Mumbai News : हिंदी सक्तीच्या विरोधात रान पेटवल्यानंतर महायुती सरकारने दोन्ही जीआर मागे घेतले. त्यामुळे राज व उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढण्याचा निर्णय मागे घेतला. हिंदीच्या मुद्यावरून राजकारण तापलेले असताना सरकारने हिंदी अंमलबजवणीचे जीआर रद्द केले. ठाकरे बंधु एकत्रित येण्याच्या आधीच त्यांनी मिळवलेला हा मोठा विजय मानला जातो आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने व मनसेने एकत्र येत विजयी मेळाव्याचे आयोजन ठाकरे बंधुंकडून करण्यात आले आहे.
ठाकरे बंधू तब्बल 18 वर्षानंतर एकाच मंचावर येत असल्याने उत्सुकता आहे. एकीकडे याबाबत उत्साहाचे वातावरण आहे तर दुसरीकडे मात्र यावरून नाराजी दिसत असून पुर्वश्रमीचे शिवसेना नेते मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर टीका करताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री रामदास कदम, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलेले वक्तव्य पाहता केवळ राजकीय आकसापोटी टीका केली जात असल्याचे दिसते. या सत्ताधारी नेतेमंडळींच्या प्रतिक्रियेतून हे स्पष्ट होते की, ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल होऊ शकतो, आणि त्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) व उद्धव ठाकरे यांच्यात आडवा विस्तव जात नाही. गेल्या 20 वर्षाच्या काळात दोघानींही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. दोघेही एकमेकांवर बोलण्यासाठी कारणच शोधत असतात. त्यांचा हा वाद सर्वशृत आहे. केवळ राजकीय नाट्याची एक खेळी आहे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न असू शकतो, असे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेनंतर नारायण राणेंनी टीका केली. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा राज ठाकरे कुठे होते? तेव्हा एकत्र का आले नाहीत?" अशा प्रकारचा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित करून त्यांनी दोन्ही बंधूंच्या संभाव्य एकीवर शंका व्यक्त केली.
रामदास कदम यांनी देखील ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून टीका केली आहे. ठाकरे बंधूंचे एकत्र येणे केवळ राजकीय स्वार्थासाठी असून त्यामध्ये कोणताही स्थायित्वाचा किंवा विचारधारेचा आधार नाही. जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हा ठाकरे बंधूंमध्ये अचानक सौहार्द दिसून येतो, पण ते खरे नसते, असा दावा कदम यांनी केला आहे. तसेच, त्यांनी हेही सुचवले की शिवसेनेच्या (shivsena) मूळ विचारधारेपासून दूर जाऊन फक्त सत्ता मिळवण्यासाठी अशा प्रकारची युती किंवा सहकार्याचा विचार होतो आहे, ज्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
मराठी भाषेच्या आणि मराठीत्वाच्या मुद्यावर बोलताना नीलम गोऱ्हेंनी 'ठाकरे ब्रँड' हा इतर 'मार्केटिंग' साधनाप्रमाणे वापरला जात असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, 'ब्रँड' हा बाजारातील उत्पादनाला वापरतो” आणि ठाकरे बंधूंनी मराठी लोकांना आकर्षित करण्यासाठी ब्रँडचा वापर केला जात आहे. ठाकरे बंधूंच्या एकीवर निलम गोऱ्हे यांनी टीका केली आहे.
येत्या काळात राजकीय समीकरणे बदलणार
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मराठी मतदारांमध्ये एक प्रकारची भावनिक लाट निर्माण होऊ शकते, विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकण विभागात. हे क्षेत्र पारंपरिक शिवसेनेचं बालेकिल्ले राहिले आहेत. जर राज आणि उद्धव एकत्र आले, तर त्याचा मोठा फटका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. त्याशिवाय ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा परिणाम येत्या काळात भाजपच्या मतांवर पडू शकतो. त्यामुळे सत्ताधारी पक्ष चिंतेत आहे.
भाजपचा प्लॅन फसण्याची शक्यता
भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेला फोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत महायुती केली आहे. त्यासोबतच भाजपने सत्तेत टिकून राहण्यासाठी राज ठाकरे यांनाही अधूनमधून 'B टीम' म्हणून वापरण्याचा प्रयत्न केला. जर येत्या काळात राज-उद्धव ठाकरे एकत्र आले, तर भाजपची ही योजना फसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून या दोघांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राणे, कदमांचा वैयक्तिक राग
नारायण राणे यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी जुने राजकीय वैर आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंब एकत्र येणं राणेंना खटकणार हे स्वाभाविक आहे. तर दुसरीकडे मधल्या काळात रामदास कदम यांना देखील महाविकास आघाडी सरकार असताना त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे त्यांची भूमिका नेहमीच उद्धव ठाकरेंच्या विरोधातील राहिली आहे. त्यामुळे सातत्याने ते उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्य करीत असतात.
मतदारांचा कल बदलण्याची भीती
मराठी अस्मिता, हिंदुत्व, आणि शिवसेनेच्या मूळ विचारसरणीचं प्रतीक म्हणून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्यास, मराठी मतदारांचा कल त्यांच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांना आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याची भीती वाटणे स्वाभाविक आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी भाजपने केली आहे. मात्र, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने महायुतीमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर महाराष्ट्रात राजकीय समीकरणं झपाट्याने बदलू शकतात. यामुळेच सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टिकांचा खरा उद्देश म्हणजे जनमताला दिशाभूल करणे, व या एकीच्या शक्यतेवर आधीच पाणी फेरणे, असाच आहे. त्यामुळे येत्या काळात काय होणार याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.