

Delhi restaurant fire: दिल्लीतील मालवीय नगर भागात बुधवारी सकाळी हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत तब्बल २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने देशाच्या राजधानीला मोठा हादरा बसला आहे. हॉटेल असलेल्या इमारतीमध्ये अनेक रहिवाशीही होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढला. सुमारे ३७ जणांना वाचविण्यात यश आले आहे.
मालवीय नगर या गजबजलेल्या परिसरातील हॉटेल फ्लोरिस स्टेमध्ये सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन दलाला याबाबत ८.५० वाजता माहिती मिळाली. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले होते. बचाव पथके दाखल झाल्यानंतर त्याला वेग आला.
हॉटेलला लागलेली आग इमारतीच्या अन्य मजल्यांवरही पसरत गेली. त्यामुळे पाच मजली इमारतीत धुराचे साम्राज्य होते. इमारतीतील काही लोकांनी जीव वाचविण्यासाठी खाली उड्या टाकल्याचेही स्थानिकांनी सांगितले. इमारतीतून बचाव पथकाने ३७ जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. त्यापैकी काही जण भाजले असून काही जण धुरामुळे बेशुध्द अवस्थेत होते.
आगीत आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधान मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना तातडीने दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल.
दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा दिल्लीतील इमारतीच्या फायर सेफ्टीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी दिल्लीत इमारतींना आगीच्या घटना घडल्या आहेत. बहुतेक ठिकाणी आगप्रतिरोधक यंत्रणा नसल्याचे समोर आले होते. आज आग लागलेल्या इमारतीमध्येही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.