

West Bengal News : पश्चिम बंगालच्या राजकारणात दबदबा निर्माण करत गेली 15 वर्षे सत्ता राखण्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना यश आलं होतं. यंदा भाजपनं तगडं आव्हान उभं केल्यानं बंगालच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. पण या निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. या विजयात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान, आता भाजपनं बंगालमध्ये सत्तेत परतल्यानंतर अमित शहांवरच मोठी जबाबदारी सोपवली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. याचदरम्यान,भाजपकडून देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची बंगालचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
केंदात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच अमित शाहंकडे एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडीची अधिकृतपणे जबाबदारी असणार आहे. भाजपच्या आजपर्यंतच्या शैलीनुसार,एखादं राज्य जिंकल्यानंतर त्याठिकाणचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी पक्षातील वरिष्ठ व तितकाच प्रभावशाली नेत्याची नियुक्ती करण्यात येत असते.
आता भाजपनं तब्बल 74 वर्षांचा सत्तेचा वनवास भोगल्यानंतर मोठं यश मिळवत सत्ता काबीज केली आहे. यानंतर पश्चिम बंगालमध्ये अमित शाहा यांची निरीक्षक, तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांची उपनिरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.लवकरच बंगालच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये 2011 च्या निवडणुकीत भाजपला खातंही उघडता आलं नव्हतं.यानंतर 2014 मध्ये केंद्रात सत्तांतर होऊन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपचं सरकार देशात सत्तेत आलं. यावेळी अमित शहांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जींना आव्हान दिलं होतं.
यानंतर ममता यांनी कोण अमित शहा असा खोचक सवाल केला होता.याला प्रत्युत्तर करताना अमित शहा यांनी मी अमित शहा, भाजपचा एक लहानसा कार्यकर्ता असून बंगालच्या जमिनीवरुन तृणमूल काँग्रेसला उखडून टाकण्यासाठी येथे आलो असल्याचं सांगत ममता बॅनर्जींना ललकारलं होतं.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपमधून सर्वात आघाडीवर सुवेंदू अधिकारी यांचं नाव आहे. त्यांनी गेली पाच वर्षे विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारला घाम फोडला होता. तसेच त्यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन महत्त्वाच्या मतदारसंघातून निवडणूक लढवून त्यांनी थेट मुख्यमंत्री बॅनर्जींंनाच ललकारलं होतं.
पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांच्या नावाचीही मुख्यमंत्री पदासाठी चर्चा आहे. त्यांची पार्श्वभूमी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राहिली आहे. त्यांची ओळख अभ्यासू आणि संयमी नेते म्हणून आहे.भाजपला तळागाळापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठं योगदान राहिलं आहे.
तसेच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आणखी एका नावाची चर्चा आहे. माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजपनं बंगालमध्ये मोठी संघटनात्मक जाळं विणल्याचं बोललं जातं. घोष हे एक जमिनीवर काम करणारा नेता म्हणून ओळखले जातात.तसेच त्यांची कार्यकर्त्यांवर मजबूत पकड असून आक्रमक नेता म्हणून त्यांचा बंगालच्या राजकारणात मोठा दबदबा पाहायला मिळाला आहे.