Delimitation controversy news : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी SIR वर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची सरकारची तयारी असल्याचे सांगत विरोधकांना चर्चेचे आव्हान दिले आहे. मात्र, या विशेष अधिवेशनाबाबत विरोधकांना वेगळीच भीती असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा दावा केला जात आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मंगळवारी सोशल मीडियात पोस्ट करत याबाबत सूचक विधान केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी तहकूब होऊन ८२ दिवस झाले आहेत, पण अद्याप सत्रावसान झालेले नाही. लोकसभेतील वादग्रस्त दोन-तृतीयांश बहुमताच्या जोरावर परिसीमन विधेयके मंजूर करणे, हे त्यामागचे कारण आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या पर्यायावर गृहमंत्री अजूनही विचार करत आहेत. या विधेयकांमधील तपशील अद्याप समोर आलेला नाही. परंतु २०२९ मध्ये भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जाण्यापासून कोणत्याही प्रकारे रोखणे, हा त्यांचा स्पष्ट उद्देश असल्याचे जयराम रमेश यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
जयराम रमेश यांनी शहांवर टीकाही केली आहे. स्वतःला चाणक्य म्हणवणारे, थापा मारण्यात, बढाई मारण्यात आणि पोकळ वक्तव्य करण्यात माहीर असलेले गृहमंत्री, मतदानातील हेराफेरीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. गेल्या वर्षी, जेव्हा संपूर्ण विरोधी पक्षाने एसआयआरवर (SIR) चर्चेची मागणी केली होती, तेव्हा त्यांनी एसआयआर हा निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील विषय असल्याचे सांगून चर्चेला नकार दिला होता, असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
आधी ज्ञानेश कुमारांचा राजीनामा
गृहमंत्री मतदानातील हेराफेरीवर विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी गंभीर असतील, तर त्यांनी आधी त्यांच्या सांगण्यावरून काम करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा. त्यांनी SIR प्रक्रियाही पूर्णपणे थांबवावी, अशी मागणीही जयराम रमेश यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.