

Vigilance and Anti-Corruption Bureau update : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांच्याविरोधात सातत्याने आंदोलने सुरू आहेत. आता एका लाचप्रकरणात त्यांच्या चौकशीचे आदेश काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्य सरकारने दिली आहे. तब्बल दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप ज्ञानेश कुमार यांच्यावर करण्यात आला आहे.
केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी एका ठेकेदाराने केलेल्या आरोपांनंतर चौकशीचे आदेश दिले आहे. हे प्रकरण जवळपास २० वर्षांपूर्वीचे आहे. केरळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव असताना ज्ञानेश कुमार यांनी एका कामाच्या बदल्यात दोन कोटींची लाच मागितली होती, असा आरोप एका ठेकेदाराने केला आहे.
केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टशी संबंधित हे प्रकरण आहे. चेन्निथला यांनी विजिलन्स अॅन्ड अँट करप्शन ब्युरोला प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. तक्रारदाराने याबाबत लेखी तक्रार दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टअंतर्गत काम पूर्ण करूनही संबंधित कंपनीचे बिल थकविण्यात आले होते. अभियंत्यांनी सुमारे १७ कोटी रुपयांच्या बिलाला मंजुरी दिली होती. पण नंतर धनादेश काढण्यात आले नाहीत.
तक्रारदाराने तक्रारीत एक मलेशियन कंपनी आणि संबंधित ठेकेदारांचा उल्लेख केला आहे. कंपनीच्या प्रोजेक्ट इंजिनिअरने आपल्याशी बोलताना ज्ञानेश कुमार यांनी कथितपणे २ कोटी लाच मागितल्याचे ठेकेदाराने तक्रारीत नमूद केले आहे. पैसे दिल्याशिवाय धनादेश काढणार नाही, असे ज्ञानेश कुमार म्हणाले होते, असेही ठेकेदाराने तक्रारीत म्हटले आहे.
संबंधित प्रोजेक्ट इंजिनिअरने २००६ मध्ये आत्महत्या केली होती. त्यांनी सुसाईड नोटमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेचा उल्लेख केला होता. इंजिनिअरच्या कुटुंबातील सदस्यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. याप्रकरणी २००६ मध्ये झालेल्या चौकशीमध्ये संबंधितांकडे लाचेबाबत थेट चौकशी करण्यात आली नव्हती. आता कंपनीतीली माजी कर्मचारी तसेच इंजिनिअरच्या कुटुंबातील सदस्यांसह अन्य लोकांचे जबाब घ्यावेत, असे ठेकेदाराने तक्रारीत म्हटले आहे.
करप्शन ब्युरोकडून यापूर्वीच ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टमधील भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आता ठेकेदाराच्या आरोपांची चौकशीही त्या चौकशीसोबतच होण्याची शक्यता आहे. आधीच्या तक्रारीमध्येही ज्ञानेश कुमार यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.