

Indian Air Force News: भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित यांनी आज (३१ ऑक्टोबर) पदभार स्वीकारला. ते भारतीय हवाई दलाचे २९ वे प्रमुख बनले आहेत. मावळते एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली. चार दशकांचा अनुभव गाठीशी असलेल्या दीक्षित यांनी ऑपरेशन सिंदूरमध्येही महत्वाची भूमिका पार पाडली आहे.
मावळते हवाई दलप्रमुख अमर प्रीत सिंग ४३ वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्त झाले. केंद्र सरकारने ६ ऑक्टोबर रोजीच आशुतोष दीक्षित यांची हवाई दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली होती. त्यांना भारतीय हवाई दलातील जवळपास चार दशकांचा अनुभव आहे.
६ डिसेंबर १९८६ रोजी हवाई दल अकादमीमधून भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून त्यांनी सुरुवात केली. त्यांनी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ आणि सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ अशी महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. दीक्षित यांनी मिराज-२०००, मिग विमाने, जग्वार, किरण, हॉक आणि तेजस यांसारख्या विविध विमानांमधून ३,५०० तासांहून अधिक उड्डाण केले आहे.
१९९९ मधील कारगिल युद्धामधील'ऑपरेशन सफेद सागर'मध्ये त्यांचा सहभाग होता. याशिवाय 'ऑपरेशन रक्षक' आणि 'ऑपरेशन सिंदूर' यांसारख्या मोहिमांमध्येही त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांनी मिराज-२००० लढाऊ विमानांच्या स्क्वॉड्रनच्या नेतृत्वासह पश्चिम विभागातील आघाडीच्या फायटर एअरबेस आणि दक्षिण विभागातील महत्त्वाच्या फायटर ट्रेनिंग बेसची कमानही सांभाळली आहे.
त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना २००६ मध्ये वायू सेना पदक, २०११ मध्ये विशिष्ट सेवा पदक, २०२३ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक आणि २०२६ मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
दीक्षित यांनी अशा वेळी हवाई दलाची सूत्रे स्वीकारली आहेत, जेव्हा भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणावर आणि स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासावर भर दिला जात आहे. तेजससह देशांतर्गत विकसित होणाऱ्या विमान प्रकल्पांशी त्यांचा जवळचा संबंध राहिला आहे. त्यामुळे हवाई दलाची क्षमता वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला चालना देणे ही महत्त्वाची आव्हाने असणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.