

NSA case update : सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनीवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) गुन्हा दाखल करणे, महिला जिल्हाधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. हायकोर्टाने हा गुन्हा बेकायदेशीर ठरवत अन्य गुन्हा नसल्यास त्यांची कोठडीतून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर या विद्यार्थिनीला पाच लाखांची भरपाई देण्याचे आदेशात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हायकोर्टाने नोएडाच्या जिल्हाधिकारी मेधा रुपम यांच्या वेतनातून पाच लाखांची भरपाई दिली जावी, असा स्पष्ट आदेश दिला आहे. मेधा रुपम या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कन्या आहेत. दरम्यान, एप्रिल महिन्यात नोएडा येथे कामगार आंदोलन झाले होते. या आंदोलनात दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनी व सामाजिक कार्यकर्त्या आकृती चौधरी याही सहभागी झाल्या होत्या.
आंदोलनादरम्यान चौधरी यांच्यासह अन्य काही जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावर आंदोलन भडकविण्याचे आरोप ठेवण्यात आले होते. त्यापैकी चौधरी यांच्यावर एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्यात आले होते. हे प्रकरण अलाहाबाद हायकोर्टात गेले होते. न्यायमूर्ती श्रीधरन आणि न्यायमूर्ती अचल सचदेव यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर कोर्टाने भरपाईचे आदेश दिले.
आकृती चौधरी यांच्यावर कोणते पुराव्यांच्या आधारे एनएसएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, हे सादर करण्यास कोर्टाने पोलिसांना सांगितले होते. मात्र, पोलिसांना पुरेसे पुरावे सादर करता आले नाहीत. त्यानंतर कोर्टाने चौधरी यांच्याविरोधात गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले. सरकारने आपल्याकडे पुरावे असल्याचे कोर्टात सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात पुरेसे पुरावे देता न आल्याने कोर्टाने हे आदेश दिले.
मेधा रुपम या २०१४ च्या तुकडीच्या उत्तर प्रदेश केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. मुळच्या आग्र्याच्या असलेल्या मेधा यांचे शिक्षण केरळमध्ये झाले आहे. वडील प्रशासकीय सेवेत असल्याने त्यांना सुरूवातीपासून प्रशासनाचे कामकाज जवळून पाहण्याचा अनुभव मिळाला होता. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना बरेली येथे उपजिल्हाधिकारी म्हणून पहिली नियुक्ती मिळाली होती. आयएएस मनीष वर्मा हे त्यांचे पती आहेत.
हायकोर्टाच्या आदेशानंतर काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांच्यासह मेधा रुपम यांच्यावरही निशाणा साधला. पक्षाच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी म्हटले आहे की, वडील देशपातळीवर लोकशाहीची हत्या करत आहेत आणि त्यांनी मुलगी हे नोएडामध्ये करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.