Sushma Swaraj : आक्रमक अन् सुहृदयीही

Sarkarnama Podcast : सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाला मानवी चेहरा मिळवून दिला. ट्वीटरचा योग्य वापर करून त्यांनी अनेकांना मदत केली होती.
Sushma Swaraj
Sushma Swaraj Sarkarnama
Published on
Updated on

जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून देशाला अनेक नेते मिळाले. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादव, नितीश कुमार, शरद यादव ही या आंदोलानातून पुढं आली ठळक नावं. माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचाही जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग होता. सुषमा स्वराज यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. सुषमा स्वराज यांच्यासह रवीशंकर प्रसाद, अरुण जेटली हे भाजप नेतेही जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून पुढं आलेले आहेत. अमोघ वक्तृत्वशैलीचं वरदान लाभलेल्या सुषमा स्वराज यांची मांडणी आक्रमक असे. याबरोबरच त्या सुहृदयीही होत्या.

देशाला प्रगल्भ अशा महिला नेत्यांची परपंरा आहे. अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वानं राजकारण, सत्ताकारण गाजवलं, देशाच्या राजकीय इतिहासात आपलं नाव कोरलं. भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज याही त्यापैकीच एक. अमोघ वक्तृत्वशैली, प्रशासनावर पकड आणि संसदेतील प्रभावी कामगिरी ही सुषमा स्वराज यांची काही गुणवैशिष्ट्यं. सुषमा स्वराज यांची परराष्ट्रमंत्रिपदाची कारकीर्द खूपच गाजली होती. परराष्ट्र मंत्रालयाला मानवी चेहरा त्यांच्याच काळात मिळाला. याची इतिहासात नोंद झालेली आहे.

सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरियाणातील अंबाला कँटोन्मेंट येथे झाला. तेथीलच सनातन धर्म कॉलेजमधून त्यांनी कला शाखेची पदवी प्राप्त केली. संस्कृत आणि राज्यशास्त्र हे त्यांचे विषय होते. नंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन जीवनात उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून त्यांना तीनवेळा सन्मानित करण्यात आलं होतं. हरियाणा सरकारनं आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सुषमा स्वराज यांना सर्वोत्कृष्ट हिंदी वक्ता म्हणून गौरवण्यात आलं होतं.

Sushma Swaraj
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच्या हल्ल्यात थेट माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे नाव, आरोपीच्या वडिलांनी केला मोठा दावा

त्यांचे वडिल हरदेव शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. लक्ष्मी देवी या त्यांच्या मातुःश्री. हरदेव शर्मा आणि लक्ष्मी देवी हे पाकिस्तानातील लाहोरच्या धरमपूर भागातून भारतात आले होते. ते हरियाणात स्थायिक झाले. सुषमा स्वराज यांचा राजकीय क्षेत्रातील प्रवेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतूनच झाला. कायद्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1973 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकीली सुरू केली. स्वराज कौशल यांच्याशी 1975 मध्ये त्यांचा विवाह झाला. तेही सर्वोच्च न्यायालयात वकील होते. स्वराज कौशल यांना वयाच्या 34 व्या वर्षी वरिष्ठ अधिवक्ता म्हणून सर्वोच्च न्यायालयानं त्यांना सन्मानित केलं होतं. ते 1990-1993 दरम्यान मिझोरामचे राज्यपाल होते. त्यांचे वय त्यावेळी 37 वर्षे होतं. सर्वात कमी वयात राज्यपाल होण्याचा मान त्यांना मिळाला. ते राज्यसभेचे सदस्यही होते.

तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यावेळी अनेक नेत्यांना कारागृहात जावं लागलं होतं. समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस त्यापैकीच एक. आणीबीणीच्या विरोधातील आंदोलनात सुषमा स्वराज यांनीही स्वतःला झोकून दिलं होतं. जॉर्ज फर्नांडिस यांच्या अटकेला त्यांनी प्रखर विरोध केला होता. 'जेल का फाटक टूटेगा, जॉर्ज हमारा छुटेगा', अशी घोषणा त्यांनी दिली होती. ती त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झाली होती. सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल हे समाजवादी होते, जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्तीय होते.

Sushma Swaraj
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच्या हल्ल्यात थेट माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे नाव, आरोपीच्या वडिलांनी केला मोठा दावा

आणीबाणीच्या काळात सुषमा स्वराज यांनी जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. बडोदा डायनामइट खटल्यात जॉर्ज फर्नांडिस आरोपी हौते. या प्रकरणात सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल हे जॉर्ज फर्नांडिस यांचे वकील होते. याच प्रकरणात सुषमा स्वराज याही जॉर्ज यांच्यासाठी न्यायालयीन लढा लढणाऱ्या वकीलांच्या पथकाच्या सदस्य बनल्या. आणीबाणीला विरोध केल्यामुळं जॉर्ज यांना 1976 मध्ये अटक करून मुजफ्फरपूर येथील कारागगृहात ठेवण्यात आलं होतं. कारागृहातूनच त्यांनी 1977 मधील लोकसभेची निवडणूक जिंकली होती.

जॉर्ज यांच्या प्रचारासाठी सुषमा स्वराज यांनी मुजफ्फरपूरमध्ये 10 दिवस तळ ठोकला होता. त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. जॉर्ज यांच्या हातात बेड्या असलेला तुरुंगातील फोटो दाखवत त्यांनी प्रचार केला. त्याच वेळी 'जेल का फाटक टूटेगा, जॉर्ज हमारा छुटेगा' अशी घोषणा सुषमा स्वराज यांनी दिली होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या प्रचार करायच्या. त्यांच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी आणीबाणी, देशाचा विकास हे मुद्दे होते. बदल घडवण्याचं आवाहन त्या करत असत. त्या निवडणुकीत जॉर्ज विजयी झाले. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

Sushma Swaraj
Congress News : अस्तित्वाच्या लढाईसाठी काँग्रेसची धडफड; 'आप'च्या मुसक्या आवळणार का?

त्यानंतर सुषमा स्वराज या जनता पार्टीच्या सदस्य बनल्या. 1977 मध्ये त्यांनी पहिल्यांदा हरियाणातून विधानसभेची निवडणूक लढवली, त्यावेळी त्यांचे वय 25 वर्षे होते. त्यांनी निवडणूक जिंकली आणि चौधरी देवीलाल यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं. कामगार खात्याचं कॅबिनेटमंत्रिपद त्यांना मिळालं. एखाद्या राज्यात सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर त्या भाजपमध्ये गेल्या. अंबाला विधानसभा मतदारसंघातून त्या दोनवेळा विजयी झाल्या. भाजप-लोकदल सरकारमध्ये त्या शिक्षणमंत्री बनल्या.

हरियाणातील करनाल लोकसभा मतदारसंघातून त्या तीनवेळा लढल्या, मात्र विजयी होऊ शकल्या नव्हत्या. देशाच्या राजकारणावर आपली छाप पाडणाऱ्या सुषमा स्वराज यांना त्यांच्याच राज्यातील मतदारांनी मात्र नाकारलं होतं. करनालमधून त्यांनी 1980 मध्ये जनता पार्टीकडून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या चिंरजीलाल शर्मा यांनी त्यांचा पराभव केला होता. 1984 मध्ये त्या भाजपकडून लढल्या, त्यावेळीही चिरंजीलाल शर्मा यांनी त्यांना पराभूत केलं. यावेळी त्या तिसऱ्या क्रमांकावर गेल्या. 1989 च्या निवडणुकीत चिरंजीलाल शर्मा यांनी त्यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव केला होता.

Sushma Swaraj
Lado Laxmi Yojana: एप्रिलपासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये; हरियाणा सरकारचा निर्णय

सुषमा स्वराज या 1990 मध्ये राज्यसभेत गेल्या. त्यानंतर 1996 मध्ये त्यांनी दक्षिण दिल्ली मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्या एकूण सातवेळा लोकसभेत निवडून गेल्या होत्या. मार्च 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्या माहिती व प्रसारणमंत्री बनल्या. त्यापूर्वी अटलजींच्या 13 दिवसांच्या सरकारमध्येही त्या मंत्री होत्या. 1998 मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली. तो दिवस होता 12 ऑक्टोबर 1998. दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला. भाजपच्या पहिल्या महिला प्रवक्त्या बनण्याचा मानही त्यांनाच मिळाला होता.

सुषमा स्वराज यांनी 1999 मध्ये कर्नाटकमधील बळ्ळारी मतदारसंघातून सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. परदेशी सून विरुद्ध भारतीय कन्या असं स्वरूप भाजपनं या निवडणुकीला दिलं होतं. प्रचारादरम्यान सुषमा स्वराज यांनी कन्नडमधून भाषणं केली होती. अटलबिहारी वाजपेयी यांनीही त्यांचा प्रचार केला होता, मात्र त्या पराभूत झाल्या. 2004 च्या निवडणुकीत केंद्रात काँग्रेसची सत्ता आली आणि सोनिया गांधी पंतप्रधान बनल्या तर मुंडण करणार, अशी घोषणा सुषमा स्वराज यांनी केली होती. 2009 ते 2014 पर्यंत त्या लोकसभेत विरोधी पक्षनेत्या होत्या. अभ्यासू मांडणी आणि ओघवत्या वक्तृक्वशैलीच्या बळावर त्यांनी अनेकवेळा सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडलं होतं.

Sushma Swaraj
Amit Shah Politics : शरद पवारांचा तोफगोळा शहांनी परतवला; महाराष्ट्रात येऊन पुन्हा डिवचले...

केंद्रात 2014 मध्ये भाजपची सत्ता आली. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. मोदींच्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज यांना परराष्ट्रमंत्रिपद मिळालं. इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्रमंत्री बनणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आणि पूर्णवेळ परराष्ट्रमंत्री असणाऱ्या पहिल्याच महिला. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द स्मरणात राहील अशीच आहे. तुम्ही मंगळ ग्रहावर जरी अडकला असलात तरी सुषमा स्वराज तुमची निश्चितपणे सुटका करतील, असं त्यावेळी म्हटलं जायचं. त्याला आधार होता. त्यांनी कामंच तशी केली होती. संकटात सापडलेल्या विदेशांतील अनेक भारतीयांनी त्यांनी तातडीनं मदत केली होती.

यासाठी त्यांनी ट्वीटरचा अत्यंत योग्य असा वापर केला होता. लोकांना दिलासा देणं आणि स्वतःची मतं मांडत त्यांनी त्यांच्या ट्वीटरची टाइमलाइन कायम जिवंत ठेवली होती. अडचणीत असलेल्या कोणत्याही व्यक्तीनं सुषमा स्वराज यांना ट्वीट केलं आणि त्यांनी उत्तर दिलं नाही, असं कधीच झालं नाही. ट्वीटरवरच त्या आपल्या विभागातील लोकांना सूचना, आदेश द्यायच्या आणि अडचणीत असलेल्या व्यक्तीला तातडीनं मदत मिळायची.

Sushma Swaraj
Kirit Somaiya : उद्धव ठाकरे यांनी रचला होता 'व्होट जिहाद'चा गेमप्लान; किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप

ट्वीटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांनी काही रेस्क्यू ऑपरेशनही केले होते. फेब्रुवारी 2015 मधील प्रसंग आहे. इराकमध्ये 168 नागरिकांना ओलिस ठोवण्यात आलं होतं. त्याचा व्हिडीओ ट्वीटरवरून त्यांना शेअर करण्यात आला होता. त्यावरून तातडीने कारवाई करून त्यांनी या भारतीय नागरिकांची सुटका केली होती. हे पहिलंच रेस्क्यू ऑपरेशन होतं. यापेक्षा मोठं रेस्क्यू ऑपरेशनही त्यांनी केलं. 'ऑपरेशन राहत' या नावांन ते ओळखलं जातं. युद्ध सुरू असलेल्या येमेनमधून हवाईमार्गे 4741 भारतीय नागरिकांची त्यांनी सुटका केली होती. यासाठी हवाई मार्ग आणि समुद्र मार्गाचा वापर करण्यात आला होता. ही मोहीम 11 दिवस चालली होती.

भारतीय पुरुषाशी लग्न केलेल्या येमेनी महिलेनं 8 महिन्यांच्या बाळाचा फोटो ट्वीट करून सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. त्यांनी या माय - लोकरांची सुटका केली होती. मानवी तस्करीचा बळी ठरलेल्या मुलींचीही त्यांनी सुटका केली होता. तमिळनाडूतील जगन्नाथ सेल्वराज हे दुबईमध्ये अडकले होते. सुषमा स्वराज यांनी त्यांचीही मदत केली होती. अशी आणखी अनेक उदाहरणं आहेत. अशा पद्धतीनं परराष्ट्रमंत्री म्हणून त्या लोकांपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यांनी परराष्ट्र मंत्रालायला मानवी चेहरा दिला, असं त्यामुळंच म्हटलं जातं. सुषमा स्वराज सुहृदयी होत्या, हे यावरून लक्षात येतं.

Sushma Swaraj
Sharad Pawar News : राज्यात भूकंप कधी होतोय याची वाट पाहतोय; शरद पवारांनी हवाच काढली

परराष्ट्रमंत्री असतानाच्या त्यांचं स्वास्थ्य ठिक नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. त्यांची एक किडनी नोव्हेंबर 2016 मध्ये निकामी झाली होती. त्यांच्यावर कीडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये जाहीर केलं होतं. मोदी सरकारनं काश्मीरमधील 370 कलम हटवल होतं. यासंदर्भात सुषमा स्वराज यांनी ट्वीट केलं होतं. पंतप्रधान मोदी यांना त्यांनी धन्यवाद दिले होते. आयुष्यभर मला या दिवसाची प्रतीक्षा होती, असं त्या ट्वीटमध्ये म्हणाल्या होत्या. हे त्यांचं शेवटचं ट्वीट ठरलं. 6 ऑगस्ट 2019 रोजी सुषमा स्वराज यांचं निधन झालं. भाजपसाठी हा मोठा धक्का होता.

सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज या राजकारणात आल्या आहेत. व्यवसायानं त्याही वकील आहेत. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्या नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपकडून निवडून आल्या आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलें आहे. त्या बॅरिस्टर आहेत. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार सोमनाथ भारती यांचा त्यांनी पराभव केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com