

Sonia Gandhi: ज्येष्ठ नेत्या, काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जीवनावरील बहुचर्चित पुस्तक 'बिलॉंगिंग: अ जर्नी ऑफ लव्ह' हे आत्मचरित्र 'पेंग्विन इंडिया' या प्रकाशनाद्वारे प्रकाशित होणार होतं, पण आता त्यांनी प्रकाशित करायला नकार दिला आहे. विशेष म्हणजे या लेखिका म्हणून सोनिया गांधी यांनी गंभीर आरोप केले आहेत.
इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. यात म्हटलं की, पेंग्विन रँडम हाऊस इंडिया या प्रकाशन संस्थेला पुस्तकातील काही भागात बदल करायचा होता. यातील काही नोंदी त्यांना नको होत्या, जर त्या पुस्तकातून हटवण्यात आल्या तरच त्याच्या प्रकाशनाची जबाबदारी घेणार असल्याचं प्रकाशन संस्थेन म्हटलं आहे. पण या पुस्तकाच्या लेखिका अर्थात सोनिया गांधी यांनी या बदलासाठी नकार दिला. त्यामुळं पेंग्विन इंडियानं यातून माघार घेतली आहे. यानंतर अनेक मान्यवर भारतीय प्रकाशक हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पुढे आले आहेत. यामध्ये आता 'हार्पर कॉलिन्स' या प्रकाशकाकडून भारतात सोनिया गांधींवरील पुस्तक प्रकाशित करुन त्याच्या वितरणाचीही जबाबदारी स्विकारली माहिती मिळते आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पेंग्विननं आणलेल्या माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकावरुनही वाद झाला होता.
१० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाची घोषणा सर्वात आधी अमेरिकेत राहणाऱ्या अल्फ्रेड ए. नॉफ यांनी केली होती. नॉफ हे पेंग्विन रँडम हाऊसची एक शाखा असलेले प्रकाशक आहेत. नॉफ यांनी सांगितलं होतं की, या पुस्तकाच्या १ लाख प्रति छापण्यात येणार आहेत. सोनिया गांधी यांनी यापूर्वी इतर पुस्तक लिहून संपादित केली आहेत. पण ज्या लोकांनी या नव्या पुस्तकावर काम केलं आहे, त्यांच्या माहितीनुसार, या पुस्तकात सोनिया गांधींच्या जीवनातील सर्वात खासगी आणि महत्वाच्या घटनांचा तपशील आहे. नॉफ यांनी हे पुस्तक म्हणजे जगातील प्रमुख महिला नेत्यांपैकी एका नेत्याचं आकर्षक आठवण असल्याचं म्हटलं होतं.
नॉफ यांच्या जाहिरातीत सोनिया गांधी यांच्या हवाल्यानं म्हटलं होतं की, "माझ्या कुटुंबाबाबत यात काही लिहिलं आहे, पण यातील काही भाग माझी प्रेरणा, कार्य आणि मानवीय मर्यादा याच्या खरेपणापर्यंत पोहोचलं आहे. माझी गोष्ट वाचकांना त्या सामाजिक आणि राजकीय परिवर्तनांचा एक अनोखा दृष्टीकोन दाखवते, ज्या मी गेल्या सहा दशकांमध्ये पाहिल्या आहेत, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला पेंग्वन रँडम हाऊस इंडियाकडून एक निवेदन केलं होतं, त्यामध्ये त्यांनी माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचं आत्मचरित्र 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' हे पुस्तक प्रकाशित केलं नव्हतं. पण राहुल गांधी यांनी या पुस्तकाची एक हार्डकॉपी दाखवली होती. या पुस्तकाच्या कथित प्रतीमध्ये गलवानमधील भारत-चीन संघर्ष आणि अग्निवीर तयार करणाऱ्या अग्निपथ योजनेचा उल्लेख होता. हे दोन्ही मुद्दे भारत सरकारला अडचणीत आणणारे ठरु शकणारे होते अशी चर्चा त्यावेळी झाली होती.
यानंतर जून महिन्यात पेंग्विन रँडम हाऊस इंडियानं मुजफ्फरनगर दंगलीवर आधारित कांदंबरीकार जो सैको यांचं पुस्तक 'द वन्स अँड फ्युचर राईट' याची छपाई थांबवली होती. त्यावेळी सीईओ श्रीनागेश यांनी म्हटलं होतं की, प्रकाशकानं कायदेशीर चौकशी दरम्यान लेखकाजवळ काही मुद्दे उपस्थित केले होते. ज्यामध्ये भारताच्या चुकीच्या सीमा दाखवणारा एक नकाशा होता.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आपल्या आई सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावर भाष्य करताना नुकतंच म्हटलं होतं की, "पप्पा आकाशातून आपल्या सुंदर सोनियाला गर्वानं पाहत असतील, मला गर्व आहे की माझ्या आईची जगणं त्या करोडो लोकांपर्यंत पोहोचेल ज्यांना त्यांच्याप्रती आत्मियता आहे" सोनिया गांधींचं आत्मचरित्र या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बाजारात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.