

New Delhi News: देशभरात नीट परीक्षा पेपरफुटीवरुन संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या परीक्षेच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. याचदरम्यान, कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) नं या कथित पेपरफुटीविरोधात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाची धग राजधानी दिल्लीतील जंतरमंतर,संसद, पंतप्रधानांचं निवासस्थान तसेच देशभरात पसरली आहे. याचदरम्यान,आता एकीकडे सत्ताधारी-विरोधकांमध्ये तणावपूर्ण वातावरण असतानाच तमिळनाडूमधून एक मोठी मागणी समोर येत आहे.
मुख्यमंत्री आणि टीव्हीके प्रमुख थलापथी विजय यांनी केंद्र सरकारसमोर एक मोठी मागणी ठेवली आहे. त्यांनी नीट परीक्षेत केवळ सुधारणांचीच आवश्यकता नसून थेट नीट ही परीक्षाच पूर्णपणे रद्द केली पाहिजे आणि वैद्यकीय शिक्षणाचे अधिकार राज्यांना परत दिले पाहिजेत अशी आग्रही भूमिका मांडली आहे.
नीट पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असताना थलापती विजय यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेतील वारंवार होणाऱ्या पेपर लीकच्या घटनांमुळे NEET परीक्षा रद्द करून राज्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या तामिळनाडू वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षानं 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक निवेदन जारी करून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
टीव्हीकेनं "नीट परीक्षा लागू झाल्यापासून, तिची विश्वासार्हता पूर्णपणे डागाळली असल्याचं म्हटलं आहे. तसेच इतकेच नाही, तर विद्यार्थ्यांना तीव्र मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या भविष्यावर आणि स्वप्नांवर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे वार्षिक नुकसान थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करणे हाच असल्याचं ठामपणे सांगितलं आहे.
विरोधी पक्षांप्रमाणे ते नीटच्या मुद्द्यावर "बनावट राजकारण" करत नाहीत किंवा खोटी आश्वासने देत नाहीत, अशी स्पष्ट भूमिका टीव्हीके पक्षानं घेतली आहे. नीट परीक्षा रद्द करत राज्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश देण्याचे अधिकार राज्यांना परत दिले पाहिजेत. जेणेकरून ते स्वतः वैद्यकीय शिक्षणासाठी एक पारदर्शक प्रणाली तयार करू शकतील.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनीही पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन करणाऱ्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी यांच्यासह ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
टीव्हीके यांनी त्यांच्या निवेदनात दिल्ली पोलिसांच्या या कारवाईला 'लोकशाही हक्कांवरील उघड हल्ला' म्हटलं आहे. या निवेदनात राष्ट्रीय राजधानीत अहिंसक मार्गाने विद्यार्थ्यांचा आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींसोबत होणारी अशी गैरवर्तणूक आणि त्यांचे दमन अत्यंत निंदनीय आहे.
3 मे रोजी झालेला नीटचा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या परीक्षेला देशभरातून जवळपास 23 लाख विद्यार्थी बसले होते. यानंतर सीबीआयने या प्रकरणात आतापर्यंत 20 आरोपींना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी राजस्थान, महाराष्ट्र आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.
यानंतर राज्यभरात वातावरण तापलं असतानाच मुख्यमंत्री विजय यांनी त्यावेळी सोशल मीडियावर याप्रकरणी भाष्य करताना कठोर कारवाईसह ही परीक्षाच रद्द करण्याची मागणी केली होती. NEET परीक्षेमुळे ग्रामीण भागातील, सरकारी शाळांतील आणि तमिळ माध्यमातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते.
तामिळनाडू सरकार सुरुवातीपासूनच NEET च्या विरोधात असून ही परीक्षा पूर्णपणे रद्द केली जावी. राज्यांना MBBS, BDS आणि AYUSH अभ्यासक्रमांमध्ये बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री विजय यांनी केंद्र सरकारकडे केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.