

Venezuela Indian sailor missing organs case : दक्षिण अमेरिकेतील व्यापारी जहाजावर कार्यरत असलेल्या ३३ वर्षीय भारतीय खलाशी राकेश चौहान यांच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक आणि गूढ वळण मिळाले आहे. भारतात मृतदेह आणल्यानंतर पुन्हा करण्यात आलेल्या शवविच्छेदनात त्यांच्या शरीरातील हृदय, मेंदू आणि फुफ्फुस हे महत्त्वाचे अंतर्गत अवयव नसल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून, फेडरेशन ऑफ सीफेअर्स युनियन्स ऑफ इंडिया (FSUI) ने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्याचे रहिवासी असलेले राकेश चौहान नोव्हेंबर २०२५ पासून एक्सफिनिटी (Xfinity) या कंपनीमार्फत व्यापारी जहाजावर कार्यरत होते. व्हेनेझुएलामध्ये असताना त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला कंपनीने कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. तसेच आठवडाभरात मृतदेह भारतात पाठविण्याचे आश्वासनही देण्यात आले होते.
मात्र, प्रत्यक्षात सुमारे एका महिन्यानंतर, ४ जून रोजी राकेश चौहान यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मृतदेहासोबत शवविच्छेदनाचा अहवाल किंवा मृत्यूबाबत कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आली नव्हती.
यामुळे संशय व्यक्त करत कुटुंबीयांनी मृत्यूची चौकशी आणि पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. त्यानंतर देवरिया जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान मानेपासून पोटापर्यंत २२ टाके आणि कानापासून कानापर्यंत २१ टाके असल्याचे निदर्शनास आले. तसेच शरीरातील हृदय, मेंदू आणि फुफ्फुस यांसारखे महत्त्वाचे अंतर्गत अवयव नसल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, राकेश चौहान यांचे वडील रामदेव चौहान यांनी संबंधित कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी राकेश जहाजावरून पडून जखमी झाल्याचे आणि त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगितले. मात्र, दुसऱ्याच दिवशी कंपनीने फोन करून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आणि पडल्यामुळे झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण सांगितले. कंपनीने वेगवेगळी माहिती देत कुटुंबियांना अंधारात ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
या प्रकरणावर फेडरेशन ऑफ सीफेअर्स युनियन्स ऑफ इंडिया (FSUI) ने तीव्र संताप व्यक्त केला आहे. संघटनेने या घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, व्हेनेझुएला सरकारने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून सत्य समोर आणावे, अशी मागणी केली आहे. तसेच व्हेनेझुएलातील भारतीय दूतावासानेही या प्रकरणात हस्तक्षेप करून पीडित कुटुंबाला न्याय आणि योग्य भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.