Sharad Pawar | Nana Patole | Uddhav Thackeray Sarkarnama
विश्लेषण

Uddhav Thackeray : 'स्थानिक' साठी ठाकरे गटाची स्वबळाची तयारी; काँग्रेससह मित्रपक्षांचा सावध पवित्रा

Thackeray Faction Local Elections Strategy : महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने स्वबळाची तयारी सुरु केली असून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसैनिकांना स्वबळाची तयारी करण्यास सांगितली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नसली तरी मे महिन्यापर्यत या निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता गृहीत धरून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणावर 28 जानेवारीला सुनावणी होणार आहे. यामध्ये ओबीसी आरक्षणाबाबतचा मुद्दा निकाली निघाल्यास निवडणूक आयोगाकडून येत्या चार महिन्यांत निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने स्वबळाची तयारी सुरु केली असून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसैनिकांना स्वबळाची तयारी करण्यास सांगितली आहे. दुसरीकडे मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मात्र सावध पवित्रा घेतला आहे.

आगामी काळात कॊणत्याही क्षणी जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची बिगुल वाजले तर तयारी पूर्ण झालेली असली पाहिजे, यासाठी ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मेळाव्यात बोलताना लोकसभा निवडणुकामध्ये जिंकल्यानंतर विधानसभा निवडणुका सहज जिंकू असे वाटत असल्याने आपण थोडेसे गाफील राहिलो, त्याचा फटका आपल्याला विधानसभा निवडणुकीत बसला आहे. त्यामुळे येत्या काळात गाफील न राहता आतापासूनच जोरदार तयारी करा व तुमची तयारी पूर्ण झाल्यानंतर मला सांगा. त्यानंतर लगेचच आपण स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊ असे उघडपणे सांगितले.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांची उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन त्यामध्ये रणनीती ठरवली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील निवडणुकात स्वबळ आजमावण्यापेक्षा मुंबईतील महापालिका निवडणुकीवर शिवसेनेने मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेना ठाकरे गटाचाही गेल्या 25 वर्षांपासून निर्विवाद सत्ता आहे. या ठिकाणाचा शिवसेनेचा (Shivsena) गड राखण्यासाठी जोरात प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीच ठाकरे सेना मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता अधिक आहे.

2017 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत जागावाटपाची बोलणी फिस्कटल्याने भाजप व शिवसेना स्वबळावर लढली होती. त्यावेळी शिवसेनेची सत्ता आली. मात्र, शिवसेना भाजपमधील जागांचे अंतर जास्त नव्हते. त्यावेळी शिवसेनेने अपक्ष व मनसेला धक्का देत पाच वर्ष सत्ता टिकवून ठेवली होती. त्यावेळी आघाडीत एकत्र लढलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला तुलनेने कमी जागा मिळल्या होत्या. त्यामुळेच आगामी काळात जर तिरंगी अथवा मनसेने वेगळी निवडणूक लढविल्यास चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे, त्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाला धक्कयावर धक्के बसत असले तरी शिवसैनिक ही खरी ताकद असल्याने त्या जोरावर तयारी सुरु करण्यात आली आहे. दुसरीकडे भाजप व शिवसेना शिंदे सेनेकडून ठाकरे सेनेतील नाराज नेत्यांना गळाला लावले जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून महायुतीकडील इनकमिंग वाढले असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

दुसरीकडे मात्र, महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली दिसत नाहीत.

मुंबई महापालिका निवडणुकीचा विचार केला तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोठी ताकद नाही. तर मुंबईतील काही भागात काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी असली तरी तयारी मात्र अद्याप सुरु केली नाही. मुस्लिम व दलित मतदारसंख्या असलेल्या भागात काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे या साठी काँग्रेसला आतापासूनच ही ताकद या भागात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने कार्यकर्त्यांत मोठ्या प्रमाणात मरगळ आली आहे. या पराभवामुळे नेतेमंडळींचे मनोबल देखील चांगलेच खचले आहे. दुसरीकडे या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर एकमेकावर फोडण्यातच नेतेमंडळी धन्यता मानत असल्याने सध्या तरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात मुंबई महापलिकेच्या दृष्टीने सावध भूमिका घेतली जात आहे.

मुंबई महापालिका निवडणूकसोडून राज्यात इतर ठिकाणी होणार असलेल्या महापालिका व जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून चाचपणी केली जात आहे. स्थानिक नेत्यांची भूमिका जाणून घेतली जात आहे. त्यानंतर या ठिकाणच्या निवडणुकीबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाकडे मित्रपक्षासह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT