Shankarrao Chavan : कडक शिस्तीचे 'हेडमास्तर मुख्यमंत्री'
आशिया खंडातील सर्वांत मोठं मातीचं धरण कोणतं, या प्रश्नाचे उत्तर येईल जायकवाडी धरण. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हे धरण असून, त्याला नाथसागर या नावानंही ओळखलं जातं. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांतील 2.40 लाख हेक्टर शेती या धरणामुळे ओलिताखाली आलेली आहे. 102 टीएमसी इतकी साठवणक्षमता असलेलं हे धरण भरलं तर शेतीसाठी दोन वर्षे आणि पिण्यासाठीच्या चार वर्षांच्या पाण्याची चिंता मिटते. राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून या धरणाची उभारणी झालेली आहे.
शंकरराव यांचे वडिल भाऊराव यांचे शिक्षण सातवीपर्यंत झालेलं होतं. त्याकाळी सातवीपर्यंतच्या शिक्षणालाही मोठं महत्व होतं. शंकररावांच्या मातुःश्रींचे नाव लक्ष्मीबाई. या दांपत्याला पाच मुलगे आणि दोन मुली. यापैकी शंकरराव हे चौथे होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील रांजणगाव हे चव्हाण कुटुंबीयांचं मूळ गाव. रांजणगाव येथे त्यांना शेतीही कमीच होती. त्यामुळे ते पैठणाला आले. सुरुवातीला त्यांनी पैठणमध्ये बांधकाम व्यवसायही केला. सातवीपर्यंत शिक्षण झालेलं असल्यामुळं भाऊराव यांना पैठणमध्ये शिक्षकाची नोकरी लागली. भाऊराव यांचा दरारा होता, ते कडक शिस्तीचे होते. हीच शिस्त शंकरराव चव्हाण यांच्या अंगीही भिनली होती. शंकरराव मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री असताना त्यांच्या बैठकांना अधिकारी अभ्यास करूनच यायचे. मुख्यमंत्री असताना त्यांनीच मंत्रालयात शिस्त लावली. त्यामुळं शंकररावांना हेडमास्तर असंही म्हटले जात असे.
शंकरराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे भगीरथ, राज्यातील जलक्रांतीचे प्रणेते असंही म्हटलं जातं. चव्हाण यांनी जायकवाडीसह राज्यात अनेक प्रकल्पांची उभारणी केली. दोनवेळा मुख्यमंत्रिपद आणि केंद्रात महत्वाची खाती सांभाळलेल्या शंकरराव यांचा जन्म 14 जुलै 1920 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे झाला. त्यांचं सातवीपर्यंचचं शिक्षण पैठण येथेच झालं. हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी बीए आणि एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. १९४५ मध्ये त्यांना वकीलीची सनद मिळाली. हैदराबाद येथील प्रसिद्ध निझाम कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द शंकररावांनी पूर्ण केली. हे कॉलेज महागडं, श्रीमंतांचं समजलं जायचं. अर्धवेळ शिकवण्या घेऊन शंकरराव यांनी त्याच कॉलेजमधून शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं.
शिक्षण सुरू असतानाच शंकररावांचा विवाह परभणी जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील कुसुम माधवराव पाटील यांच्याशी झाला. त्यानंतर ते पत्नीसह हैदराबाद येथे राहू लागले. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळं त्यांनी नांदेड येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभाग घेतला. ते उमरखे़ड कॅम्पमध्ये दाखल झाले. हैदराबाद संस्थान अखेर भारतात विलीन झालं. शंकररावांनी खूप कष्ट केले होते. त्यांनी आपल्या कामावर कायम श्रद्धा, निष्ठा ठेवली. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाल्यानंतर शंकरराव राजकारणात सक्रिय झाले. त्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली नव्हती.
शंकरराव हे स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासोबत काम करत होते. त्यांनी शंकररावांची नियुक्ती हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या सचिवपदी केली. शंकररावांनी झोकून देऊन काम केलं. त्यानंतर 1948-49 मध्ये शंकरराव यांची काँग्रेसच्या नांदेड जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची पहिली निवडणूत लढवली, मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
पराभवानं खचून न जाता त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. पुढच्याच वर्षी म्हणजे 1953 मध्ये झालेल्या नांदेड नगरपालिकेच्या निवडणुकीत ते विजयी झाले. ते नांदेडचे नगराध्यक्ष बनले. नगरसेवकाचाही आता काय रूबाब असतो, हे आपल्याला आता कोणत्याही शहरात दिसून येईल. नगरसेवकांकडे महागड्या चारचाकी असतात. शंकरराव नगराध्यक्ष झाले तरी ते सायकलवरून पालिकेत जायचे. त्यांच्या सायकलीला दिवा नव्हता, त्यामुळे पोलिसांनी त्यांना दंड आकारला होता. शंकररावांनी तो दंड भरला होता.
द्विभाषिक मुंबई सरकारच्या मंत्रिमंडळात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1956 मध्ये शंकररावांना महसूल खात्याचे उपमंत्री केले. विधानसभेच्या 1957 च्या निवडणुकीत शंकरराव हे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. पुढे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री बनले. या मंत्रिमंडळातही शंकररावांचा समावेश झाला. पाटबंधारे आणि वीज अशी महत्वाची खाती त्यांना मिळाली. पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा विजय ठरलेलालच असे, मंत्रिमंडळातील स्थानही ठरलेलेच असे.
1963 ते 1975 दरम्यान वसंतराव नाईक हे राज्याचे सलग मुख्यमंत्री होते. फेब्रुवारी 1975 मध्ये नाईक यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. 1972 च्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं होतं, मात्र पक्षात बंडखोरी झाली. 20 पेक्षा अधिक बंडखोर निवडून आले. लोकसभेच्या 4 आणि विधानसभेच्या 9 जागांवर 1974 मध्ये पोटनिवडणूक झाली. यातील बहुतांश जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव झाला. तेथूनच वसंतरावांची पकड सैल होण्यास सुरुवात झाली. विदर्भात महाविदर्भ संघर्ष समितीचे नेते जांबुवंतराव धोटे आणि रामभाऊ हेडाऊ यांचा विजय हा वसंतरावांसाठी मोठा धक्का होता. पोटनिवडणुकीतील या पराभवामुळं वसंतरावांना पक्षातून आव्हान मिळू लागलं. त्यातूनच त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं.
वसंतराव नाईक यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ शंकररावांच्या गळ्यात पडली. तोपर्यंत शंकररावांनी जवळपास 20 खात्यांचा कारभार पाहिलेला होता. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा साधा आरोपही झालेला नव्हता. मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी मंत्रालयात कडक शिस्त निर्माण केली होती. वडील भाऊराव यांचा गुण शंकररावांमध्ये तंतोतंत उतरला होता. फायलींचे गठ्ठे बंगल्यावर नेऊन तेथे काम करण्याची पद्धत त्यांनी बंद पाडली. मंत्रालयात उशीरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कठोर शब्दांत समज देत त्यांनी शिस्त लावली. 1975 ते 1977 या काळात ते मुख्यमंत्री होते. यादरम्यान केंद्रात विविध घडामोडी घडत होत्या. अशा काळात त्यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळलं.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी 1975 मध्ये आणीबीणी लागू केली होती. त्यानंतर 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. केंद्रात जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले. 1980 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसची सत्ता आली आणि इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी शंकररावांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊन त्यांच्यावर गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली होती. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना 1986 मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पुन्हा एकदा शंकरराव मुख्यमंत्री बनले.
शंकररावांनी पाटबांधारे मंत्री म्हणून राज्यासाठी भरीव यगदान दिलं. जायकवाडी धरणासह त्यांनी विष्णुपुरी, इसापूर, मनार, येलदरी, सिद्धेश्वर, दुधना, अप्पर पैनगंगा, मांजरा आदी प्रकल्पांची उभारणी केली. असे सांगितले जाते की, कंत्राटदार लोक शंकररावांच्या जवळपासही फिरकत नसत. शंकररावांनी भ्रष्टाचाराला थाराच दिला नव्हता, हे त्याचं कारण होतं. अधिकाऱ्यांनाही त्यांच्यासमोर बनवाबनवी करणं शक्य नव्हतं, कारण एखाद्या विषयावर बैठक असली की शंकरराव त्या विषयाचा पूर्ण अभ्यास करून, होमवर्क करून यायचे. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही त्या विषयाचा अभ्यास करून यावा लागत असे. केंद्रात मंत्री असतानाही शंकररावांनी हा शिरस्ता पाळला होता.
शंकरराव चव्हाण दोनवेळा मुख्यमंत्री बनले, केंद्रीय मंत्रीही बनले. पंतप्रधान कुणीही असले तरी दिल्लीदरबारी त्यांचे वजन कायम होते. ते पाटबंधारे मंत्री, मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील सिंचनाचे अनेक मोठे प्रकल्प मार्गी लागले. लोकांची तहान भागवण्यासह शेती पाण्याखाली आणण्याचे मोठं काम त्यांच्या काळात झालं. शंकररावांचं दिल्ली दरबारी मोठं वजन होतं. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींसोबतही काम केलं होतं. इंदिरा गांधी यांचे ते अत्यंत विश्वासू होते. वंसतराव नाईक यांच्यानंतर 1975 ते 1977 या काळात शंकरराव मुख्यमंत्री बनले. आणीबाणीनंतर 1980 मध्ये काँग्रेसची सत्ता आली आणि इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या. त्यावेळी इंदिरा गांधी यांनी शंकररावांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं. राजीव गांधी यांनीही आपल्या मंत्रिमंडळात शंकररावांना केंद्रीय गृहमंत्रिपद दिलं होतं.
शंकरराव चव्हाण हे जाणकार नेतृत्व होते. इतकी वर्षे मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिपदावर राहूनही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. आणीबाणीनंतर 1977 मध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. त्यानंतर शद पवार यांनी बंड केलं आणि 1978 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं. सुरुवातीला शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात केवळ सहा मंत्री होते. त्यात पवारांसह, गणपतराव देशमुख, सुंदरराव सोळंके, उत्तमराव पाटील, निहाल अहमद आणि अर्जुनराव कस्तुरे यांचा समावेश होता.
या मंत्रिमंडळाचा विस्तार 2 ऑगस्ट 1978 रोजी झाला, त्यात 28 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. सुंदरराव सोळंके यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आलं. या विस्तारात शंकरराव चव्हाण यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, गोविंदराव आदिक, सदानंद वर्दे आणि भाई वैद्य आदींचा समावेश होता. नंतर शंकरराव चव्हाण पुन्हा काँग्रेसकडे वळले. त्यामुळे त्यांना 1986 मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद मिळालं. 1988-89 मध्ये ते केंद्रात राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना 1991 ते 1996 दरम्यान शंकरराव केंद्रीय गृहमंत्री होते. याच काळात बाबरी मशीद पाडण्यात आली होती.
शंकरराव चव्हाण यांचा सल्ला ऐकला गेला असता तर बाबरी मशीद पडली नसती, असा दावा मागे एकदा शरद पवार यांनी केला होता. बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी शरद पवार हे संरक्षण मंत्री होते. शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण, राजारामबापू पाटील आणि डॉ. रफीक झकेरिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 2020 मध्ये आयोजित संस्मरण सोहळ्यात शरद पवार यांनी हे विधान केलं होतं. बाबरी मशिदीच्या पतनानंतर देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्या दंगलींमध्ये अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले होते.
राममंदिर उभारणीसाठी आंदोलन सुरू झालं होतं. कारसेवक अयोध्येकडे निघाले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार होतं आणि कल्याण सिंह मुख्यमंत्री होते. कल्याण सिंह यांचं सरकार बरखास्त करावं, असा सल्ला तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांना दिला होता. चव्हाण यांचा सल्ला त्यावेळी राव यांनी एेकला नव्हता. नरसिंहराव यांनी हा सल्ला ऐकला असता बाबरी मशीद पडली नसती. शंकररावांचं मत अप्रिय ठरलं असतं, पण मनुष्यहानीही झाली नसती, असं शरद पवार म्हणाले होते.
राममंदिर आंदोलनामुळं परिस्थिती गंभीर झाली होती. कारसेवक लाखोंच्या संख्येनं अयोध्येकडे निघाले होते. त्यामुळे नरसिंहराव यांनी मंत्र्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. त्यात शरद पवार यांचाही समावेश होता. या आंदोलनामुळे काहीतरी विपरित घडणार, असा अहवाल तत्कालीन गृहसचिव माधव गोडबोले यांनी दिला होता. त्यावर समितीनं चर्चा केली होती. शंकररावांनी कल्याण सिंह सरकार बरखास्त करण्याचा सल्ला दिला होता. सरकार बरखास्त करणं योग्य नाही, अशी भूमिका राव यांनी घेतली होती. शंकरराव चव्हाण दूरदृष्टीचे होते, हे यावरून लक्षात येतं, असंही पवार त्या कार्यक्रमात म्हणाले होते.
शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोकराव चव्हाण यांनाही काँग्रेसनं दोनवेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. त्यांनी विविध मंत्रिपदांवरही काम केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यपदही म्हणूनही त्यांनी काम पाहिलं, आदर्श घोटळ्यात नाव आल्यामुळं अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं. लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीपूर्वी अशोकरावांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अशोकरावांच्या कन्या श्रीजया या भोकरदन मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. या मतदारसंघातून 2014 मध्ये अशोकरावांच्या पत्नी अमिता चव्हाण विजयी झाल्या होत्या.
नांदेडचे नगराध्यक्ष ते मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री हा शंकररावांचा प्रवास सचोटी, कामावर निष्ठेची साक्ष देणारा आहे. बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी हा पल्ला गाठला होता. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं होतं. पी. व्ही. नरसिंहराव यांच्याशी त्यांची गाढ मैत्री होती. राज्याच्या आणि देशाच्याही राजकारणावर अमिट अशी छाप पाडणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचं 26 फेब्रुवारी 2004 रोजी निधन झालं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.