

Chhatisgarh News: राजकीय नेतेही कधी कधी त्यांच्या वादग्रस्त विधानं, रोखठोक भूमिका अन् अजब दाव्यांमुळे चर्चेचे विषय ठरत असतात. राजकीय व्यासपीठ मिळाल्यावर भाषणाच्या ओघात आपण काय बोलतोय याचंही भान त्यांना राहत नाही. किंवा आपण जाहीर कार्यक्रमातून केलेलं वक्तव्य अंगलट येऊन मोठ्या अडचणीत सापडू शकतो हेही राजकीय नेते विसरुन जातात. यात नवखेच नव्हे, तर दिग्गज नेतेही अपवाद नाही. पण आता भाजप खासदारानं मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या वक्तव्यानं राज्याचे राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
छत्तीसगढ़ राज्यातील कांकेरचे भाजप खासदार भोजराज नाग यांनी बालोद जिल्ह्यातील दौंडीलोहरा या ठिकाणी मंगळवारी(ता.25) मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्यासमोरच केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. विरोधकांकडून नाग यांच्या वक्तव्यावरुन राजकारण तापवण्यास सुरुवात झाली आहे.
भाजप खासदार भोजराज नाग म्हणाले, डौंडीलोहारा येथील खराब हवामान आणि मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर अनिश्चितता निर्माण झाली होती. त्याचमुळे आपण महादेव आणि बुढादेव यांना प्रार्थना केली आणि लिंबू कापून पाऊस थांबवला, असा दावा वक्तव्य नाग यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केला.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या उपस्थितीत डौंडीलोहारा येथे महतारी वंदन योजनेचा 31 वा हप्त्याचं वाटप करण्यात येणार होतं. कार्यक्रमाच्या आधीपासूनच या परिसरात ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा दौराही नैसर्गिक संकटात सापडला होता.
याच पार्श्वभूमीवर भोजराज नाग यांनी महादेव आणि बुढादेव यांना प्रार्थना केली आणि लिंबू कापून पाऊस थांबवल्याचा किस्सा सांगितला. हे त्यांचा दाव्यानंतर मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्यासह मंचावरील नेत्यांना खासदारांसह उपस्थितांनाही हसू आवरता आले नाही.
मात्र, खासदार भोजराज नाग हे एवढ्यावरच थांबले नाही, तर ते पुढे म्हणाले, आता मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आहे. त्यामुळे यानंतर पाऊस पडला तरी काही हरकत नाही. तसेच या पावसामुळे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांच्या रात्रीच्या मुक्कामातही कोणतीच अडचण येणार नसल्याचं म्हटलं आहे.
छत्तीसगडच्या भाजप खासदाराच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेटकरी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडूनही त्यांचा समाचार घेतला जात आहे. छत्तीसगड काँग्रेसचे अध्यक्ष दीपक बैज यांनी भोजराज नाग यांच्या वक्तव्यावर खोचक टिप्पणी केली आहे.
बैज यांनी भाजप खासदार जर लिंबू कापून पाऊस थांबवू शकत असतील, तर त्यांनी साखरेचे वाढते दर आणि गगनाला भिडलेली महागाई, वीज बिल, पेट्रोलच्या किंमती आणि घरगुती खर्च कमी करण्यासाठी लिंबू कापता येईल का? अशी भाजपला डिवचणारी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी अंधश्रद्धा व चुकीची माहिती पसरवण्याचा आरोप केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे भाजपचे कांकेर मतदारसंघाचे विद्यमान खासदार असलेले भोजराज नाग यांचं हे पहिलंच वादग्रस्त विधान नाही. त्यांनी यापूर्वीही अनेकदा अजब दावे करुन खळबळ उडवून दिलेली आहे. भूत काढण्यासारख्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे प्रकारातही त्यांचं नाव घेतलं जातं. इतकंच नव्हे तर जर कोणत्या सरकारी अधिकाऱ्यांनी एखादं काम केलं नाही तर ते थेट लिंबू कापण्याची धमकी देतात असंही समोर आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.