल रोजी होणार असून, बुधवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात राज्यातील आठ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्यात मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील पाच मतदारसंघांचा समावेश आहे.

या सर्व मतदारसंघांत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी आपल्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या आहेत. जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची, विद्यमान खासदाराला तिकीट नाकारण्याची नामुष्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर ओढवलेल्या दोन मतदारसंघांचा या टप्प्यात समावेश आहे.

मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या तिन्ही मतदारसंघांत हाय व्होल्टेज लढती होत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचा मराठवाड्यात अधिक प्रभाव आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यात सभा घेतल्या आहेत. विदर्भातील अमरावती, यवतमाळ-वाशीम, बुलडाणा, अकोला आणि वर्धा या मतदारसंघांत मतदान होणार आहे.

या भागातही नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे सभा झालेल्या आहेत. पहिल्या टप्प्यात कमी मतदान झाल्यामुळे महायुतीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत राज्यातील नेत्यांशी चर्चा केली होती. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात मतदारांना बाहेर काढण्यासाठी भाजप नेत्यांची कसोटी लागणार आहे.

हिंगोली- खासदाराची उमेदवारी रद्द केली-

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीवरून हिंगोली मतदारसंघ चर्चेत आला होता. हिंगोलीचे शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी उमेदवारी जाहीर केली होती, मात्र भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांकडून त्याला प्रचंड विरोध झाला. भाजपच्या दबावासमोर मुख्यमंत्री शिंदे हतबल झाले आणि त्यांना पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी रद्द करावी लागली.

यावरून महाविकास आघाडीने शिंदे यांच्यावर निशाणा साधला होती. पाटील यांची उमेदवारी रद्द करून मुख्यमंत्री शिंदे यांनी बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांच्याशी होत आहे. नागेश पाटील आष्टीकर हे हदगावचे माजी आमदार आहेत. बाजार समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द केल्यामुळे या मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नांदेड- अशोक चव्हाण भाजपवासी होऊनही मोदींची सभा

नांदेड लोकसभा मतदारसंघ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे चर्चेत आले. काँग्रेसकडून दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाचील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी लढत होत आहे. अशोक चव्हाण यांच्यामुळे भाजपची बाजू वरचढ समजली जात आहे. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांना चिखलीकर यांच्यासाठी नांदेडमध्ये सभा घ्यावी लागली आहे.

चिखलीकर यांच्या प्रचारसभांना प्रतिसाद मिळत नसल्याचे व्हिडिओ मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. वसंत चव्हाण हे नायगावचे माजी आमदार आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होते. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश आणि पंतप्रधान मोदी यांची सभा यामुळे या लढतीकडे लक्ष लागले आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांना नांदेडमध्ये सभा घ्यावी लागली.

परभणी- संजय जाधवांची हॅटट्रिक की महादेव जानकर?

परभणी मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार खासदार संजय जाधव हे हॅटट्रिक करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. महायुतीने या मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. महादेव जानकर यांच्याबाबतीत या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. जानकर हे आधी माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून लढणार, अशी चर्चा सुरू झाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जानकर यांना माढा मतदारसंघ सोडण्याची तयारी केली होती. जवळपास सर्वकाही निश्चित झाले होते, मात्र ऐनवेळी जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना महायुतीत सहभागी करून घेतले आणि परभणी येथून उमेदवारी दिली. परभणीतून अजितदादा गटाचे राजेश विटेकर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र जागा भाजपला सुटल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. या पार्श्वभमीवर या मतदारसंघाकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.

अकोला- प्रकाश आंबेडकरांमुळे चर्चेत-

विदर्भातील पाचही मतदारसंघांत तुल्यबळ लढती होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar उमेदवार असलेल्या अकोला मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत या मतदारसंघात होत आहे.

अनुप धोत्रे हे विद्यमान खासदार, माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे पुत्र आहेत. यापूर्वी या मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर हे दोन वेळा विजयी झाले होते. गेल्या तीन, चार निवडणुकांपासून या मतदारसंघात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये मतांची विभागणी झाल्यामुळे त्याचा फायदा भाजपला झाला आहे. या वेळी मतविभाजन होणार की कसे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

अमरावती- बच्चू कडू नवनीत राणांना धक्का देणार?

गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून येत भाजपशी घरोबा केलेल्या आणि निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे अमरवाती मतदारसंघ चर्चेत आलेला आहे. आता त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याच्या हट्टामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. आता प्रहारचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्यासमोर अडचणी निर्माण केल्या आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांसह गुवाहाटी गाठलेले बचंचू कडू नंतर अडचणीत आले. त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याशीही त्यांचा वाद झाला. त्यातून त्यांनी या मतदारसंघातून प्रहारचा उमेदवार उभा केला आहे. काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीसाठी येथे राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या तर महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा झाल्या आहेत.

यवतमाळ- वाशीम- खासदार गवळींना डावलल्याने चर्चेत...

विद्यमान खासदाराची उमेदवारी बदलण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकण्यात आला त्यापैकी यवतमाळ -वाशीम हाही एक मतदारसंघ. या मतदारसंघातून शिवसेनेच्या भावना गवळी या सलग पाच वेळा विजयी झाल्या होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. मध्यंतरी, दिल्लीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली होती. तरीही भावना गवळी यांची उमेदवारी कापण्यात आली.

हिंगोली मतदारसंघात उमेदवारी जाहीर करून नंतर रद्द करण्यात आली ते थासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना या मतदारसंघात शिंदे गटाने उमेदवारी दिली. त्यांच्यासमोर ठाकरे गटाचे माजी आमदार संजय देशमुख यांचे आव्हान आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे भावना गवळी या नाराज असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात राजश्री पाटील आणि संजय देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे.

वर्धा- तडस यांची हॅटट्रिक की काळे यांना संधी?

वर्धा मतदारसंघात भाजपचे खासदार रामदास तडस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्यात लढत होत आहे. रामदास तडस यांना खासदारकीची हॅटट्रिक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत चारवेळा विजयी झालेले शरद काळे यांचे अमर काळे हे पुत्र आहेत.

अमर काळे हेही दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. आर्वी हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ. खासदार रामदास तडस यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली आहे. अमर काळे यांच्यासाठी शरद पवार यांनी दोन सभा घेतल्या आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे आणि आपचे संजय सिंह यांनीही काळे यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या आहेत.

बुलडाणा- महायुतीतील गटबाजीने लक्ष वेधले-

बुलडाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांचे आव्हान आहे. खेडेकर हे ठाकरे गटाचे बुलडाणा संपर्कप्रमुख आहेत. या मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. तुपकरांच्या उमेदवारीमुळे चुरस वाढली आहे. या मतदारसंघावर सुरुवातीला भाजपनेही दावा केला होता.

खासदार झाल्यानंतर प्रतापराव जाधव भेटतच नाहीत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. आमच्या नेत्यांचा सन्मान केला जात नाही, त्यामुळे आम्ही जाधव यांचा प्रचार करणार नाही, असा इशारा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला होता. या गटबाजीमुळे महायुतीत तणाव निर्माण झाला होता. अखेर ही जागा शिंदे गटाला सुटली आणि प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाली.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT