Uddhav Thackeray-Bhaskar Jadhav Sarkarnama
विश्लेषण

Bhaskar Jadhav : दाल मे कुछ काला, या...! आठवेळा निवडणूक जिंकल्यानंतर जाधवांना राजकारण सोडण्याची आताच उपरती का ?

Maharashtra politics News: रत्नागिरी जिल्हयातील गुहागार विधानसभा हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय प्राप्त केला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत नेते अशी भास्कर जाधव यांची ओळख आहे. कोकणामध्ये शिवसेना वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विशेष म्हणजे त्यांनी शिवसेनेकडून आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे एवढ्या निवडणुका जिंकल्यानंतर भास्कर जाधव यांनी आता थांबायचा का विचार केला असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

रत्नागिरी जिल्हयातील गुहागार विधानसभा हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय प्राप्त केला आहे. जाधव हे अनुभवी नेते असूनही उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत त्यांना मंत्रीपदाची संधी दिली नाही. त्यामुळे सगळे काही सुरळीत सुरु असताना भास्कर जाधव यांनी थांबण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना आताच राजकारण सोडण्याची उपरती का ? आली याची जोरात चर्चा रंगली आहे.

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे 1992–95 या काळात चिपळूण तालुक्यात पहिल्यांदा शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य होते. त्यानंतर 1995–1999 या काळात ते चिपळूण विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा विजयी झाले होते. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी दिली नाही. त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढले. सुमारे 3000 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 2005 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यानी प्रवेश केला. त्यावेळी प्रदेश महासचिव नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर 2006–2009 मध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य होते.

2009 मध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले होते. त्यावेळी त्यांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम व भाजपचे (BJP) बंडखोर उमेदवार विनय नातू यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2009-2013 या काळात विविध खात्यांचे राज्यमंत्रीपद त्यांनी सांभाळले. 2013–2014 या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2019 मध्ये परत गुहागरमधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधिमंडळातील नेते आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे भास्कर जाधव हे सध्या गटनेते आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्यांचे नाव विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदासाठी दिले होते. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार की याची उत्सुकता लागली होती. मात्र, या अधिवेशनात त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांची विरोधी पक्षनेता अशी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

त्यातच आता गेल्या काही दिवसापासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीची साथ सोडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे येत्या काळात जर मनसेसोबत युती केली तर भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळेच कदाचित जाधव यांनी थांबण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे.

गेल्या सहा महिन्यापासून ते विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी ते इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करून ते हे पद पदरात पाडून घेण्यासाठी उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी सत्ताधारी पक्षाची देखील मनधरणी केली होती. मात्र, येत्या काळात महायुती सरकार विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देणार की नाही यावर सस्पेन्स कायम असतानाच दुसरीकडे येत्या काळात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चेने ते काहीसे व्यतीत झाल्याचे दिसत आहे.

दोनच दिवसापूर्वी झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाषण केले होते. त्यावेळी कुठेही नाराजी दिली नाही. मात्र, या घटनेला दोन दिवस उलटताच त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. भास्कर जाधव यांनी नुकताच एक शिवसैनिकांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी आपल्या नाराजीला वाट करून दिली. मला काम करण्याची संधी कमी मिळते. याचा अर्थ माझ्यात काहीतरी दोष आहे. अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. आठ-आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असे वाटते की आता थांबायचा विचार करावा? यापेक्षा वेगळं काही कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीच्या काळात आपल्याला मंत्रिपद मिळायला हवे होते. हे तेव्हाही बोललो, आजही बोलतो, उद्याही बोलेन. पण मंत्रीपद नाही मिळाले. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून रडत बसायचं आहे का, लढत राहायचं याचाही आपण विचार करतो. नाही मिळाले म्हणून मी काय रुसून बसलो नाही, असेही जाधव म्हणाले.

त्यामुळेच भास्कर जाधव खरंच शिवसेनेवर नाराज आहेत का ? त्यांच्या नाराजीचे कारण काय याचा शोध घेण्याची गरज आहे. जाधव यांनी जरी घाई-घाईत थांबणार असल्याची घोषणा केली असली तरी त्यांनी स्थानिक नेत्याच्या बैठका घेत आगामी निवडणुकीबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या नाराजीचे खरे कारण काय ? याचा शोध घ्यावा लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT